- मंचर नगरपंचायतीच्या निवडणुकीत आम आदमी पार्टीच्या उमेदवाराला फक्त एक मत मिळाले आहे.
- उमेदवार सलीम बशीर इनामदार यांनी मतदान प्रक्रियेवर अविश्वास व्यक्त केला आहे.
- ते या निकाला विरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करणार आहेत.
अविनाश पवार
ईव्हीएमबाबत वेळोवेळी शंका उपस्थित केल्या जात असतात. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी मतांची चोरी होत असल्याचा मुद्दा राष्ट्रीय पातळीवर उपस्थित केला होता. त्याची मोठ्या प्रमाणात चर्चाही झाली. मात्र नुकत्याच पार पडलेल्या नगरपरिषद आणि नगरपंचायतीच्या निवडणुकांमध्ये अशा स्वरूपाचे आरोप फारसे समोर आले नव्हते. अशातच पुणे जिल्ह्यातील मंचर नगरपंचायतीच्या निवडणुकीत एक वेगळाच प्रकार समोर आला आहे. इथं उमेदवाराने गेली मतं कुणीकडे? असा प्रश्न उपस्थित केला आहे. त्याला कारण ही तसेच आहे. त्याला जी मतं मिळाली ते पाहून तो हादरला आहे. त्यामुळेच त्याने वोट चोरीचा आरोप तर केलाच आहे पण त्याच बरोबर मुंबई हायकोर्टाचा दरवाजा ही ठोठावण्याचा निर्णय घेतला आहे.
सलीम बशीर इनामदार यांनी मंजर नगरपालिकेची निवडणूक लढवली होती. त्यांनी आम आदमी पार्टीच्यावतीने ही निवडणूक लढवली. मात्र निवडणूक निकालानंतर त्यांच्या पदरात निराशा पडली आहे. त्यांचा या निवडणुकीत दारूण पराभव झाला आहे. पण पराभवा पेक्षा ही त्यांना मोठा धक्का आहे तो म्हणजे त्यांना मिळालेल्या मतांचा. सलीम यांना फक्त 1 मत मिळालं आहे. त्यामुळे त्यांनी या निवडणूक प्रक्रीयेवर अविश्वास दाखवला आहे.
सलीम म्हणाले की निवडणूक प्रचार काळात आपल्या घरात काही अडचण निर्माण झाली होती. त्यामुळे हवा तसा प्रचार आपल्याला करता आला नाही. त्यामुळे आपला पराभव झाला असेल. पण मला केवळ एक मत मिळालं हे आपलं मन मानायला तयार नाही असं ही त्यांनी सांगितलं. ते म्हणाले माझ्या घरात चार मतं हक्काची आहेत. त्यांनी मलाच मतदान केलं आहे. शिवाय एक जवळचा मित्र आहे त्यांने ही मलाच मतदान केलं. त्यामुळे पाच मतं ही कन्फर्म होती. असं असताना एक मत कसं काय मिळू शकतं? मला मिळालेली 4 मतं कुठे गेली असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे.
त्यांनी उपस्थित केलेल्या प्रश्ना मुळे नगरपालिका निवडणुकीत ही मत चोरी झाली आहे की काय अशी चर्चा सुरू झाली आहे. जर आपल्याला 15-20 मतं मिळाली असती तरी आपल्याला जनतेने नाकारले आहे हे समजलो असतो. शिवाय पराभव ही स्विकारला असता. पण हक्काची मतं ही दाखवली जात नसतील तर या प्रक्रीयेबाबत शंका उपस्थित होते असं सलीम यांनी सांगितले. निकालानंतर घरात चर्चा झाली. घरातल्या मंडळींनी ही हीच शंका उपस्थित केली आहे. त्यामुळे या निकाला विरोधात आपण मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world