अंमलबजावणी संचलनालय अर्थात ईडीने आज देशभरात विविध ठिकाणी छापेमारी केली. 20 हजार कोटींच्या कर्ज घोटाळ्याप्रकरणी ही छापेमारी करण्यात आल्याचे कळते आहे. मुंबई, नागपूर, दिल्लीमधील 35 ठिकाणी ही छापेमारी करण्यात आली आहे. अॅमटेक समूह, या समूहाच्या संचालकांनी 20 हजार कोटींचा कर्ज घोटाळा केल्याचा आरोप आहे. संचालकांमध्ये अरविंद धाम, गौतम मल्होत्रा यांचाही समावेश आहे. कंपनी आणि कंपनीच्या प्रवर्तकांनी मिळून हा कथित घोटाळा केल्याचा आरोप आहे.
ईडीने कार्यालये, घर असे मिळून मुंबई, नागपूर, दिल्लीमधील 35 ठिकाणी बुधवारी छापेमारी केली. सकाळपासूनच या कारवाईला सुरुवात करण्यात आली होती. सीबीआयने अॅमटेक एसीआयएल लिमिटेडविरोधात गुन्हा दाखल केला होता. हाच धागा पकडत ईडीने ही छापेमारी केल्याचे कळते आहे. अॅमटेक एसीआयएल कंपनीने 20 हजार कोटींचा बँक घोटाळा केला असल्याच्या तक्रारी विविध सूचीबद्ध कंपन्यांनी केल्या होत्या. सदर प्रकरण हे राष्ट्रीय कंपनी कायदा लवादाकडे गेल्यानंतर बँकांनी वसुली केली खरी मात्र ती नाममात्र स्वरुपाची होती असा आरोप आहे. सर्वोच्च न्यायालयात हे प्रकरण गेलं असता न्यायालयाने सदर प्रकरणात ईडी चौकशी गरजेची असल्याचे म्हटले होते. ईडीच्या म्हणण्यानुसार, या कथित घोटाळ्यामुळे सुमारे 10,000 ते 15,000 कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. कंपनीने आणि कंपनीच्या संचालक, प्रवर्तकांनी कर्जाऊ रक्कम बांधकाम क्षेत्र, विदेशी गुंतवणूक आणि नव्या क्षेत्रातील गुंतवणुकीसाठी केली होती.
अधिक कर्ज मिळविण्यासाठी बोगस विक्री, भांडवली मालमत्ता, कर्जदार आणि नफा या कंपनीपुढीच चिंतेच्या बाबी असल्याचे सांगून अधिक कर्ज मिळवण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. जेणेकरून कर्ज बुडवल्याचा ठपका टाळता येणं शक्य झाले असते. अधिकची कर्जे मिळवण्यासाठी समभागांच्या किंमतीत हेराफेरी केल्याचाही आरोप आहे. बोगस, बेनामी कंपन्यांमध्ये हजारो कोटी रुपये गुंतवून ठेवण्यात आले असून, कर्जाच्या रकमेतून विदेशात मालमत्ता खरेदी करण्यात आल्याचाही या कंपनीवर आरोप आहे. बेनामी संचालक आणि समभागधारकांच्या माध्यमातून हा पैसा गुंतवून ठेवण्यात आल्याची माहिती सूत्रांच्या हवाल्याने पीटीआय या वृत्तसंस्थेने दिली आहे.
(ही बातमी एनडीटीव्ही टीमने संपादित केलेली नाही. ही बातमी सिंडीकेट फीडद्वारे प्रकाशित करण्यात आली आहे. )