वर्धा लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते आणि माजी आमदार अमर काळे यांच्याविरोधात भाजपचे विद्यमान खासदार रामदास तडस यांच्यामध्ये लढत पाहायला मिळत आहे. महात्मा गांधी आणि आचार्य विनोबा भावे यांच्या विचारांचा जिल्हा म्हणून ओळख असलेल्या वर्ध्यात काँग्रेसचं वर्चस्व राहिलं आहे. दुसऱ्यांदा खासदार म्हणून निवडून आलेले रामदास तडस तिसऱ्यांदा भाजपच्या तिकिटावर निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. काँग्रेसचे माजी आमदार अमर काळे यांना राष्ट्रवादीच्या तुतारीवर उमेदवारी मिळाली आहे. त्यामुळे आता तुतारी वाजणार की कमळ फुलणार याकडे सर्वांचं लक्ष आहे.
तेली आणि कुणबी या दोन समाजाचं प्राबल्य असलेल्या वर्धा लोकसभा मतदारसंघात भाजपचे उमेदवार रामदास तडस हे तेली समाजाचे तर शरदचंद्र पवार गटाकडून उभे राहिलेले अमर काळे कुणबी समाजाचे आहे. कुणबी आणि तेली समाजाचं प्राबल्य असलं तरी दलित, आदिवासी आणि मुस्लीम लोकसंख्याही लक्षवेधी आहे.
वर्ध्यात कधी भाजप तर काँग्रेस असे खासदार निवडून आले आहेत. 1998 मध्ये येथे काँग्रेसचे दत्ता मेघे विजयी झाले होते. त्यांच्यानंतर 1999 मध्ये काँग्रेसच्या प्रभा राव यांनी विजय मिळवत या मतदार संघाचे प्रतिनिधीत्त्व केले. 2004 मध्ये भाजपचे सुरेश वाघमारे आणि 2009 मध्ये काँग्रेसचे दत्ता मेघे पुन्हा विजयी होऊन संसदेत पोहोचले होते.
नक्की वाचा - माजी पंतप्रधान पी व्ही नरसिंहरावांच्या रामटेक लोकसभा मतदारसंघात कोण उधळणार विजयाचा गुलाल?
वर्धा लोकसभा मतदारसंघातील सहा विधानसभा मतदारसंघांपैकी चार विधानसभा मतदारसंघात भाजपचे आमदार आहेत. तर अवघ्या एका मतदारसंघात काँग्रेसने विजय मिळवला. तर एका मतदारसंघात स्वाभिमानी पक्षाचा आमदार विजयी झाला होता.
काँग्रेसचा उमेदवार राष्ट्रवादीच्या चिन्हावर...
काँग्रेसचे आमदार अमर काळे यांनी शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकीटावर निवडणूक लढत आहेत. यासाठी अमर काळे यांनी शरदचंद्र पवार गटात प्रवेश केला. कुणबी समाजाचे प्रतिनिधित्व करत असलेल्या अमर काळे यांच्या मागे समाजाचा पाठिंबा उभा राहण्याची शक्यता आहे.
लोकसभा निवडणुकीदरम्यान रामदास तडस वादाच्या भोवऱ्यात
लोकसभा निवडणुकीचे वातावरण तापलेलं असताना वर्ध्यात भाजप खासदार रामदास तडस यांच्यावर त्यांच्या सूनेने धक्कादायक आरोप केले होते. तडस यांची सुन पूजा तडस यांनी सासऱ्यांसह पतीवरही गंभीर आरोप केले होते. पूजा तडस यांनी सासरे खासदार रामदास तडस आणि पती पंकज तडस यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. पंकज तडस यांनी बलात्काराच्या आरोपातून वाचण्यासाठी आपल्या बरोबर लग्न केले असा आरोप पूजा यांनी केला होता. त्यानंतर एका फ्लॅटवर आपल्याला टाकून देण्यात आले. त्यानंतर बाळ झालं. पण हे बाळ कोणाचं आहे अशी विचारणा करण्यात आली. डीएनए टेस्ट कर असेही सांगण्यात आले. घरी गेली असता रॉडने मारण्यात आले. ज्या फ्लॅटवर राहात होती तो विकून बेघर करण्यात आले असे एका मागोमाग एक गंभीर आरोप पूजा यांनी केले आहेत.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world