Navi Mumbai News : नवी मुंबईसारख्या नियोजनबद्ध आणि सुरक्षित समजल्या जाणाऱ्या शहरात, एका शांत वस्तीत मध्यरात्री घडलेल्या घटनेने खळबळ उडाली आहे. ही घटना केवळ एका महिलेवरील अत्याचारापुरती मर्यादित नाही तर यामुळे स्त्रियांच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह उभं राहत आहे घणसोली येथील गावदेवी वाडी परिसरात १८ डिसेंबर २०२५ रोजी मध्यरात्री दोनच्या सुमारास घडलेला हा प्रकार अंगावर काटा आणणारा आहे. एकटी झोपलेली महिला, बंद घर, रात्र आणि अचानक घरात घुसलेला अनोळखी नराधम... ही केवळ गुन्हेगारीची घटना नाही, तर महिलांच्या दैनंदिन जीवनातील भीतीचे विदारक चित्र आहे.
ही घटना नेमकी कुठे आणि कधी?
दिनांक १८ डिसेंबर २०२५
वेळ रात्री अंदाजे ०२:०० वाजता
ठिकाण - घनसोली
रात्रीची शांतताय... बहुतांश परिसर गाढ झोपेत... या इमारतीतील तळमजल्यावर राहणारी महिला आपल्या घरात एकटीच झोपली होती. बाहेर काहीही हालचाल नव्हती. परिसर शांत, अंधारलेला आणि नेहमीप्रमाणे सुरक्षित वाटणारा. मात्र याच शांततेचा फायदा घेत एका अनोळखी इसमाने अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने घरात प्रवेश केला.
खिडकीतून घरात घुसखोरी
तक्रारीनुसार, आरोपीने घराच्या टॉयलेटच्या खिडकीच्या काचा काढून तसेच वॉशरूमच्या दरवाजाचा खालचा भाग तोडून घरात प्रवेश केला. ही बाब अत्यंत गंभीर असून आरोपीने पूर्वतयारी करूनच ही घुसखोरी केल्याचे स्पष्ट संकेत मिळतात. घराच्या मुख्य दरवाजातून नव्हे तर गुन्हेगाराने घराच्या मागील बाजूने जिथं फार वर्दळ नाही अशा ठिकाणाहून घरात प्रवेश केला.
गाढ झोपेत असतानाच हल्ला
फिर्यादी महिला झोपेत असतानाच आरोपी थेट तिच्या खोलीत पोहोचला. अचानक झालेल्या या प्रकारामुळे ती घाबरून गेली. काही कळण्याच्या आतच आरोपीने तिच्या अंगावरील कपडे काढले आणि चाकूचा धाक दाखवत तिला धमकावलं. भीती, धक्का आणि जीवाला धोका—या सगळ्या परिस्थितीत आरोपीने तिच्या इच्छेविरुद्ध जबरदस्तीने तिच्यावर शारीरिक अत्याचार केला. हा केवळ लैंगिक गुन्हा नसून, तो मानसिक, सामाजिक आणि भावनिक अत्याचार आहे.
चाकूचा धाक आणि कैदेत ठेवलं...
आरोपीकडे चाकू असल्याने, पीडित महिला कोणताही प्रतिकार करू शकली नाही. तिच्या जीवाला धोका असल्याची सतत जाणीव करून देत आरोपीने तिला पूर्णपणे असहाय्य स्थितीत ढकललं. अत्याचारानंतर आरोपीने घराच्या मुख्य दरवाजातून पळ काढला आणि बाहेरून कडी लावून फरार झाला. त्यामुळे पीडित महिला काही काळ घरात अडकून पडली होती. ही बाब आरोपीची क्रूर मानसिकता आणि निर्दयपणा दर्शवते. फिर्यादीचा जबाब ई-साक्ष प्रणालीद्वारे नोंदवण्यात आला असून फॉरेन्सिक तपासाची प्रक्रिया देखील सुरू करण्यात आली आहे.
नवी मुंबईतील महिलांची सुरक्षा पुन्हा ऐरणीवर
या घटनेमुळे नवी मुंबईतील महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. सीसीटीव्ही, पेट्रोलिंग, रात्रीची गस्त, तळमजल्यावरील घरांची सुरक्षा—या सर्व बाबींवर गंभीरपणे विचार करण्याची गरज निर्माण झाली आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world
