मुंबईत पाचव्या टप्प्यात मतदान होत आहे. 20 मे ला मुंबईच्या सहा लोकसभा मतदार संघात मतदान होईल. त्या आधी मुंबईत दिग्गजांच्या सभांचा धडाका मुंबईकरांना अनुभवायला मिळणार आहे. शुक्रवारी संध्याकाळी शिवाजी पार्कमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी जाहीर सभा घेणार आहेत. विशेष म्हणजे त्याच मंचावर राज ठाकरेही असणार आहेत. तर दुसरीकडे इंडिया आघाडीचीही सभा होत आहे. या सभेला उद्धव ठाकरे आणि अरविंद केजरीवाल संबोधित करतील. त्यामुळे दोन्हीकडे जोरदार शक्तिप्रदर्शन होणार हे निश्चित आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
मोदींच्या मंचावर ठाकरे
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी मुंबईत येत आहे. त्याची शिवाजी पार्कवर सभा होत आहे. शिवाजी पार्कवरच्या आजपर्यंतच्या सभा या ऐतिहासिक ठरल्या आहेत. त्यामुळे ही सभाही ऐतिहासिक ठरावी यासाठी महायुतीने जय्यत तयारी केली आहे. ही सभा तशी महायुतीसाठी खास असणार आहे. त्याला कारण म्हणजे मुंबईत येऊन मोदींच्या मंचावर ठाकरे नाहीत. पण यावेळी या मंचावर ठाकरे असणार आहेत. ते म्हणजे राज ठाकरे. राज ठाकरे हे पहिल्यांदाच मोदीं बरोबर एका मंचावर दिसतील. या आधीच्या शिवाजी पार्कवरच्या सभा राज ठाकरे यांनी एक हाती गाजवल्या आहेत. त्यामुळे मोदीं समोर राज ठाकरे काय बोलणार याची उत्सुकता सर्वांनाच आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार, रामदास आठवलेही उपस्थित राहाणार आहेत.
हेही वाचा - तेव्हा ही अक्कल का आली नाही ? करकरेंच्या मृत्यूवरून प्रश्न विचारणाऱ्या काँग्रेसला राज ठाकरेंचा सवाल
उद्धव ठाकरेंच्या जोडीला केजरीवाल
एकीकडे महायुतीची सभा शिवाजी पार्कवर होत असताना दुसरीकडे बीकेसीमध्ये महाविकास आघाडीची सभा होत आहे. यासभेला शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे संबोधित करणार आहेत. त्यांच्या बरोबर अरविंद केजरीवालही असणार आहे. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेही उपस्थित असतील. केजरीवाल यांना जामीन मिळाल्यानंतर ते पहिल्यांदाच मुंबईत आले आहेत. त्यामुळे एककडे मोदींची सभा सुरू असताना दुसरीकडे केजरीवाल मोदींवर टिकेचे बाण सोडणार हे निश्चित आहे. त्यामुळे या दोघांची जुगलबंदी मुंबईकरांना पाहायला मिळणार आहेत. त्यात उद्धव ठाकरें आपल्या ठाकरी शैलीत कोणाचा समाचार घेणार याचीही सर्वांना उत्सुकता आहे.
हेही वाचा - मुंबईतील 'या' लोकसभा मतदारसंघात उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदेंची प्रतिष्ठा पणाला
मोदींच्या रडारवर कोण?
नरेंद्र मोदी यांच्या महाराष्ट्रात अनेक सभा झाल्या आहेत. या सभांमधून त्यांनी शरद पवार, उद्धव ठाकरे यांना लक्ष केलं आहे. शरद पवारांनी ही मोदींना जशाच तसे उत्तर दिले आहे. मोदींकडे सांगण्या सारखे काही नाही त्यामुळे ते काहीही बोलत आहेत. त्यांची सत्ता जाणार आहे याची चाहूल त्यांना लागली आहे असे प्रत्युतर दिले होते. पवारांच्या या वक्तव्याला मोदी काय उत्तर देतात त्याकडेही सर्वांचे लक्ष लागले आहे. तर मोदींनी बाळासाहेबांचा अपमान केल्याचा आरोप केला होता. त्यालाही मोदी कसे उत्तर देतात याची उत्सुकता आहे. तर ठाकरे पवार पुन्हा एकदा बीकेसीच्या मैदानातून मोदींवर कोणत्या आरोपांच्या फैरी झाडतात हे पाहावं लागणार आहे. शिवाय केजरीवाल यांनी मोदी अमित शहांसाठी मतं मागत आहेत. ते निवृत्त होणार आहेत असा गौप्यस्फोट केला होता. त्यालाही मोदींना उत्तर द्यावं लागणार आहे.