लोकसभा निवडणुकीचे हिशोब विधानसभा निवडणुकीत चुकते करण्यासाठी आता रवी राणा पुढे सरसावले आहेत. विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची घोषणा करण्यात आली आहे. त्यात अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर या राखीव मतदार संघातून अभिजीत अडसूळ यांना शिवसेना शिंदे गटाने उमेदवारी जाहीर केली आहे. मात्र अभिजित अडसूळ यांना उमेदवारी जाहीर केल्याचा आनंद जास्त वेळा राहीला नाही. या मतदार संघात मित्र पक्षानेच अडसूळांना घेरण्याची रणनिती आखली आहे. युवा स्वाभिमान पक्षाचे आमदार रवी राणा यांनी या निमित्ताने लोकसभेचे हिशोब विधानसभेला चुकते करण्यासाठी कंबर कसली आहे.
( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
महायुतीत दर्यापुरची जागा ही शिवसेना शिंदे गटाला गेली आहे. या मतदार संघातून अभिजीत अडसूळ यांना उमेदवारीही जाहीर करण्यात आली आहे. त्याच वेळी युवा स्वाभिमान पक्षाने भाजपचे माजी आमदार रमेश बुंदिले यांना आपल्या पक्षात घेतले आहे. त्यामुळे महायुतीत इथे बंडखोरी होणार हे निश्चित आहे. तसे स्पष्ट संकेतही युवा स्वाभिमानचे प्रमुख रवी राणा यांनी दिले आहेत. लोकसभा निवडणुकीत नवनीत राणा यांचा पराभव व्हावा यासाठी अडसूळ पिता पुत्राने काम केल्याचा राग रवी राणा यांच्या मनात आहे. त्यामुळे हा हिशोब विधानसभेला चुकता करण्यासाठी ते पुढे सरसावले आहेत.
या निमित्ताने रवी राणा यांनी आनंदराव अडसूळ आणि अभिजीत अडसूळ यांच्यावर टिकेची झोड उठवली आहे. आनंदराव अडसूळ आणि अभिजीत अडसूळ या पिता पुत्राने मुख्यमंत्र्यांना ब्लॅकमेल करत एबी फॉर्म आणला आहे असा आरोप त्यांनी केलाय. अभिजीत अडसूळ हे जरी महायुतीचे उमेदवार असले तरी त्यांच्या विरोधात भाजप आणि युवा स्वाभिमानचे कार्यकर्ते एकवटले आहेत. असे रवी राणा यांनी सांगितले. त्यांनी नुकताच दर्यापूरमध्ये कार्यकर्त्यांचा मेळावा घेतला. त्यावेळी ते बोलत होते. शिवाय दर्यापूरमध्ये रमेश बुंदिले हे उमेदवार असतील असेही जाहीर करून टाकले. त्यामुळे महायुतीत या मतदार संघात बंडखोरी अटळ आहे
या मेळाव्यात बोलताना रवी राणा यांनी अडसूळांवर सडकून टिका केली. मुंबईतल्या कांदिवलीतून येऊन दर्यापुरात जर कोणी इलेक्शन लढवत असेल तर हे पार्सल हे आम्हाला चालणार नाही.अशा शब्दात त्यांनी अभिजीत अडसूळ यांच्या उमेदवारीला विरोध दर्शवला आहे. निवडणुका आल्या तरी अशी काही बेडकं बाहेर यायला सुरूवात होतात. अभिजीत अडसुळांसारखं बेडुक पाच वर्षात गायब होणार आहे अशी बोचरी टिकाही त्यांनी केली.
ट्रेंडिंग बातमी - लोकसभेतील मैत्री विधानसभेत तुटली! मुंबईतील जागांवरुन शिंदे-ठाकरे, आमने-सामने
रमेश बुंदिले हे दर्यापूरचे युवा स्वाभिमानचे उमेदवार असतील. त्यांना निवडून आणणार आहे. त्यासाठी वरिष्ठांचे आशिर्वादही घेतले आहे. भाजपचे नेतेही आमच्या सोबत आहेत. त्याचाही आशिर्वाद आम्हालाच आहे. देवेंद्र फडणवीस यांनीही आशीर्वाद दिले आहेत असे विधान रवी राणा यांनी यावेळी केले. मीडियावाल्यांनाही सांगतो, जास्त काही दाखवायचं नाही. मतदार संघाच्या विकासाचा विषय आहे. भोळ्या भाबड्या जनतेच्या भविष्याचा विषय आहे. यांना ठगणार कोणी येत असेल तर त्यांना जागा दाखवायचं काम करायचं आहे, असंही ते यावेळी म्हणाले.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world