'महाविकास आघाडीचे अधिकृत नेते लाडकी बहीण योजनेविरोधात उच्च न्यायालयात गेले. ही योजना म्हणजे पैशाचा चुराडा आहे म्हणत योजना बंद करण्याची मागणी केली. पण चिंता करु नका, आम्ही त्याविरोधात लढलो आणि योजना बंद पडू दिली नाही, भविष्यातही बंद होणार नाही. काहीही झालं तरी लाडक्या बहिणींना पैसे मिळतील,' असे म्हणत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडीवर जोरदार निशाणा साधला. पुण्यातील पर्वती मतदार संघाच्या उमेदवार माधुरी मिसाळ यांच्या प्रचारसभेत ते बोलत होते.
काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?
"प्रचाराची सुरुवात पर्वतीमधून करायची होती. कारण ज्यांच्याकडे विकासाची दृष्टी आहे, नवे व्हिजन आहे. त्या माधुरीताईंच्या मतदार संघातून प्रचार करावा, मला जिकडे तिकडे जनता दिसत आहे, त्यामुळे माधुरी ताईंचा चौथ्यांदा रेकॉर्डब्रेक विजय निश्चित आहे. माधुरी ताईंमुळे २०, ००० गरिबांना घरे मिळाली. पुण्यामध्ये पुरानंतर ज्या वसाहती बसल्या त्यात भाड्याची घरी होती. या लोकांची मागणी होती आम्हाला हक्काची घरे द्या. ६० वर्षाचा लढा माधुरीताईंच्या नेतृत्वाखाली पुर्णत्वास गेला'
"आज पुण्याचा बदलता चेहरा पाहतोय. मागच्या काळात आपलं सरकार आल्यानंतर पुण्यात मेट्रो सुरु झाली. पुण्यात मेट्रो खूप आधी सुरु व्हायला पाहिजे होती, परंतु जुन्या युपीएच्या सरकारमध्ये इच्छाशक्ती नव्हती, ते घोषणांचे सरकार होते, कारवाई होत नव्हती. मी मुख्यमंत्री झालो, बैठक घेतली आणि तात्काळ निर्णय घेतला आणि देशामध्ये सर्वात वेगाने मेट्रोचे काम पुण्यात झाले. पुण्यामध्ये देशातल्या आणि राज्यातल्या सरकारने केलेली कामे चित्र बदलणारी आहेत. पुण्याचा चेहरा बदलण्याचे काम आपल्या सरकारच्या माध्यमातून होत आहे. पुण्यात वाहतूक कोंडीची मोठी समस्या आहे. यावर उपाय म्हणून आपण रिंगरोड तयार करत आहोत, ज्यामुळे शहरातील ट्राफिक कमी होईल," असंही देवेंद्र फडणवीस म्हणाले.
'मविआ'वर टीकास्त्र
"महाविकास आघाडीचे अधिकृत नेते लाडकी बहीण योजनेविरोधात उच्च न्यायालयात गेले. ही योजना म्हणजे पैशाचा चुराडा आहे म्हणत योजना बंद करण्याची मागणी केली. पण चिंता करु नका, आम्ही त्याविरोधात लढलो आणि योजना बंद पडू दिली नाही, भविष्यातही बंद होणार नाही. काहीही झालं तरी लाडक्या बहिणींना पैसे मिळतील, असा दावाही देवेंद्र फडणवीस यांनी केला. तसेच मी माननीय पवार साहेब, माननीय उद्धवजी, नाना पटोलेंना एकच विनंती करतो. तुम्ही आम्ही राजकीय विरोधक आहोत, तुम्हाला शत्रुता काढायची असेल तर काढा, पण आमच्या लाडक्या बहिणींच्या पैशावर डोळा ठेऊ नका," असा टोलाही त्यांनी यावेळी लगावला.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world