उत्तर प्रदेशातील नगीना लोकसभा निवडणुकीत भीम आर्मीचे नेते चंद्रशेखर यांचा 1 लाख 51 हजार मतांनी विजय झाला आहे. त्यांनी भाजपच्या ओम कुमार यांचा पराभव केला आहे. यंदा नगीना लोकसभा मतदारसंघ चंद्रशेखर यांच्या उमेदवारीमुळे चर्चेमध्ये आला होता.
उत्तर प्रदेशात लोकसभा निवडणुकीत बहुजन समाज पक्षाला मोठा धक्का बसला आहे. या निवडणुकीत एक नवा दलित चेहरा समोर आला आहे. बसपाला उत्तर प्रदेशात एक जागादेखील जिंकता आलेली नाही. दुसरीकडे आझाद समाज पार्टीचे चंद्रशेखर यांनी कोणत्याही राजकीय पक्षांच्या समर्थनाशिवाय नगीना जागेवर विजय मिळवला आहे. चंद्रशेखर यांनी नगीना या जागेवरून दीड लाखांहून जास्त लीड घेत विजय मिळवला आहे. यावरुन दलित मतांमधील बदल स्पष्टपणे दिसून येत आहे. या जागेवर असलेले बहुजन समाज पार्टीचे उमेदवार सुरेंद्र पाल सिंह यांना केवळ 3,61,079 मतं मिळाली आहेत.
चंद्रशेखर यांनी एकट्याने ही लढाई जिंकली. दोन दिवसांपूर्वीच ते म्हणाले होते की, सर्व पक्ष माझ्या विरोधात उभे राहिले, मात्र जनता माझ्यासोबत आहे. मला त्यांचं समर्थन मिळेल याचा विश्वास आहे.
नक्की वाचा - महाराष्ट्रातल्या भाजपाच्या पराभवाची 5 मोठी कारणं काय आहेत?
महाराष्ट्रातही विजयाचा उत्सव
आज धुळ्यात समाज पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आनंद लोंढे यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांनी संतोषी माता चौक परिसरात एकत्र जमत जोरदार घोषणाबाजी करत आनंद उत्सव साजरा केला. यावेळी कार्यकर्त्यांना एकमेकांना पेढे भरून चंद्रशेखर आझाद यांच्या विजयाचा जल्लोष साजरा केला. आझाद समाज पक्षाचे प्रमुख चंद्रशेखर आझाद निवडल्याने नक्कीच आंबेडकरी समाजाची मान उंचावली आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात जनतेचे विविध प्रश्न सोडवण्यासाठी आम्ही तत्पर राहू अशी प्रतिक्रिया आझाद समाज पक्षाचे प्रदेश अध्यक्ष आनंद लोंढे यांनी यावेळी दिली.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world