जाहिरात

महाराष्ट्रात ऑपरेशन लोटस? 'मविआ'त धास्ती, पण भाजपमध्येही नाराजी; कारण काय?

महाविकास आघाडीला आणखी एक मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. भारतीय जनता पक्षाकडून राज्यात ऑपरेशन लोटस राबवले जाणार असून मविआचे अनेक खासदार संपर्कात असल्याचा खळबळजनक दावा भाजप नेत्यांनी केला आहे.

महाराष्ट्रात ऑपरेशन लोटस? 'मविआ'त धास्ती, पण भाजपमध्येही नाराजी; कारण काय?

सागर कुलकर्णी, मुंबई:

विधानसभा निवडणुकीत महायुतीने घवघवीत यश मिळवत पुन्हा एकदा सत्ता स्थापन केली. विधानसभेमध्ये महायुतीच्या प्रचंड लाटेत महाविकास आघाडीची अक्षरशः धुळधाण झाली. निवडणुकीत दारुण पराभव झाल्यानंतर आता महाविकास आघाडीला आणखी एक मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. भारतीय जनता पक्षाकडून राज्यात ऑपरेशन लोटस राबवले जाणार असून मविआचे अनेक खासदार संपर्कात असल्याचा खळबळजनक दावा भाजप नेत्यांनी केला आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, भारतीय जनता पक्षाने महाराष्ट्र विधानसभेत 130 हून अधिक जागा जिंकत महाविकास आघाडीला मोठा धक्का दिला आहे. या विराट विजयानंतर भाजपकडून महाविकास आघाडीला आणखी एक मोठा धक्का देण्याची तयारी सुरु असल्याचे बोलले जात आहे. भाजपकडून राज्यात ऑपरेशन लोटस म्हणजेच फोडाफोडी केली जाणार असून विरोधकांचे अनेक खासदार संपर्कात असल्याचा मोठा दावा भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी केला आहे. 

नक्की वाचा: आशिष शेलार, बावनकुळेंची मंत्रिपदासाठी फिल्डिंग; नवे प्रदेशाध्यक्ष कोण? 'ही' नावे चर्चेत

महाविकास आघाडीमधील अनेक खासदार, आमदार आमच्या आणि भाजपच्या संपर्कात आहेत.  विरोधी पक्षात जे सुरू आहे त्याला त्यांचे खासदार कंटाळले आहेत. जनाधार महायुतीच्या बाजूने आहे त्यामुळं तुम्हाला लवकरच काय ते समजेल, असा दावा शिवसेना शिंदे गटाचे खासदार नरेश म्हस्के यांनी केला आहे. तसेच आम्ही ऑपरेशन लोटस करत नाही.. पण त्यांचे लोकप्रतिनिधी अस्वस्थ आहेत, अशावेळी कोणी येत असेल तर स्वागत आहे, असं चंद्रशेखर बावनकुळे म्हणालेत.

भाजपच्या या ऑपरेशन लोटसवरुन महाविकास आघाडीच्या नेत्यांनी जोरदार टीका केली आहे. भ्रष्ट मार्गाने मिळवलेल्या पैशांच्या जोरावर लोकशाही विकत घेण्याचा प्रयत्न म्हणजे ऑपरेशन लोट्स असे म्हणत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी भाजपवर निशाणा साधला आहे. तर त्यांच्याकडे प्रचंड पैसा आहे, यंत्रणा आहे ते काहीही करु शकतात, असं संजय राऊत म्हणालेत.

दरम्यान, ऑपरेशन लोटसच्या चर्चांमुळे भारतीय जनता पक्षामध्येच नाराजी पसरल्याची माहिती समोर आली आहे. भाजपमधील काही नेते ऑपरेशन लोट्सवरुन नाराज असून विरोधी पक्षाचे खासदार सत्तेत सहभागी होणार? याबाबत नाराजी असल्याचे सांगितले जात आहे. 

महत्वाची बातमी: महायुतीचं ठरलं! अमित शाहांनी मंत्रिमंडळाचं गणित जुळवलं; कोणाकडे किती खाती?

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com