जाहिरात

विधान परिषद निवडणूक अटळ, कोणाचा गेम होणार?

विधान परिषदेची निवडणूक आता अटळ आहे. चुरशीच्या होणाऱ्या या निवडणुकीत कोणाचा गेम होणार आणि कोण विधान परिषद गाठणार याची उत्सुकता वाढली आहे.

विधान परिषद निवडणूक अटळ, कोणाचा गेम होणार?
मुंबई:

विधान परिषदेच्या 11 जागांसाठी 12 अर्ज दाखल झाले होते. उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा आज शुक्रवार शेवटचा दिवस होता. मात्र कोणत्याही उमेदवाराने उमेदवारी अर्ज मागे घेतला नाही. त्यामुळे विधान परिषदेची निवडणूक आता अटळ आहे. चुरशीच्या होणाऱ्या या निवडणुकीत कोणाचा गेम होणार आणि कोण विधान परिषद गाठणार याची उत्सुकता आता वाढली आहे. विधान परिषदेसाठी भाजपने 5, शिवसेना शिंदे गटाने 2, राष्ट्रवादी अजित पवार गटाने 2, तर काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना ठाकरे गटाने प्रत्येक 1 उमेदवार रिंगणात उतरवले आहे. या जागांसाठी 12 जुलैला मतदान होणार असून त्याच दिवशी मतमोजणी होणार आहे. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

विधान परिषद निवडणूक होणार 

विधान परिषदेच्या 11 जागांसाठी आता निवडणूक होणार हे निश्चित झाले आहे. 11 जागांसाठी 12 अर्ज आले होते. शुक्रवारी 5 जुलैला दुपारी 3 वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत होती. मात्र या कालावधीत एकानेही उमेदवारी अर्ज मागे घेतला नाही. त्यामुळे ही निवडणूक होणार हे आता निश्चित झाले आहे. ही निवडणूक 12 जुलैला होणार आहे. मतमोजणी त्याच दिवशी होणार आहे. विजयी होण्यासाठी प्रत्येक उमेदवाराला पहिल्या पसंतीची 23 मते गरजेची आहेत. भाजपचे पाच, काँग्रेस, शिवसेने शिंदे गट आणि अजित पवार गट यांचा प्रत्येक एक उमेदवार संख्या बळा नुसार सहज जिंकू शकतो. तर राष्ट्रवादी शरद पवार गट, शिवसेना ठाकरे गट यांना आपला उमेदवार जिंकून आणण्यासाठी मतांची जुळवा जुळव करावी लागणार आहे. तर शिंदे आणि अजित पवारांनाही आपल्या दुसऱ्या उमेदवारासाठी मतांची जुळवाजूळव करावी लागेल. 

ट्रेंडिंग बातमी - लय भारी!'लाडकी बहीण योजना' सातारा पॅटर्नची राज्यात चर्चा का?

कोण आहेत निवडणूक रिंगणात 

या निवडणुकीत महायुतीचे 9 उमेदवार तर महाविकास आघाडीचे 3 उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. त्यात भाजपच्या पाच उमेदवारांचा समावेश आहे. त्यात पंकजा मुंडे, सदाभाऊ खोत,परिणय फुके,अमित गोरखे आणि योगेश टिळेकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर काँग्रेसने प्रज्ञा सातव यांना मैदानात उतरवलं आहे. शिवसेना ठाकरे गटाने मिलिंद नार्वेकर यांना उमेदवारी दिली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने शेकापच्या जयंत पाटील यांना पाठिंबा दिला आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाने शिवाजीराव गर्जे आणि राजेश विटेकर यांना मैदानात उतरवले आहे. शिवसेना शिंदे गटाने माजी खासदार भावना गवळी आणि कृपाल तुमाने यांना संधी दिली आहे. 

ट्रेंडिग बातमी - Pune News : अखेर 47 दिवसांनंतर, दोघांचा जीव घेणाऱ्या अल्पवयीन मुलाने सादर केला 300 शब्दांचा निबंध!

कोणाचा गेम होणार? 

या निवडणुकीत कोणता पक्ष 23 मतांचा कोटा आपल्या उमेदवाराला देणार यावर सर्व गोष्ठी अवलंबून आहेत. संख्या बळा नुसार भाजपचे पाचही उमेदवार सहज विजयी होवू शकतात. तर काँग्रेसच्या प्रज्ञा सातव यांनाही कोणती अडचण नाही. काँग्रेसची अतिरीक्त मते मिलिंद नार्वेकरांच्या पारड्यात जाणार की जयंत पाटलांच्या यावर या दोघांचेही भवितव्य अवलंबून राहाणार आहे. शिवाय एकनाथ शिंदे आणि अजित पवार या दोघांनाही आपल्या दुसऱ्या उमेदवारासाठी मतांची बेगमी करावी लागेल. सध्याच्या स्थितीत सदाभाऊ खोत,शिवाजीराव गर्जे, कृपाल तुमाने, जयंत पाटील आणि मिलींद नार्वेकर यांच्या पैकी एक जण डेंजर झोनमध्ये असल्याची चर्चा विधीमंडळात रंगली आहे.