नाशिक लोकसभा मतदार संघ कोणाच्या वाट्याला जाणार याबाबत अनेक दिवसापासून शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये रस्सीखेच सुरू होती. अन्न नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ या मतदार संघातून इच्छुक होते. तर शिवसेना शिंदे गटा कडून हेमंत गोडसे आग्रही होते. मात्र आता या जागे बाबतचा सस्पेन्स छगन भुजबळांनीच दुर केला आहे. या मतदार संघातून निवडणूक लढणार की नाही याची घोषणाच त्यांनी केली आहे. मात्र असं असलं तरी त्यांच्या एका वाक्यामुळे शिंदे गटाचे टेन्शन मात्र त्यांनी वाढवलं आहे. मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
छगन भुजबळांची मोठी घोषणा
नाशिक लोकसभा मतदार संघातून निवडणूक लढण्याची इच्छा छगन भुजबळ यांनी व्यक्त केली होती. मात्र आता या निवडणुकीतून आपण माघार घेत आहोत अशी घोषणा भुजबळांनी केली आहे. नाशिकमधून लोकसभेची निवडणूक आपण लढणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. एकीकडे महाविकास आघाडीने आपला उमेदवार जाहीर केला आहे. जवळपास तिन आठवडे त्यांचा प्रचार सुरू आहे. मात्र महायुतीचा उमेदवार जाहीर होत नव्हता. यामुळे महायुतीचं नुकसान होत होतं. याचा विचार करून आपण हा निर्णय घेतला असल्याचे भुजबळ यांनी सांगितले.
भुजबळांच्या एका वाक्याने टेन्शन वाढलं
मी निवडणुकीच्या रिंगणातून माघार घेतली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने माघार घेतलेली नाही. मी उमेदवार नसेल पण राष्ट्रवादीचा दुसरा कोणी उमेदवार असू शकेल असं वक्तव्य करत भुजबळांनी गुगली टाकली आहे. त्यामुळे एकीकडे माघार घेताना भुजबळांनी ही जागा कोणाच्या वाट्याला जाणार याबाबत मात्र सस्पेन्स कायम ठेवला आहे. यामुळे शिंदे गटाचे टेन्शन अजून वाढले आहे.
हेही वाचा - दुपारी 1 वाजेपर्यंत गडचिरोलीत 41.01 टक्के तर नागपूरात 28.75 टक्के मतदान
मोदी शहांचा होता आग्रह
नाशिकमधून छगन भुजबळांनीच निवडणूक लढली पाहीजे असा आग्रह अमित शहांचा होता असे भुजबळांनी सांगितले. दिल्लीत अमित शहा यांच्या बरोबर प्रफुल्ल पटेल, अजित पवार, तटकरे यांची बैठक झाली होती. त्या बैठकीत हा प्रस्ताव ठेवण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले. यामतदार संघात भाजपचे तिन आमदार आहेत. त्यामुळे ही जागा आपल्याला देण्याचेही ठरले होते. पण त्यावर तोडगा निघू शकला नाही. शेवटी आपण इथून माघार घेत असल्याचे भुजबळ म्हणाले. आपले नाव सुचवल्या बद्दल मोदी आणि शहांचे आभार ही त्यांनी मानले.
हेही वाचा - नाशिकचा तिढा सुटला, महायुतीमधील 'हा' पक्ष लढवणार निवडणूक?
लवकर उमेदवारी जाहीर करा
भुजबळांनी आपली उमेदवारी मागे घेण्याची घोषणा केली. त्यानंतर आता महायुतीने आपला उमेदवार तातडीने जाहीर करावा अशी मागणी त्यांनी केली आहे. जो उमेदवार जाहीर होईल त्याचा आपण प्रचार करून, त्यांना निवडून आणण्याचा प्रयत्न करू असेही ते म्हणाले. ही जागा शिंदे गटाला जाणार हे जवळपास आता निश्चित झाले आहे. इथून विद्यमान खासदार हेमंत गोडसेंना उमेदवारी मिळण्याची दाट शक्यता आहे. पण भुजबळांनी आपण निवडणूक लढवणार नाही हे स्पष्ट केले असले तरी राष्ट्रवादीचा दुसरा कोणी उमेदवार असू शकतो असेही वक्तव्य केले आहे.
हेही वाचा - बारामतीची निवडणूक अमेरिकेपर्यंत पोहोचली, 2 दिवसांपासून... सुप्रिया सुळेंचा गौप्यस्फोट
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world