जाहिरात
This Article is From Apr 20, 2024

छत्रपती संभाजीनगरमध्ये महायुतीचं ठरलं! विश्वासू सहकाऱ्याची मुख्यमंत्र्यांकडून निवड

Chhatrapati Sambhaji Nagar Lok Sabha : छत्रपती संभाजीनगरमधील महायुतीचा उमेदवार जाहीर झाला आहे.

छत्रपती संभाजीनगरमध्ये महायुतीचं ठरलं! विश्वासू सहकाऱ्याची मुख्यमंत्र्यांकडून निवड
मुंबई:

Chhatrapati Sambhaji Nagar Lok Sabha : छत्रपती संभाजीनगरमधून कोण लढणार? हा महायुतीमधील प्रश्न अखेर सुटला आहे. संभाजीनगरमधून शिवसेनेकडून संदिपान भुमरे यांना उमेदवारी जाहीर झालीय. शिवसेनेकडून त्यांना अधिकृत उमेदवारी जाहीर झालीय.  त्यामुळे इथून इम्तियाज जलील विरुद्ध चंद्राकांत खैरे विरुद्ध संदिपान भुमरे अशी तिरंगी लढत होणार आहे. भुमरे हे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पैठणचे आमदार आहेत. एकनाथ शिंदे यांच्या मंत्रिमंडळात ते रोजगार हमी योजना मंत्री आहेत. 

Latest and Breaking News on NDTV

2 शिवसैनिकांमध्ये 'सामना'

मुंबई आणि कोकणाच्या बाहेर छत्रपती संभाजीनगरमध्ये शिवसेनेनं सर्वप्रथम बस्तान बसवलं होतं. शिवसेनेतील फुटीनंतर माजी खासदार चंद्रकांत खैरे हे उद्धव ठाकरे यांच्यासोबतच आहेत. महाविकास आघाडीकडून खैरे यांना यापूर्वीच उमेदवारी जाहीर झालीय. महायुतीकडून उमेदवार ठरत नव्हता. भारतीय जनता पक्षानंही या जागेवर दावा केल्यानं येथील तिढा वाढला होता. अखेर हा तिढा सुटला असून ही जागा शिवसेनेकडं ठेवण्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना यश आलंय. आता संभाजीनगरमध्ये खैरे आणि भुमरे या दोन मुळ शिवसैनिकांमध्येच सामना होणार आहे.

संदीपान भुमरे 25 एप्रिल रोजी अर्ज भरतील अशी शक्यता आहे. संभाजीनगरमध्ये लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यात 13 मे रोजी मतदान होणार आहे. AIMIM पक्षाचे विद्यमान खासदार इम्तियाज जलील देखील पुन्हा रिंगणात असल्यानं इथं तिरंगी लढत होणार आहे.

( नक्की वाचा : नांदेडमध्ये चिखलीकर मैदानात प्रतिष्ठा मात्र चव्हाणांची पणाला )

काय आहे इतिहास?

छत्रपती संभाजीनगरमध्ये 1989 साली शिवसेनेचे मोरेश्वर सावे निवडून आले होते. त्यानंतर 2019 पर्यंत 1998 मधील अपवाद वगळता या मतदारसंघावर शिवसेनेचं वर्चस्व होतं. चंद्रकांत खैरे हे येथून 4 वेळा खासदार होते. गेल्या निवडणुकीत इम्तियाज जलील यांनी त्यांचा 5 हजारांपेक्षा कमी मतांनी पराभव केला होता. त्या निवडणुकीत अपक्ष उमेदवार हर्षवर्धन जाधव यांनी 2 लाख 83 हजार 798 मतं घेत खैरेंच्या पराभवात निर्णायक भूमिका बजावली होती. 
 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com