महाराष्ट्रात झालेल्या नगर परिषद, नगर पंचायतीच्या निवडणुकांचे निकाल 21 डिसेंबर रोजी लागले. या निवडणुकांमध्ये भाजपचे सर्वाधिक नगरसेवक निवडून आले आहेत. 2024 साली झालेल्या लोकसभा निवडणुकीत महायुतीला आणि खासकरून भाजपला महाराष्ट्रात अपेक्षित यश मिळालं नव्हतं. यातून सावध झालेल्या भाजपने त्यानंतर आलेल्या विधानसभा निवडणुकीत आपली पूर्ण ताकद लावत मित्र पक्षांच्या मदतीने सत्ता मिळवली होती. त्याचीच पुनरावृत्ती भाजपने डिसेंबर महिन्यात झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थ्यांच्या निवडणुकीत केल्याचे पाहायला मिळाले.
नक्की वाचा: मालवणमध्ये हार, चव्हाणांचा नारायण राणेंवर 'प्रहार'!, पराभवानंतर रविंद्र चव्हाणांनी राणेंना सुनावलं
आक्रमक आणि शिस्तबद्ध प्रचार
देवेंद्र फडणवीस यांनी या निवडणुकीसाठी राज्यभरात प्रचारसभा घेतल्या होत्या. रवींद्र चव्हाण यांनी या निवडणुकीत जिथे संयम बाळगायचा तिथे संयमाची भूमिका घेतली, जिथे आक्रमकपणा दाखवायचा तिथे आक्रमकपणा दाखवला. रवींद्र चव्हाणांना प्रदेशाध्यक्ष होऊन 6 महिनेच झाले असून या निवडणुकीचे निकाल त्यांची क्षमता काय आहे, याचे उत्तर देणारी होती. या निवडणुकीत शिंदेंची शिवसेना आणि अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस ही काही ठिकाणी भाजपची प्रतिस्पर्धी म्हणून उभी ठाकली होती. निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपने मोठ्या प्रमाणावर पक्षप्रवेश करून घेतले. यात भाजपच्या मित्र पक्षांचाही समावेश होता. एका बाजूला मैत्री आणि दुसऱ्या बाजूला टोकाचा विरोध अशा स्थितीतही भाजप डिसेंबर महिन्यात झालेल्या निवडणुकांमध्ये राज्यात पहिल्या क्रमांकाचा पक्ष म्हणून उदयास आला आहे.
(नक्की वाचा: बायको नगराध्यक्ष तर नवरा नगरसेवक, जव्हारमध्ये भाजपची विक्रमी कामगिरी)
पक्षप्रवेशाचा धडाका सुरू राहणार ?
नागपूरमधल्या भाजपच्या नवनिर्वाचित नगराध्यक्ष आणि नगरसेवकांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भेट घेतली. यावेळी बोलताना त्यांनी म्हटले की, 'विजयाचा रथ सुरू राहील आणि जिल्हा परिषद आणि महानगरपालिका निवडणुकीत हा रथ घोडदौड करेल. या निकालाच्या पार्श्वभूमीवर भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी सोमवारी पत्रकार परिषद बोलावली होती, यात बोलताना त्यांनी म्हटले की, 'तुमची आमची भाजपा सर्वांची" हे बोल महाराष्ट्रातील जनतेने खरे करून दाखवले.' या निवडणुकीमध्ये मित्र पक्षांना सामोरे जात असताना महायुतीला किंवा राज्यातील सत्तेसमोर अडचण उभी राहणार नाही याची काळजी मुख्यमंत्री फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांना घ्यायची होती. निकालानंतरची परिस्थिती पाहाता, तेहे दोघेही त्यात यशस्वी झाल्याचे दिसते आहे. नगर परिषद, नगर पंचायतीच्या निवडणुका झाल्यानंतर 29 महापालिकांच्या निवडणुका होत आहेत. या निवडणुकांच्या अनुषंगाने भाजपने आधीपासूनच इनकमिंगला सुरूवात केली आहे. त्याला विरोध झाला खरा मात्र 21 तारखेचे निकाल पाहाता, येत्या काळात भाजपमधील हे इनकमिंग वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world