- आधार क्रमांक हा बँक व्यवहारांसाठी आणि सरकारी योजनांसाठी अनिवार्य झाला आहे
- UIDAI ने नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी ऑथेंटिकेशन हिस्ट्रीची सुविधा दिली आहे
- myAadhaar पोर्टलवर लॉगिन करून आधार कार्ड कुठे आणि कशासाठी वापरले गेले आहे याची माहिती तपासता येते
सध्याच्या काळात बँक व्यवहार असो वा सरकारी योजनांचा लाभ, प्रत्येक ठिकाणी 12 अंकी 'आधार' क्रमांक अनिवार्य झाला आहे. मात्र, आधारचा वापर वाढला असतानाच त्याच्या गैरवापराच्या घटनांमध्येही मोठी वाढ झाली आहे. सायबर चोरटे तुमच्या आधारचा वापर करून आर्थिक फसवणूक किंवा बेकायदेशीर कृत्य करू शकतात. त्यामुळे आपले आधार कार्ड नेमके कुठे वापरले गेले आहे, याची माहिती असणे अत्यंत आवश्यक आहे. ती माहिती कशी मिळवायची त्याची माहिती आपण घेणार आहोत. ही माहिती आपल्याला अगदी घर बसल्या मिळू शकते.
UIDAI ची 'ऑथेंटिकेशन हिस्ट्री' सुविधा आहे. युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडियाने (UIDAI) नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी 'ऑथेंटिकेशन हिस्ट्री' ही विशेष सुविधा उपलब्ध करून दिली आहे. याद्वारे तुम्ही मागील 6 महिन्यांत तुमचे आधार कार्ड कुठे आणि कशासाठी वापरले गेले आहे, याची सविस्तर माहिती मिळवू शकता. त्यातून तुम्हाला ते आधार कार्ड तुम्हीच वापरले आहे की नाही याची माहिती मिळेल. शिवाय जर कुणी दुसऱ्याने वापले असेल त्याची ही कल्पना तुम्हाया यातून मिळण्यास मदत होणार आहे.
यासाठी तुम्हाला 'myAadhaar' पोर्टलवर जाऊन लॉगिन करावे लागेल. आधार क्रमांक आणि कॅप्चा कोड टाकल्यानंतर तुमच्या नोंदणीकृत मोबाईलवर एक OTP येईल. तो सबमिट केल्यावर 'Authentication History' या पर्यायावर क्लिक करा. तेथे ठराविक कालावधी निवडून तुम्ही सर्व नोंदी तपासू शकता. जर तुम्हाला कोणतीही संशयास्पद नोंद आढळली, तर त्वरित 1947 या टोल-फ्री क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे. अनेक वेळा आधार कार्डचा गैरवापर होत असतो. पण मुळ कार्ड धारकाला त्याची कल्पनाच नसते.
बऱ्याच वेळा गुन्हेगार आधार कार्डचा गैरवापर करत असतात. त्याचा फटका मात्र मुळ व्यक्तीला बसत असतो. तपासणी दरम्यान जर तुम्हाला एखादा असा व्यवहार दिसला जो तुम्ही केलेला नाही, तर सावध व्हा. अशा वेळी वेळ न घालवता UIDAI ला तक्रार द्या. तुम्ही help@uidai.gov.in या ईमेलवर किंवा 1947 या हेल्पलाईन क्रमांकावर फोन करून तक्रार नोंदवू शकता. वेळीच सावध राहणे हाच फसवणुकीपासून वाचण्याचा उत्तम मार्ग आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world