विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले आहेत. राज्यातल्या 288 मतदार संघात 7 हजार 995 उमेदवारांचे जवळपास 10 हजार 905 उमेदवारी अर्ज दाखल झाले आहे. यात सर्वाधिक उमेदवारी अर्ज हे नांदेड जिल्ह्यातील भोकर विधानसभा मतदार संघात दाखल झाले आहेत. तर सर्वात कमी उमेदवारी अर्ज हे कणकवली विधानसभा मतदार संघात दाखल झाले आहे. 4 नोव्हेंबरपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेता येणार आहेत. या निवडणुकीत सर्वच प्रमुख पक्षांना मोठ्या प्रमाणात बंडखोरीचा सामना करावा लागला आहे. त्यामुळे कोणता पक्ष ही बंडखोरी रोखण्यास यशस्वी होतो हे 4 नोव्हेंबरला स्पष्ट होईल. त्यानंतर लढतीचे चित्र समोर येईल.
( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
नांदेड जिल्ह्यातील भोकर विधानसभा मतदार संघात सर्वात जास्त उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले आहे. या मतदार संघात तब्बल 167 उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. या मतदार संघातून माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांची कन्या श्रीजया अशोक चव्हाण उमेदवार आहे. त्यांना भाजपने मैदानात उतरवले आहे. या मतदार संघात त्यांची लढत काँग्रेस बरोबर होत आहे. भोकर प्रमाणे औरंगाबाद पूर्व विधानसभा मतदार संघातही तब्बल 111 उमेदवारी अर्ज आले आहे. भोकरनंतर सर्वात जास्त उमेदवारी अर्ज जर कुठल्या मतदार संघात दाखल झाले असतील तर ते औरंगाबाद पूर्वमध्ये आले आहेत. बीड जिल्ह्यातील माझलगाव आणि बीड या मतदार संघातही जवळपास 138 उमेदवारी अर्ज आले आहेत.
ज्या प्रमाणे भोकरमध्ये सर्वात जास्त अर्ज आले तसेच कोकणातील कणकवली विधानसभा मतदार संघात सर्वात कमी अर्ज आले आहे. या मतदार संघात केवळ 9 उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. या मतदार संघातून भाजपचे नितेश राणे हे मैदानात आहेत. त्यांना शिवसेना ठाकरे गटाच्या संदेश पारकर यांचे आव्हान आहे. या शिवाय मलबार हील 11 अर्ज, रत्नागिरी 12,डोंबिवली 13, बोरीवली 13, चारकोप 14, दापोली 14, भिवंडी ग्रामिण 15, भांडूप वेस्ट 13, शिवडी 13, अंधेरी वेस्ट 15, या मतदार संघात सर्वात कमी अर्ज आले आहेत.
ट्रेंडिंग बातमी - महाविकास आघाडीत कुठे कुठे मैत्रीपूर्ण लढती, माघार कोण घेणार?
मुंबईत सर्वात जास्त अर्ज हे अणुशक्तीनगर मतदार संघात आले आहेत. या मतदार संघात 46 उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. त्या खालोखाल मानखूर्द शिवाजी नगर मतदार संघात 43 अर्ज आले आहेत. अणूशक्ती नगर मतदार संघातून नवाब मलिक यांची कन्या सना मलिक निवडणूक रिंगणात आहे. तर शिवाजीनगर मानखुर्द मतदार संघातून नवाब मलिक हे रिंगणात आहेत. या मतदार संघात मलिक विरुद्ध समाजवादी पार्टीचे अबू आझमी यांच्यात प्रमुख लढत होत आहे. महायुतीच्या शिवसेना शिंदे गटानेही या मतदार संघात उमेदवार दिला आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world