जाहिरात
This Article is From May 03, 2024

'लोकसभेनंतर शिंदे परिवार भाजपमध्ये जाणार' आंबेडकरांच्या दाव्याने खळबळ

'लोकसभेनंतर शिंदे परिवार भाजपमध्ये जाणार' आंबेडकरांच्या दाव्याने खळबळ
सोलापूर:

वंचितचे नेते प्रकाश आंबेडकर हे आपल्या वक्तव्यामुळे नेहमीच चर्चेत असतात. त्यांनी केलेल्या एका विधानामुळे आता राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. लोकसभा निवडणूक झाल्यानंतर शिंदे परिवार भाजपमध्ये प्रवेश करेल असा खळबळ जनक दावा त्यांनी केला आहे. शिवाय शिंदे भाजपमध्ये का जातील याचे कारणही त्यांनी सांगितले आहे. निवडणूक ऐन रंगात असताना, आरोप-प्रत्यारोप होत असताना, विजयाचे दावे केले जात असताना आंबेडकरांच्या या विधानाने राजकीय वातावरण मात्र ढवळून निघाले आहे. 

'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

आंबेडकरांनी कोणत्या शिंदेंचे नाव घेतले?      

लोकसभेची रणधुमाळी सध्या सुरू आहे. त्यात शिंदे कुटुंब निवडणुकीनंतर भाजपात प्रवेश करेल असे खळबळजनक विधान प्रकाश आंबेडकर यांनी केलं. त्यामुळे भाजपमध्ये जाणारं शिंदे कुटुंब नक्की कोणतं याची चर्चा सुरू झाली आहे. ते शिंदे कुटुंब म्हणजे सुशिलकुमार शिंदे यांचे आहे. सोलापूर इथे प्रकाश आंबेडकर हे प्रचारासाठी आले होते. त्यावेळी त्यांनी हे विधान केले. लोकसभा निवडणुकीनंतर काँग्रेसच्या सुशिलकुमार शिंदे परिवाराची चौकशी सुरू होईल. ते स्वतःला वाचवण्यासाठी भाजपमध्ये प्रवेश करतील असा दावाही आंबेडकर यांनी केला आहे. अपक्ष उमेदवार अतिश मोहन बनसोडे यांना वंचितने सोलापूरमध्ये पाठिंबा दिला आहे. त्यांच्या प्रचारावेळी ते बोलत होते. 

हेही वाचा - बीड लोकसभा : मुंडेंच्या गडाला पवार हादरा देणार का? 

मुस्लिम मतांसाठी फिल्डींग?  

वंचित बहुजन आघाडीची मतं ही आमच्या सोबतच राहतील असा विश्वास प्रकाश आंबेडकरांनी व्यक्त केला आहे. वंचितच्या अधिकृत उमेदवाराने सोलापूरमधून माघारी घेतली होती. त्यानंतर आंबेडकरांनी अपक्ष उमेदवाराल पाठिंबा जाहीर केला. त्यावेळी ते बोलत होते. मागील लोकसभा निवडणुकीत सुमारे अडीच लाख मुस्लिम मते ही काँग्रेसला मिळाली होती. ती मतं जर वंचित बहुजन आघाडीला मिळाली तर वंचित भाजप आणि काँग्रेसला हरवू शकले असते. त्यामुळे मुस्लिम समाजाने विचारपूर्वक मतदान करावे असे आवाहन त्यांनी केले. काँग्रेस आणि भाजपने देशांमध्ये मुस्लिम उमेदवार का दिला नाही? असा प्रश्न ही त्यांनी उपस्थित केला.

'शिंदेंनी संपत्ती लपवली' 

शिंदे परिवार भाजपमध्ये जाईल हा दावा केल्यानंतर आंबेडकरांनी आणखी एक आरोप केला आहे.  शिंदे यांनी निवडणुकीत दिलेल्या प्रतिज्ञापत्रांमध्ये देशात आणि विदेशातील संपत्ती लपवली आहे. तसेच त्यांच्यावरील गुन्ह्याचा उल्लेख त्यात नाही. त्यामुळे या निवडणुकीनंतर त्यांची चौकशी सुरू होईल आणि स्वतःला वाचवण्यासाठी त्यांना भाजप शिवाय पर्याय नाही असे आंबेडकर म्हणाले.

Listen to the latest songs, only on JioSaavn.com