जाहिरात

लोकसभेला हरले, विधानसभेला पुन्हा उभे ठाकले! खासदार नाही तर आता आमदार व्हायचं

लोकसभा हुकलेले नेते आता विधानसभेच्या आखाड्यात उतरण्याच्या तयारीत आहेत. त्यातल्या काहींना उमेदवारीही मिळाली आहे.

लोकसभेला हरले, विधानसभेला पुन्हा उभे ठाकले! खासदार नाही तर आता आमदार व्हायचं
मुंबई:

नुकत्याच लोकसभा निवडणूका झाल्या. या निवडणुकीत अनेकांना पराभव स्विकारावा लागला. त्यानंतर होत असलेल्या विधानसभा निवडणुकीसाठी लोकसभा हुकलेले नेते आता विधानसभेच्या आखाड्यात उतरण्याच्या तयारीत आहेत. त्यातल्या काहींना उमेदवारीही मिळाली आहे. तर काहींना अजून उमेदवारीची प्रतिक्षा आहे. त्यामुळे लोकसभेला हरलो तर काय झालं, विधानसभेत जायचे असा निर्धार त्यांनी केला आहे. खासदार नाही तर आमदार तरी होऊ असा निर्धार त्यांनी केला आहे. 

'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

लोकसभा निवडणुकीत भाजपचे प्रताप पाटील चिखलीकर यांचा पराभव झाला. त्यांनी नांदेड लोकसभा मतदार संघातून निवडणूक लढवली होती. त्यांचा काँग्रेसच्या वसंत चव्हाण यांनी पराभव केला. पराभवानंतर आता चिखलीकर विधानसभेच्या आखाड्यात उतरले होते. मात्र भाजपकडून लोकसभा लढवलेले प्रताप पाटील चिखलीकर विधानसभा मात्र राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून लढणार आहेत. त्यांना पक्षाने लोहा विधानसभा मतदार संघातून उमेदवारीही दिली आहे. त्यामुळे आमदार होण्याचे स्वप्न ते पाहात आहेत.  तर सांगलीत पराभूत झालेले संजयकाका पाटीलही विधानसभा निवडणूक लढत आहेत. त्यांनीही भाजपची साथ सोडून राष्ट्रवादीचा झेंडा हाती घेतला आहे. ते तासगावमधून निवडणूक लढत आहेत. 

ट्रेंडिंग बातमी - भाजप आपले नेते राष्ट्रवादीत का पाठवतेय? अजित पवारांवर भाजप नेत्यांना उमेदवारी देण्याची वेळ का?

प्रताप पाटील चिखलीकरां प्रमाणेच भाजपच्या सुधीर मुनगंटीवर यांनाही लोकसभेला पराभव स्विकारावा लागला होता. त्यांना चंद्रपूर लोकसभा मतदार संघातून भाजपने उमेदवारी दिली होती. पण त्यात त्यांचा पराभव झाला. काँग्रेसच्या प्रतिभा पाटील यांनी त्यांचा मोठ्या फरकाने पराभव केला. मात्र त्यानंतरही आता सुधिर मुनगंटीवार हे विधानसभेच्या मैदानात उतरले आहेत. त्यांचा पारंपारीक मतदार संघ असलेल्या बल्लारपूर मतदार संघातून ते निवडणूक लढत आहेत. मुनगंटीवार यांना पक्षाने उमेदवारीही जाहीर केली आहे. 

ट्रेंडिंग बातमी - ठाकरे विरुद्ध शिंदे, पवार विरुद्ध पवार! किती आणि कोणत्या मतदार संघात भिडणार?

शिवसेना शिंदे गटाच्या आमदार यामिनी जाधव यांनीही दक्षिण मुंबई लोकसभा मतदार संघातून निवडणूक लढवली होती. मात्र त्यांचा शिवसेना ठाकरे गटाच्या अरविंद सावंत यांनी पराभव केला. पराभवानंतरही आता शिंदे गटाने त्यांना विधानसभेच्या मैदानात उतरवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांना भायखळा विधानसभा मतदार संघातून शिवसेना शिंदे गटाकडून उमेदवारी देण्यात आली आहे. त्यामुळे त्या पुन्हा एकदा विधानसभेत जाण्याच्या प्रयत्नात आहे. खासदारकी हुकली आता निदान आमदारकी तरी मिळावी यासाठी त्यांचे प्रयत्न आहेत. 

ट्रेंडिंग बातमी - विधानसभेच्या रिंगणात 'हा' उमेदवार सर्वात लहान वयाचा ? सर्वात जास्त वय कुणाचे?

यामिनी जाधव यांच्या प्रमाणेच राहुल शेवाळे यांनाही लोकसभेला पराभवाला सामोर जावे लागले होते. त्यांनी दक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदार संघातून निवडणूक लढवली होती. मात्र त्यांचा शिवसेना ठाकरे गटाच्या अनिल देसाई यांनी पराभव केला होता. त्यामुळे शेवाळे आता विधानसभेच्या मैदानात उतरण्याची तयारी करत आहेत. त्यांनी धारावी विधानसभा मतदार संघातून उमेदवारी मिळावी यासाठी प्रयत्न सुरू केले आहे. त्यांना अजूनही उमेदवारी जाहीर झालेली नाही. मात्र उमेदवारी मिळेल अशी आशा त्यांना आहे. 

Previous Article
विधानसभेच्या रिंगणात 'हा' उमेदवार सर्वात लहान वयाचा ? सर्वात जास्त वय कुणाचे?
लोकसभेला हरले, विधानसभेला पुन्हा उभे ठाकले! खासदार नाही तर आता आमदार व्हायचं
ncp-to-field-highest-number-of-candidates-in-mumbai-vidhansabha-elections
Next Article
महायुती मुंबईत वापरणार 'मुस्लीम कार्ड', विधानसभा निवडणुकीत 'या' जागांवर देणार उमेदवार