जाहिरात

Maharashtra Election : निवडणुकीच्या आखाड्यात फडणवीस ठरले महायुतीचे 'सुपरमॅन',मतदानापूर्वी मोठी आकडेवारी समोर

Municipal Corporation Election2026 : महानगपालिका निवडणुकीच्या प्रचार मोहिमेत सत्ताधारी महायुती आणि विशेषतः भारतीय जनता पार्टीचा प्रमुख चेहरा म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्याचा दौरा पिंजून काढला.

Maharashtra Election : निवडणुकीच्या आखाड्यात फडणवीस ठरले महायुतीचे 'सुपरमॅन',मतदानापूर्वी मोठी आकडेवारी समोर
Devendra Fadnavis : महानगरपालिका निवडणुकीच्या प्रचारात देवेंद्र फडणवीस भाजपाचा मुख्य चेहरा होते.
मुंबई:

Municipal Corporation Election2026 : 15 जानेवारी रोजी होणाऱ्या राज्यातील 29 महानगरपालिकांच्या निवडणुकांसाठीची प्रचाराची रणधुमाळी अखेर शांत झाली आहे. गेल्या 2 आठवड्यांपासून सुरू असलेल्या या धामधुमीत सर्वच राजकीय पक्षांनी आपली पूर्ण ताकद पणाला लावली होती. 

या संपूर्ण प्रचार मोहिमेत सत्ताधारी महायुती आणि विशेषतः भारतीय जनता पार्टीचा प्रमुख चेहरा म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्याचा दौरा पिंजून काढला. आता प्रचाराची सांगता झाल्यानंतर मुख्यमंत्र्यांच्या या झंझावाती दौऱ्याची आकडेवारी समोर आली असून, त्यांनी अत्यंत कमी वेळात राज्यभर सभा आणि रोड शोचा धडाका लावला होता..

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सभांचा धडाका

या निवडणूक प्रचारात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एकूण 77 कार्यक्रमांना हजेरी लावली. यामध्ये 37 मोठ्या सभा आणि रोड शोचा समावेश होता. त्यांनी मुंबईमध्ये सर्वाधिक 7 सभा घेतल्या, तर त्यांच्या स्वतःच्या बालेकिल्ल्यात म्हणजेच नागपूरमध्ये 5 सभा पार पडल्या. पुण्यात 2 सभांच्या माध्यमातून त्यांनी मतदारांशी संवाद साधला. 

याशिवाय सांगली, अकोला, जालना, परभणी, नांदेड, धुळे, लातूर, भिवंडी, उल्हासनगर, कल्याण, अहिल्यानगर, वसई विरार, मिरा भाईंदर, सोलापूर, पिंपरी चिंचवड, नाशिक आणि नवी मुंबई या प्रत्येक शहरात त्यांनी प्रत्येकी 1 सभा घेऊन महायुतीच्या उमेदवारांसाठी मतांचे आवाहन केले.

( नक्की वाचा : Ravindra Chavan : रविंद्र चव्हाणांनी सोडली जीन्स आणि नेसली लुंगी! सोशल मीडियावर चर्चा, पण खरं कारण झालं उघड )
 

रोड शो आणि मतदारांशी थेट संवाद

केवळ सभाच नव्हे तर मुख्यमंत्री फडणवीस यांनी अनेक शहरांमध्ये रोड शोच्या माध्यमातून मतदारांच्या गाठीभेटी घेतल्या. इचलकरंजी, चंद्रपूर, अमरावती, जळगाव, पिंपरी चिंचवड आणि नागपूर या ठिकाणी त्यांनी जोरदार रोड शो केले. या थेट संवादामुळे कार्यकर्त्यांमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळाला. प्रचाराच्या या धावपळीत त्यांनी मुंबईत पक्षाचा वचननामा देखील प्रकाशित केला, ज्यातून शहरांच्या विकासाचा रोडमॅप जनतेसमोर मांडण्यात आला.

प्रचारासाठी ग्लॅमरचा तडका आणि मुलाखतींचे सत्र

यावेळच्या प्रचाराचे वैशिष्ट्य म्हणजे मुख्यमंत्र्यांनी विविध क्षेत्रांतील मान्यवरांसोबत घेतलेल्या मुलाखती. त्यांनी एकूण 6 विशेष मुलाखती दिल्या, ज्यात मराठी चित्रपटसृष्टीतील कलाकारांचा सहभाग होता. ठाण्यात तेजश्री प्रधान आणि मिलींद बल्लाळ यांनी त्यांची मुलाखत घेतली, तर छत्रपती संभाजीनगरमध्ये समीरा गुजर यांच्याशी त्यांचा संवाद झाला. 

नागपूरमध्ये भारत गणेशपुरे आणि स्पृहा जोशी, पुण्यात गिरीजा ओक, कोल्हापुरात कृष्णराज महाडीक आणि स्वप्नील राजशेखर तर पनवेलमध्ये प्रसाद ओक आणि अमृता खानविलकर यांनी मुख्यमंत्र्यांशी विविध विषयांवर चर्चा केली. याव्यतिरिक्त त्यांनी विविध प्रसारमाध्यमांना 33 मुलाखती देऊन सरकारची भूमिका स्पष्ट केली.

( नक्की वाचा : PMC Election : 'घड्याळाचा अलार्म लावा पण ते घरीच ठेवा!' फडणवीसांची टोलेबाजी, पुण्यातील नियोजनाचे काढले वाभाडे )
 

15 जानेवारीला राज्याचे भवितव्य ठरणार

आता प्रचाराच्या तोफा थंडावल्या असून उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद होण्याची वेळ आली आहे. 29 महानगरपालिकांच्या या निवडणुकीसाठी 15 जानेवारी रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. मुख्यमंत्र्यांच्या या झंझावाती प्रचाराचा महायुतीला किती फायदा होतो आणि जनता कोणाच्या हाती सत्तेची चावी देते, हे पाहणे आता महत्त्वाचे ठरणार आहे.
 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com