जाहिरात
This Article is From Apr 18, 2024

नातं आधी राजकारण नंतर, शिंदेंचा माजी नगरसेवक करतोय विरोधी उमेदवाराचा प्रचार

कल्याणमध्ये शिवसेनेच्या शिंदे गटाचे माजी नगरसेवक आणि विधानसभा संघटक संजय पाटील यांनी बाळ्यामामा म्हात्रे यांचा प्रचार सुरु केला आहे. यामुळे स्थानिक राजकीय वर्तुळाच चर्चेला उधाण आलं आहे.

नातं आधी राजकारण नंतर, शिंदेंचा माजी नगरसेवक करतोय विरोधी उमेदवाराचा प्रचार
कल्याण:

महाराष्ट्रात सध्या सर्वत्र लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. नेत्यांचे आरोप-प्रत्यारोप, आश्वासन या सर्व गोष्टींमुळे राज्याचं राजकीय वातावरणही चांगलंच तापलं आहे. या निवडणुकीत अनेक मतदारसंघांमध्ये नात्यांचं राजकारणही पहायला मिळत आहे. काही मतदारसंघात नणंद-भावजय, तर काही मतदारसंघात दीर-वहिनी समोरासमोर आहेत. भिवंडी लोकसभा मतदारसंघातही लोकसभा रणधुमाळीत नात्यांची एक अनोखी गुंतागुंत पहायला मिळते आहे. महायुतीने भिवंडी मतदारसंघात विद्यमान खासदार आणि केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांना पुन्हा उमेदवारी दिली आहे. त्यांच्याविरोधात राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाने बाळ्यामामा म्हात्रे यांना उमेदवारी दिली आहे.

बाळ्यामामांचा जोरदार प्रचार, शिंदेच्या नगरसेवकाचीही मिळतेय साथ -

कल्याणमध्ये शिवसेनेच्या शिंदे गटाचे माजी नगरसेवक आणि विधानसभा संघटक संजय पाटील यांनी बाळ्यामामा म्हात्रे यांचा प्रचार सुरु केला आहे. यामुळे स्थानिक राजकीय वर्तुळाच चर्चेला उधाण आलं आहे. संजय पाटील हे बाळ्यामामा यांचे व्याही असल्यामुळे त्यांनी थेट प्रचारात सहभाग घेतल्याची चर्चा सध्या रंगते आहे. शिंदे गटातील बड्या नेत्याने अद्याप याबद्दल प्रतिक्रीया दिलेली नाहीये. त्यामुळे या प्रकरणात पुढे नेमकं काय घडतं हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

अवश्य वाचा - 'तुम्हाला बाई खुणावेल, पण जायचं नाही', अमरावतीमध्ये बोलताना राऊतांची जीभ घसरली

कल्याणमधला वाद मिटला, भिवंडीत पेच अद्याप कायम -

काही दिवसांपूर्वी कल्याण-डोंबिवली लोकसभा मतदारसंघात महायुतीममध्ये धुसफुस समोर आली होती. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत झालेल्या वादानंतर भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी श्रीकांत शिंदे यांचा विरोध केला होता. परंतु गणपत गायकवाड यांच्या समर्थकांची समजूत काढण्यात भाजपच्या नेतृत्वाला यश आलं होतं. ज्यानंतर स्थानिक भाजप नेत्यांनी श्रीकांत शिंदे यांच्या पाठीशी उभं राहण्याचा निर्णय घेतला. परंतु कल्याण-डोंबिवलीप्रमाणे भिवंडीत मात्र चित्र आलबेल दिसत नाहीये. शिवसेना फुटीनंतर एकनाथ शिंदेंची कास धरलेल्या संजय पाटील यांनी नात्याला महत्व देत थेट विरोधी उमेदवार आणि व्याही बाळ्यामामा यांचा प्रचार केल्यामुळे उलटसुलट चर्चा होत आहेत.

भिवंडी लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी मिळवलेले बाळ्यामामा म्हात्रे हे आतापर्यंत आपल्या राजकीय कोलांटीउडीसाठी ओळखले जातात. मनसे, काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस अशा सर्व पक्षांमध्ये बाळ्यामामा यांनी आपलं नशीब आजमावलं आहे. भिवंडीतील मोठ्या प्रमाणात गोदामांच्या मालकी या बाळ्यामामांकडे आहेत. त्यामुळे यंदाच्या निवडणुकीत भिवंडीतून बाळ्यामामांचं स्वप्न पूर्ण होतं का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com