जाहिरात
This Article is From Apr 25, 2024

अस्थी विसर्जनात जपलं सामाजिक भान, साताऱ्यात चिरंतन राहणार डॉक्टरांची सावली

Dr. Ravindra Harshe : डॉक्टर रवींद्र हर्षे (वय 81) यांचं बुधवारी (24 एप्रिल) निधन झालं. गोरगरिबांचे डॉक्टर अशी त्यांची ओळख होती.

अस्थी विसर्जनात जपलं सामाजिक भान, साताऱ्यात चिरंतन राहणार डॉक्टरांची सावली
डॉ. रवींद्र हर्षे यांच्या कुटुंबीयांनी सामाजिक भान जपलं आहे.
सातारा:

सुजित आंबेकर, प्रतिनिधी

जन्म-मृत्यूचा फेरा हा कुणालाही चुकलेला नाही. जन्माला येतो त्याचा मृत्यू अटळ आहे. आयुष्यातील प्रत्येक दिवस आपण कसा जगतो, आपल्या जगण्याचा इतरांना कसा फायदा करुन देतो याचा विचार करणाऱ्या माणसांचं स्मरण ते गेल्यानंतरही होतं. त्यांच्या कार्याचं स्मरण सर्वजण आजही करतात. साताऱ्यातले जुन्या काळातील प्रसिद्ध डॉक्टर रवींद्र हर्षे (वय 81) यांचं बुधवारी (24 एप्रिल) निधन झालं. गोरगरिबांचे डॉक्टर अशी त्यांची ओळख होती. त्याचबरोबर सामाजिक कार्यातही ते आघाडीवर होते. हर्षे कुटुंबीयांनी त्यांच्या मृत्यूनंतरही त्यांच्या विचारांचा वारसा जपलाय. 

अस्थी विसर्जनात सामाजिक भान

रवींद्र हर्षे यांनी आयुष्यात कधीही कर्मकांडं केली नाहीत. त्यांच्या विचारांना पुढं नेण्याचं काम अनिकेत आणि डॉ. गीता या त्यांच्या मुलांनी केलंय. त्यांनी डॉ. हर्षे यांच्या अस्थी संगम माहुलीमध्ये निसर्गात विलीन करुन त्यावर वृक्षारोपण केले.

( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा )

आपण नद्यांमध्ये अस्थी सोडतो. त्यामुळे नद्या प्रदुषित होतात. हेच पाणी आपण पितो. त्यापेक्षा या अस्थी मातीमध्ये मिसळून त्याचे खत तयार होते. त्यावर लावलेलं झाडं अनेकांना ऑक्जिन तसंच सावली देण्याचं काम करतं. डॉक्टर हर्षे यांनी कायम गोरगरिबांसाठी काम केले त्याच्या जाण्यानंतर पण वृक्षरुपी सावली चिरंतन राहो म्हणून आम्ही हा निर्णय घेतल्याची माहिती त्यांच्या कुटुंबीयांनी दिली.  

( नक्की वाचा : विदर्भातल्या शेतकऱ्याचा मुलगा JEE मेन्समध्ये देशात पहिला, जाणून घ्या यशाचं गुपित )

डॉ. रवींद्र हर्षे हे आयुर्वेदीक अर्कशाळा लिमिटेड कंपनी साताराचे माजी संचालक होते. जुन्या काळातील प्रसिद्ध वैद्यकीय तज्ज्ञ अशी त्यांची ओळख होती. गोरगरिबांपासून ते राजकीय नेत्यांपर्यंत सर्व स्तरातील मंडळी त्यांच्याकडं वैद्यकीय सल्ल्यासाठी येत. मनमिळावू आणि गरीब रुग्णांना नेहमी मदत करणारे डॉक्टर म्हणून ते प्रसिद्ध होते. एक अतिशय विनम्र आणि तितकाच बुद्धिमान डॉक्टर हरपल्याची भावना साताराकरांनी यावेळी व्यक्त केली

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us: