विधानसभा निवडणुकीसाठीचे मतदान पार पडले आहे. आता सर्वांना प्रतिक्षा आहे ती निकालाची. मात्र त्या आधी काही अंदाज व्यक्त केले जात आहेत. कोकणातल्या महत्वाच्या लढतींबाबतही काही अंदाज व्यक्त केले जात आहेत. स्थानिक पत्रकारांनी याबाबत आपले अंदाज व्यक्त केले आहेत. त्यातून कोकणात काही लढती या एकतर्फी होताना दिसत आहेत तर काही लढती या चुरशीने लढल्या जात असल्याचा अंदाज आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
श्रीवर्धन मतदार संघात कोण बाजी मारणार?
कोकणातील श्रीवर्धन मतदार संघाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या मतदार संघातून राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंत्री आदित तटकरे या रिंगणात आहेत. त्यांच्या विरोधात राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे अनिल नवगणे हे मैदानात आहेत. या जागेसाठी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. स्थानिक पत्रकारांनी या मतदार संघाचा निकाल काय लागेल याची शक्यता वर्तवली आहे. सात पत्रकारांनी याबाबत आपलं मत नोंदवलं आहे. त्यानुसार आदिती तटकरे या विजयी होतील असं मत सातही पत्रकारांनी व्यक्त केलं आहे. तर अनिल नवगणे यांच्या विजयाची शक्यता फार कमी लोकांनी व्यक्त केली आहे.
ट्रेंडिंग बातमी - महाराष्ट्रात कोल्हापूर जिल्ह्यात सर्वाधिक मतदान, सर्वात कमी मतदान कुठे?
गोगावले जिंकणार की पडणार?
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे जवळचे मानले जाणारे भरत गोगावले हे महाड विधानसभा मतदार संघातून निवडणूक लढत आहेत. त्यांच्या समोर माजी आमदार माणिक जगताप यांच्या कन्या स्नेहल जगताप यांनी आव्हान उभं केलं आहे. स्नेहल यांना शिवसेना ठाकरे गटाने उमेदवारी दिली आहे. या मतदार संघात सहा पत्रकारांच्या मते भरत गोगावले हे विजयी होतील. तर एक पत्रकाराने स्नेहल जगताप यांच्या पारड्यात मत टाकलं आहे. त्यामुळे इथं सहा विरुद्ध एक असं विजयाचं मत आहे.
भास्कर जाधव बाजी मारणार?
गुहागर मतदार संघ हा शिवसेना ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव यांचा गड मानला जातो. राज्यभर प्रचाराची धुरा सांभाळत भास्कर जाधव यांनी गुहागरमध्येही प्रचार केला होता. त्यांच्या विरोधात शिंदे गटाचे राजेश बेंडल मैदानात आहे. हा मतदार संघ भाजपला मिळावा यासाठी शेवटपर्यंत आग्रह होता. पण शेवटी तो शिवसेनेच्या पदरात पडला. त्यामुळे भाजप कार्यकर्त्यांत नाराजी होती. त्याचा थेट फायदा भास्कर जाधव यांना होईल असा अंदाज व्यक्त केला जात आहे. भास्कर जाधव जिंकतील असं या ठिकाणच्या सात पैकी पाच पत्रकारांना वाटत आहे. तर दोघांनी राजेश बेंडल जिंकतील असा अंदाज व्यक्त केला आहे.
ट्रेंडिंग बातमी - सट्टाबाजारात आघाडी की महायुती? एक्झिट पोलनंतर सट्टाबाजाराचा अंदाज काय?
उदय सामंत यांचं काय होणार?
रत्नागिरी विधानसभा मतदार संघातून उदय सामंत यांना पराभूत करण्यासाठी शिवसेना ठाकरे गटाने ताकद लावली आहे. त्यांच्या विरोधात भाजपमधून शिवसेनेत आलेले बाळ माने हे मैदानात उतरले आहे. या आधी बाळ माने यांना सामंत यांच्याकडून पराभव स्विकारावा लागला आहे. यावेळी माने हे भाजप ऐवजी शिवसेनेकडून मैदानात आहे. या मतदार संघात उदय सामंत हे जिंकतील असा अंदाज सात पैकी सहा पत्रकारांनी व्यक्त केला आहे. तर एका पत्रकाराने ही लढत चुरशीची होईल असं म्हटलं आहे.
ट्रेंडिंग बातमी - नवजात बाळाला इमारतीमधून फेकलं! आई अन् आजी ताब्यात; अंबरनाथमधील संतापजनक घटना
साळवी राजापूर राखणार?
राजापूर विधानसभा मतदार संघातून शिवसेना ठाकरे गटाने राजन साळवी यांना उमेदवारी दिली आहे. तर त्यांच्या विरोधात उदय सामंत यांचे बंधू किरण सामंत हे शिवसेना शिंदे गटाकडून मैदानात आहेत. सत्ता बदलानंतर साळवी यांच्यावर मोठ्या प्रमाणात दबाव टाकण्यात आला होता. त्यांच्या चौकशीही लावली गेली होती. पण त्यांनी ठाकरेंची साथ सोडली नाही. शेवटी त्यांना त्याचे बक्षिस मिळाले आहे. त्यांना उमेदवारी देण्यात आली आहे. राजन साळवी हे बाजी मारतील असं तीन पत्रकारांना वाटत आहे. तर दोघे जण किरण सामंत हे जिंकतील असं सांगितलं आहे. मात्र दोघांनी ही लढत अटीतटीची असल्याचं मत व्यक्त केलं आहे.
नितेश राणे बाजी मारणार?
कणकवली विधानसभा मतदार संघातून भाजपने नितेश राणे यांना उमेदवार दिली आहे. तर शिवसेना ठाकरे गटाने संदेश पारकर यांना मैदानात उतरवले आहे. ही लढत अगदी एकतर्फी असल्याचं स्थानिक पत्रकारांनी सांगितलं आहे. सात पैकी सात पत्रकारांनी नितेश राणे जिंकणार असं सांगितलं आहे. राणेंचा विजय हा पक्का असल्याचा ते म्हणाले. तर संदेश पारकर हे लढतीतच नसल्याचं म्हटलं आहे. राणेंचा लोकसंपर्क आणि विकास कामे यामुळे त्यांचा विजय निश्चित मानला जात आहे.
वैभव नाईक पुन्हा राणेंचा पराभव करणार?
कुडाळ विधानसभा मतदार संघात चुरशीची लढत होताना दिसत आहे. या मतदार संघातून शिवसेना ठाकरे गटाने विद्यमान आमदार वैभव नाईक यांना मैदानात उतरवलं आहे. तर शिवसेना शिंदे गटाने निलेश राणे यांना उमेदवारी दिली आहे. निवडणुकीच्या तोंडावर निलेश यांनी शिवसेनेत प्रवेश करून इथून निवडणूक लढण्याचे निश्चित केले आहे. त्यामुळे ही निवडणूक चुरशीची होत आहे. या निवडणुकीत निलेश राणे बाजी मारतील असं तीन पत्रकारांना वाटत आहे. तर चार जणांनी ही लढत चुरशीची असल्याचं म्हटलं आहे.
केसरकर गड राखणार?
दिपक केसरकरां समोर सावंतवाडीमध्ये मोठं आव्हान उभं करण्यात आलं होतं. शिवसेना ठाकरे गटाने इथे राजन तेली यांना उमेदवारी दिली होती. या शिवाय अन्य दोन अपक्षही मैदानात आहेत. त्यामुळे ही निवडणूक चौरंगी झाली होती. या निवडणुकीत दिपक केसरकरच बाजी मारतील असं सात पैकी सहा पत्रकारांना वाटत आहे. तर एका पत्रकाराने ही निवडणूक चुरशीची होईल असं म्हटलं आहे. त्यामुळे केसरकर जिंकतील असा अंदाज व्यक्त केला जात आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world