जाहिरात
This Article is From May 10, 2024

.... तर ही वेळ आलीच नसती! रवींद्र वायकरांनी सांगितलं पक्ष सोडण्याचं कारण

उत्तर पश्चिम मुंबई लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार रवींद्र वायकर (Ravindra Waikar) यांची नाराजी उघड झाली आहे.

.... तर ही वेळ आलीच नसती! रवींद्र वायकरांनी सांगितलं पक्ष सोडण्याचं कारण
रवींद्र वायकर यांनी पक्ष का सोडला याचं कारण सांगितलं आहे. (फोटो - @RavindraWaikar)
मुंबई:

मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार रवींद्र वायकर (Ravindra Waikar) यांची नाराजी उघड झाली आहे. शिवसेनेत फूट पडल्यानंतर वायकर हे उद्धव ठाकरे यांच्या गटात होते. मात्र लोकसभा निवडणुकीपूर्वी त्यांनी शिवसेनेच्या एकनाथ शिंदे गटात प्रवेश केला.  मी अडचणीत असताना पक्ष नेतृत्त्वानं आपल्याला साथ दिली नाही, असा दावा  वायकर यांनी 'NDTV मराठी' शी बोलताना केला आहे. आमचे नेते पाठिशी उभे राहिले असते तर ही वेळ आलीच नसती असं त्यांनी सांगितलंय. 

( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )
 

माझं नाव चुकीच्या प्रकरणात गुंतवण्यात आलं होतं. त्यावेळी आमच्या नेतृत्त्वानं पाठिशी राहणं गरजेचं होतं, हे मला सांगायचं होतं. मी तिकडं असताना काय परिस्थिती होती हे सांगितलं. आता तो विषय माझ्यासाठी संपला आहे. आता जिंकण्यासाठीच लढायचं आहे, असं वायकर यांनी स्पष्ट केलं. 

यापूर्वी वायकर यांनी एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीमध्ये जेल किंवा पक्ष बदलणे हे दोन मार्ग होते, असा दावा केला होता. चुकीच्या प्रकरणात माझं नाव गोवलं गेलं. माझ्यावर दबाव होता. बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेत 50 वर्ष घालवल्यानंतर उद्धव ठाकरे यांची साथ मला सोडावी लागली. जड अंत:करणाने मी पक्ष बदलला, नियतीनं ही वेळ कुणावरही आणू नये, असं वायकर यांनी या मुलाखतीमध्ये म्हंटलं होतं. ऐन निवडणुकीच्या रणधुमाळीत वायकर यांनी हे वक्तव्य केल्यानं खळबळ उडाली होती. आता 'NDTV मराठी' सोबत बोलताना त्यांनी हा विषय आपल्यासाठी संपला असल्याचं सांगत सारवासारव केली आहे. 

( नक्की वाचा : ठाण्याचा गड कोण राखणार? ठाकरेंचा 'निष्ठावंत' की शिंदेंचा 'शिलेदार' )

रवींद्र वायकर यांचा उत्तर पश्चिममध्ये अमोल कीर्तिकर यांच्याशी सामना होतोय. रवींद्र वायकर हे जोगेश्वरी पूर्व विधानसभा मतदारसंघातील आमदार आहेत. ते लोकसभेची निवडणूक पहिल्यांदाच लढवत आहेत. त्यांचे प्रतिस्पर्धी अमोल कीर्तिकर हे उत्तर पश्चिमचे विद्यमान खासदार गजानन कीर्तिकर यांचे पूत्र आहेत. 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com