जाहिरात
This Article is From Apr 15, 2024

सलमानच्या घरावरील गोळीबाराचा कट रचला अमेरिकेत, शूटर्सची निवड कशी करण्यात आली?

Salman Khan: बॉलिवूड अभिनेता सलमान खानच्या घराबाहेर करण्यात आलेल्या गोळीबाराचा कट अमेरिकेमध्ये रचण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. कोणी रचला कट? शूटर्सची कशी करण्यात आली निवड? आणि शस्त्रास्त्रांचा पुरवठा कसा करण्यात आला? जाणून घ्या सविस्तर माहिती...

सलमानच्या घरावरील गोळीबाराचा कट रचला अमेरिकेत, शूटर्सची निवड कशी करण्यात आली?
Salman Khan: अनमोल बिश्नोईच्या सांगण्यावरून रोहित गोदाराने शूटर्सची केली निवड

Salman Khan: बॉलिवूड अभिनेता सलमान खानच्या (Salman Khan) मुंबईतील घराबाहेर रविवारी (14 एप्रिल 2024) पहाटेच्या सुमारास गोळीबार करण्यात आल्याची घटना घडली. याप्रकरणी पोलिसांकडून तपास देखील सुरू करण्यात आला आहे. आता या प्रकरणाच्या तपासाची जबाबदारी क्राइम ब्रांचकडे सोपवण्यात आली आहे. दरम्यान या घटनेसंदर्भात नवीन माहिती समोर आली आहे. सलमानच्या घराबाहेर करण्यात आलेल्या गोळीबाराचा कट अमेरिकेमध्ये रचण्यात आला होता. शूटर्संना व्हर्च्युअल क्रमांकावरून आदेश मिळाले होते. तसेच रोहित गोदाराच्या (Rohit Godara) सूचनेवरून शूटर्ससाठी शस्त्रांची व्यवस्था करण्यात होती, अशी माहिती समोर येत आहे. 

रोहित गोदारावर देण्यात आली होती गोळीबाराची जबाबदारी 

महाराष्ट्र, दिल्ली, राजस्थान, हरियाणा आणि पंजाब या पाच राज्यांचे पोलीस सध्या सलमान खानच्या (Salman Khan) घराबाहेर गोळीबार करणाऱ्यांचा शोध घेण्यात व्यस्त आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, जवळपास महिनाभर गोळीबाराची योजना आखली जात होती. यासाठी अमेरिकेमध्ये असलेल्या अनमोल बिश्नोईने (Anmol Bishnoi) शूटर्सच्या निवडीची जबाबदारी अमेरिकेतच राहणाऱ्या रोहित गोदारावर सोपवली होती. यामागील सर्वात मोठे कारण म्हणजे रोहित गोदाराकडे कित्येक प्रोफेशनल शूटर्सची माहिती असून ज्याचे जाळे कित्येक राज्यांमध्ये पसरलेले आहे. 

कोण आहे रोहित गोदारा?

तपास यंत्रणांच्या सूत्रांनुसार, सध्या लॉरेन्स बिश्नोई टोळीमधील रोहित गोदाराचे नेटवर्क सर्वात मजबूत असल्याचे म्हटले जात आहे. रोहितने अलिकडेच राजस्थानमधील हायप्रोफाइल राजू ठेठ हत्याकांड व सुखदेव सिंह गोगामेडी हत्याकांड घडवून आणले होते. या दोन्ही हायप्रोफाइल हत्याकांडामध्ये शूटर्सचा बंदोबस्त रोहित गोदारानेच केला होता. बिश्नोई टोळीकडे आपल्या टोळीच्या ऑपरेशनकरिता शस्त्रास्त्रांचा बंदोबस्त कायम असतो. कित्येक राज्यांमध्ये असणाऱ्या टोळीतील सदस्यांच्या घरांमध्ये शस्त्रास्त्रे असतात, जी शूटर्सच्या गरजेनुसार अथवा ठराविक वेळेनुसार शस्त्रांचा पुरवठा केला जातो.  

शूटर्संपर्यंत कशी पोहोचवली शस्त्रास्त्रे?

रोहित गोदाराने आपल्या अन्य साथीदारांच्या मदतीने दोन्ही शूटर्संना शस्त्रास्त्रांचा पुरवठा केला, अशा संशय तपास यंत्रणांना आहे. बिश्नोई टोळीचा इतिहास पाहात टोळीच्या कामाची जबाबदारी कधीही बाहेरील लोकांवर सोपवली जात नाही, तर टोळीतील सदस्यच मोठे काम करण्यासाठी नेहमी तयार असतात. 

रोहित गोदाराने विशाल उर्फ कालूची का केली निवड?

रोहित गोदाराच्या आदेशावरून विशालसह अन्य शूटर्सने रोहतकच्या ढाब्यावर बुकी डीलर सचिनची हत्या केली. सीसीटीव्ही फुटेजमध्ये शूटर विशाल बुकी सचिनवर ज्या पद्धतीने गोळ्या झाडत होता, ती बेधडक शैली पाहून सलमान खानच्या घराबाहेर गोळीबार करण्यासाठी विशालची निवड करण्यात आल्याचे म्हटले जात आहे. 

अनमोल बिश्नोईने स्वीकारली गोळीबाराची जबाबदारी 

तपास यंत्रणांच्या माहितीनुसार, अनमोल बिश्नोईने त्याच्या सोशल मीडिया पोस्टमध्ये दाऊद इब्राहिम आणि छोटा शकील या दोघांची नावे लिहिली आहेत. मुंबईमध्ये एकेकाळी दाऊद आणि छोटा शकील यांचा असणारा दबदबा, हे यामागील कारण असू शकते. त्यांच्या नावावर खंडणी मागण्याचे काम सुरू होते आणि आजही लोकांमध्ये त्यांची भीती आहे. आता यांचे वर्चस्व कमी करून, बिश्नोई गँगला आपला प्रभाव वाढवायचा आहे, जेणेकरून मुंबईतील मोठे उद्योगपती, बॉलिवूड आणि बिल्डर्सकडून चांगला पैसा मिळू शकेल. यामुळेच गोळीबारानंतर अनमोलने लगेचच जबाबदारी स्वीकारत सोशल मीडियावर याबाबत पोस्ट शेअर केली, अशी शक्यता वर्तवली जात आहे.  

आणखी वाचा

सलमानच्या घराबाहेर गोळीबार करणाऱ्या शूटर्सची बाईक जप्त, जाणून घ्या कुठेपर्यंत पोहोचला तपास?

सलमान खानच्या घराबाहेर गोळीबार प्रकरणाचा क्राइम ब्रांच तपास करणार !

गोळीबाराच्या वेळेस सलमान खान घरातच होता, लॉरेन्स बिश्नोई टोळीवर संशय

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com