- भाजपच्या १२ पदाधिकाऱ्यांना पक्षाशी बंडखोरी केल्यामुळे निलंबित करण्यात आले आहे.
- निलंबित पदाधिकारी अपक्ष किंवा इतर पक्षातून निवडणूक लढवत असल्यामुळे पक्षाचे प्राथमिक सदस्यत्व रद्द करण्यात आले
- पक्षाच्या धोरणांचे उल्लंघन करणाऱ्या पदाधिकाऱ्यांवर ही कारवाई करण्यात आली आहे.
राहुल कांबळे
पक्षाशी बंडखोरी करून निवडणूक लढवणाऱ्या भाजपच्या 12 पदाधिकाऱ्यांना पक्षातून निलंबित करण्यात आले आहे. अशी माहिती भाजपचे नवी मुंबईचे जिल्हा अध्यक्ष डॉ. राजेश पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली. या वेळी डॉ. राजेश पाटील म्हणाले की, हे पदाधिकारी पक्षाशी बंडखोरी करून अपक्ष किंवा अन्य पक्षातून निवडणूक लढवत आहेत. त्यांना वरिष्ठांच्या आदेशानुसार भाजपमधून निलंबित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. शिवाय कुणावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे हे ही स्पष्ट करण्यात आले आहे. ज्या कार्यकर्त्यांवर कारवाईचा बडगा उभारण्यात आला आहे. भास्कर यमगर, जयश्री चित्रे, जयेश थोरवे, संपत शेट्टी, सी. व्ही. रेड्डी, मंगल घरात, पांडुरंग आमले, सुहासिनी नायडू, दत्ता घंगाळे, अश्विनी घंगाळे, सीमा घाग आणि अलका शर्मा यांचा समावेश आहे. पक्षाच्या स्थापनेपासून पक्षाशी एकनिष्ठ असणाऱ्या पदाधिकाऱ्यांना उमेदवारी देताना डावलल्याने रा. स्व. संघ आणि पक्षाचे जुने कार्यकर्ते पदाधिकारी यांच्यामध्ये संतापाची भावना आहे. असे असताना आता या पदाधिकाऱ्यांना पक्षातून निलंबित करण्यात आल्याने त्याचा भाजपला कोणताही फटका बसणार नाही असं ही पक्षाने स्पष्ट केलं आहे.
या कारवाईचा सकारात्मकच परिणाम होईल, असा दावा पाटील यांनी या वेळी केला. नवी मुंबई महानगरपालिका निवडणुकीमध्ये पक्षाचे पदाधिकारी असताना पक्षशिस्त, धोरणे आणि निर्णय यांचे पालन होणे अपेक्षित होते. तथापि या पदाधिकाऱ्यांच्या कार्यपद्धतीमुळे पक्षाच्या प्रतिमेला आणि संघटनात्मक शिस्तीला बाधा होत असल्याचे निदर्शनास आले. या संदर्भात वरिष्ठांशी चर्चा करून या पदाधिकाऱ्यांचे पक्षाचे प्राथमिक सदस्यत्व तसेच सध्या भूषवत असलेली सर्व पदे समाप्त करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे असं डॉ. राजेश पाटील यांनी स्पष्ट केलं.
हा निर्णय पक्ष हित व संघटनात्मक शिस्त लक्षात घेऊन घेण्यात आला आहे. या निवडणुकीत 111 उमेदवार आहेत आणि 957 जण इच्छुक होते. पक्षाच्या माध्यमातून करण्यात आलेल्या सर्व्हेक्षणमध्ये निवडून येण्याचा निकष महत्त्वाचा होता. त्यामुळे अशाच उमेदवारांना उमेदवारी देण्यात आली. एका घरात अनेक तिकिटे देण्यासंदर्भात देखील वरील निकष वापरण्यात आला. यासंदर्भात एक परिवार एक तिकीट असे पक्षाचे धोरण असले, तरी स्थानिक पातळीवरील या निवडणुकीमध्ये हे धोरण शिथिल करण्यात आले आहे. मुंबईच्या विकासावर जनतेने उत्तम प्रतिसाद देत आहेत. सध्या नवी मुंबईतील काही ठिकाणी पक्षाचे पदाधिकारी अपक्ष आणि शिवसेनेच्या उमेदवारांचा प्रचार करत आहेत. या संदर्भात आमच्याकडे तक्रारी आल्यावर त्यांच्यावर देखील कारवाई करण्यात येणार आहे, असे पाटील यांनी स्पष्ट केले.
विधानसभा निवडणुकीमध्ये संदीप नाईक यांनी बंडखोरी करून निवडणूक लढवली त्यांना देखील निलंबित करण्यात आले होते. त्यानंतर त्यांनी पुन्हा पक्षामध्ये घेण्याची मागणी केली होती. त्यानुसार पक्षश्रेष्ठींनी अन्य पक्षांच्या पदाधिकाऱ्यांना पक्षांमध्ये घेण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार संदीप नाईक यांना देखील पक्षात घेण्यात आले आहे. सध्या निलंबित करण्यात आलेल्या पदाधिकाऱ्यां विषयी भविष्यात काय निर्णय होईल हे सध्या सांगता येणार नाही, असे डॉ. राजेश पाटील यांनी स्पष्ट केले. आम्हाला जनतेचा वाढता पाठिंबा असून मोठ्या संख्येने आमचे उमेदवार निवडून येतील. आम्ही बहुमत मिळवू, असा विश्वास पाटील यांनी या वेळी व्यक्त केला.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world