इंदूर शहरातील बाणगंगा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील खातीपुरा परिसरात एका तरुणाचा विचित्र पद्धतीने मृत्यू झालाय. संदीप असं या तरुणाचे नाव असून तो 32 वर्षांचा होता. संदीपच्या अकाली मृत्यूने त्याच्या कुटुंबाला जबरदस्त धक्का बसला आहे. संदीपने जिममध्ये जाऊन नेहमीप्रमाणे व्यायाम केला, घरी परतल्यानंतर त्याने अंडा हाफ फ्राय खाल्लं. त्यानंतर संदीपला छातीत दुखायला लागलं. अंड खाल्ल्याच्या अवघ्या काही मिनिटांत संदीपचा मृत्यू झाला.
नक्की वाचा: रिकाम्या पोटी लसूण खाल्ल्यास काय होते, लसणाचं कोणी करावं सेवन? जाणून घ्या फायदे
व्यायामाची शिस्त संदीपने कधीही मोडली नाही
संदीप हा धडधाकट होता आणि जिममध्ये जाऊन त्याने बॉडी कमावली होती. सहा वर्ष नियमितपणे जिममध्ये जाऊन शरीर कमावणारा संदीपचा मृत्यू हा अनेकांसाठी धक्कादायक आहे. संदीप आरोग्याच्या बाबतीत अत्यंत जागरूक होता. दररोज सकाळी व्यायाम करणे, सकस आहार घेणे याला संदीपने कधीही फाटा दिला नव्हता. मंगळवारी संध्याकाळी तो जिमला गेला होता, रोजच्याप्रमाणे त्याने एक तास व्यायाम केला. जिममधून निघाल्यानंतर संदीपने अंडा हाफ फ्राय खाल्लं होतं. असं सांगितलं जातंय की हे अंडा हाफ फ्रायच त्याच्या जीवावर बेतले.
नक्की वाचा: कॅप्टन हरमनप्रीत कौरनं वर्ल्डकप ट्रॉफीचा टॅटू काढला, अर्थ काय?
रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच संदीपचा मृत्यू
अंडा हाफ फ्राय खाल्ल्यानंतर त्याला अस्वस्थ वाटू लागलं, छातीत जळजळ होऊ लागली. संदीप घाबराघुबरा झाला होता आणि त्याला जबरदस्त ऍसिडिटी झाल्यासारखं वाटू लागलं. त्याला श्वासही धड घेता येत नव्हता. त्याची ही अवस्था पाहून त्याच्या लहान भावाने धावपळ करत त्याला रुग्णालयात दाखल केलं, मात्र रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच संदीपचं निधन झालं. हार्ट अटॅक आल्याने त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी म्हटले आहे.
अवघ्या तीन महिन्यांपूर्वी मुलीचा जन्म
संदीपच्या पश्चात त्याचे आई-वडील, पत्नी आणि दोन लहान मुले आहेत.जीवाला चटका लावणारी गोष्ट ही आहे की तीन महिन्यांपूर्वीच संदीपच्या लहान मुलीचा जन्म झाला होता. मुलीच्या आगमनाने घरात आनंदाचे वातावरण होते, मात्र अचानक झालेल्या संदीपच्या मृत्यूमुळे त्याच्या घरावर स्मशानकळा पसरली आहे. इतका धडधाकट, नियमित व्यायाम करणारा तरूण हार्ट अटॅकने कसा जाऊ शकतो असा प्रश्न त्याच्या घरच्यांना आणि मित्रमंडळींना पडला आहे. संदीपच्या मृत्यूनंतर असा तर्क लावला जात आहे की जिममधून आल्यानंतर लगेच हाफ फ्रायसारखी तळलेले किंवा पचायला जड असलेला पदार्थ खाल्ल्यास त्रास होऊ शकतो.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world