- उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या ताफ्यातील अग्निशामक दलाच्या गाडीची महिलेला धडक
- अपघातात कुसुम सुदे, त्यांचे पती विष्णु दामोदर सुदे आणि दोन मुली गंभीर जखमी झाल्या होत्या
- अजित पवार प्रचार सभेसाठी जात असताना 22 नोव्हेंबर रोजी ही दुर्घटना घडली होती
आकाश सावंत, बीड
Beed News: उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या ताफ्यातील अग्निशामक दलाच्या गाडीने दिलेल्या धडकेत गंभीर जखमी झालेल्या कुसुम विष्णु सुदे (वय 30) यांनी अखेर उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. या घटनेने सुदे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार 22 नोव्हेंबर रोजी परतूरहून औसा येथे प्रचारसभेसाठी जात असताना तेलगाव–धारूर महामार्गावरील धूनकवड फाटा येथे ही दुर्घटना घडली होती. ताफ्यातील वाहनाने दिलेल्या जोरदार धडकेत कुसुम सुदे, त्यांचे पती विष्णु दामोदर सुदे आणि दोन लहान मुली रागिणी (9) व अक्षरा (6) गंभीर जखमी झाले होते.

(नक्की वाचा- Viral VIDEO: फोनवरचं बोलणं ऐकून Uber ड्रायवरने गाडी थांबवली अन्... तरुणीच्या आयुष्यभर लक्षात राहील असा क्षण)
दुचाकीचा चक्काचूर
अपघात इतका भीषण होता की दुचाकी संपूर्ण उद्ध्वस्त झाली आणि चारही जण रस्त्यावर फेकले गेले. तातडीने स्थानिकांनी तत्परता दाखवत जखमींना धारूर येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र प्रकृती गंभीर असल्याने त्यांना तत्काळ लातूर येथील सह्याद्री हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले.
कुसुम सुदे यांचा उपचारादरम्यान मृत्यू
कुसुम सुदे यांची स्थिती अत्यंत नाजूक होती. डॉक्टरांनी शर्थीचे प्रयत्न केले, परंतु गंभीर दुखापतींमुळे उपचार सुरू असतानाच त्यांचा आज मृत्यू झाला. त्यांच्या निधनाने सुदे कुटुंबात तसेच संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे.
दोन निष्पाप मुलींसह संपूर्ण कुटुंब एका क्षणात उद्ध्वस्त झाल्याने स्थानिक नागरिकांनी या अपघाताची चौकशी करून संबंधितांवर कडक कारवाईची मागणी केली आहे. दरम्यान, जखमी विष्णु सुदे व दोन्ही मुलींवर उपचार सुरू असून त्यांच्या प्रकृतीत सुधारणा व्हावी अशी प्रार्थना केली जात आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world