
रामराजे शिंदे, दिल्ली
गणेशोत्सव सुरू झाला आहे, याच वेळी भाजप नेते सुनिल देवधर यांनी नवीन घोषणा केली आहे. ती म्हणजे नो शस्त्र, नो मूर्ती. म्हणजेच शस्त्र नसेल तर गणपतीची मूर्ती घ्यायची नाही. सुनिल देवधर यांच्या या घोषणेमुळे आता नव्या चर्चेला तोंड फुटलं आहे.
दिल्लीत राहणारे मराठी राजकीय नेते गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करतात. सुनिल देवधर मागील काही वर्षापासून दिल्लीत गणपती बसवतात. यंदाही त्यांनी आपल्या निवासस्थानी गणपती बसवला आहे. परंतु यावेळेस त्यांनी गणपतीसाठी वेगळा देखावा तयार केला आहे. यावेळेस ॲापरेशन सिंदूरचा देखावा तयार केला आहे.
डाव्या विचारसरणीचा प्रभाव कसा?
सुनिल देवधर यांनी बसवलेल्या गणपतीचं खरं आकर्षण आहे ते म्हणजे गणपतीच्य हातातील शस्त्र. सुनील देवधर यांनी गणेशाच्या हातात त्रिशूल, गदा आणि परशु असलेली मूर्ती बसवली आहे. गणेश मूर्तीच्या हातात शस्त्र का दिली या संदर्भात त्यांना विचारलं असता ते म्हणाले की काही वर्षांपूर्वी हातात शस्त्र दिलेल्या गणेश मूर्ती होत्या. परंतु नंतर डाव्या विचारसरणीच्या लोकांचा कला क्षेत्रावर चांगला प्रभाव होता. त्या डाव्या कलाकारांनी गणेश मूर्तीतील शस्त्र काढून घेण्याचं काम केलं.
शस्त्र आणि शस्त्रचा देवता
“खरंतर गणपतीला बुद्धीचा देवता म्हणतात पण गणपतीने राक्षसांचा खात्मा पण केला. त्यामुळे गणेशजी शस्त्र आणि शस्त्रचा देवता आहे. परंतु काही कलाकारांनी फक्त बुद्धीचा देवता म्हणून गणपतीला रंगवण्याचा प्रयत्न केला” असल्याचंही सुनिल देवधर यांनी म्हटलं आहे.
प्रत्येक हिंदूंनी शस्त्र असलेले गणपती घ्यावे, असं आवाहन सुनिल देवधर यांनी केलं आहे. कारण बाकी सर्व देवांच्या हातात शस्त्र आहे. ज्या मूर्तीला शस्त्र नसतील त्या मूर्ती घ्यायच्या नाहीत, असे सर्वांनी ठरवायला हवं. तरंच ही एक मोहीम उभी राहील. परंतु गणपतीच्या हातात शस्त्र कशासाठी द्यायला पाहिजे असा सवाल केला असता त्यांनी सांगितले की समाजात अनेक विघ्न आहेत. ती दूर करण्यासाठी गणपतीच्या हातात शस्त्र हवी आहेत.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world