सुजित आंबेकर
विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्यासाठी सध्या उमेदवारांची पळापळ सुरू आहे. तर काहींना अजूनही उमेदवारी मिळण्याची प्रतिक्षा आहे. अशात फलटण कोरेगाव विधानसभा मतदार संघातून एक उमेदवार असा आहे जो सध्या जेलमध्ये आहे. जेलमधून निवडणूक लढवण्याचा या नेत्याने निर्णय घेतला आहे. गेल्या अडीच वर्षापासून ते जेलमध्ये आहे. विशेष म्हणजे 2019 ची विधानसभा निवडणूक त्यांनी भाजपकडून लढवली होती. त्यात त्यांना तब्बल 86 हजार मते मिळाली होती.
( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
फलटण कोरेगाव विधानसभा मतदार संघातून दिगंबर आगवणे हे उमेदवारी अर्ज भरणार आहेत. दिगंबर हे भाजपचे पदाधिकारी होते. त्यांनी 2019 ची निवडणूक भाजपच्या तिकीटावर लढवली होती. त्यात त्यांनी जवळपास 86 हजार मते घेतली होती. सध्या ते मनी लॉन्ड्रींग केसमध्ये जेलची हवा खात आहेत. त्यांनी आता जेलमधून निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी ते उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी फलटण इथे आले होते. त्यावेळी त्यांना पोलिस बंदोबस्तात आणण्यात आले होते. मात्र ते उमेदवारी अर्ज न भरताच निघून गेले. अर्जा बरोबर आवश्यक कागदपत्र नसल्याने त्यांना उमेदवारी अर्ज दाखल करता आला नाही. त्यानंतर त्यांनी कोर्टाकडे उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी नव्याने परवानगी मागितली आहे. त्यांना ती मिळाली असल्याचेही समजते. त्यामुळे आगवणे हे जेलमधून निवडणूक रिंगणात असतील.
मागिल विधानसभा निवडणुकीत आगवणे यांना भाजपने उमेदवारी दिली होती. त्यावेळी त्यांचा सामना राष्ट्रवादी काँग्रेसच्या दिपक चव्हाण यांच्या बरोबर झाला होता. आगवणे यांना जवळपास 30 हजाराच्या फरकाने पराभव स्विकारावा लागला होता. आता ते निवडणूक रिंगणात उतरणार आहे. त्यासाठी गुरुवारी पोलिस बंदोबस्तात फलटण-कोरेगाव विधानसभा निवडणूक कक्षात आगवणे यांनी एन्ट्री झाली. त्यांनी उमेदवारीसाठी प्रशासनाकडून अर्ज खरेदी केला होता. निवडणूक लढवण्यासाठी न्यायालयाकडून त्यांनी परवानगीही घेतली आहे. न्यायालयाने अर्ज भरण्यास परवानगी दिल्याने आगवणे हे अर्ज भरण्यासाठी पोलिस बंदोबस्तात फलटण तहसील कार्यालयात आले होते. पण अपूऱ्या कागदपत्रामुळे तो त्यांना भरता आला नाही.
ट्रेंडिंग बातमी - ठाकरे विरुद्ध शिंदे, पवार विरुद्ध पवार! किती आणि कोणत्या मतदार संघात भिडणार?
भाजपचे माजी पदाधिकारी असलेल्या दिगंबर आगवणे यांना कर्ज घोटाळा प्रकरणात अटक करण्यात आली आहे. गेल्या अडीच वर्षांपासून ते कारागृहात आहेत. भाजप नेते दिगंबर रोहिदास आगवणे यांना 11 कोटी रुपयांच्या मनी लाँड्रींग प्रकरणातही ईडीने अटक केली होती. आगवणे हे सध्या कारागृहात मकोका खाली बंद आहेत. याशिवाय त्याच्यावर स्थानिक पोलीस ठाण्यात आणखी 22 गुन्हे दाखल आहेत. विविध कर्ज प्रकरणे, पतसंस्थांची फसवणूक, जमीन घोटाळे, खंडणी, धमकी अशा विविध आरोपांखाली ते सध्या कारागृहात आहेत.
ट्रेंडिंग बातमी - महायुतीकडून महाविकास आघाडीची हवाई कोंडी! सर्व हेलिकॉप्टर बुक, तासाचं भाडं किती?
आगवणे यांनी अनेकांची फसवणूक केल्याचा आरोप आहे. गुंतवणूकदारांना दुप्पट परतावा देण्याचे आश्वासन देऊन त्याच्या कंपन्यांमध्ये पैसे गुंतवण्याचे आमिष त्यांनी दाखवले होते. असा गुंतवणुकदारांचा आरोप आहे. याबाबतचे प्रकरणी ही उघडकीस आले होते. या गुंतवणूकदारांना त्यांनी कधीही रक्कम परत केली नाही. तसेच ते लोकांची फसवणूक करून विक्री करार करून त्यांच्याकडून बेकायदेशीरपणे जमीन संपादन करत होत. असे अनेक आरोप त्यांच्यावर करण्यात आले होते.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world