"सना तू घाबरु नकोस..." नवाब मलिकच्या कन्येला अजित पवारांनी दिली मोठी जबाबदारी

अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या जनसन्मान यात्रेच्या मंचावर नवाब मलिकांसह त्यांची कन्या सना दिसल्या.

Advertisement
Read Time: 2 mins
मुंबई:

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षांकडून विविध यात्रेंचं आयोजन करण्यात येत आहे. सोमवारी 19 ऑगस्ट रोजी ही यात्रा मुंबईत होती. या यात्रेत माजी मंत्री आमदार नवाब मलिक (Nawab Malik daughter Sana) उपस्थित होते, यामुळे आता मलिक यांचा पाठिंबा महायुतीला असल्याचे स्पष्ट झाले आहे. अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या जनसन्मान यात्रेच्या मंचावर नवाब मलिकांसह त्यांची कन्या सना दिसल्या. विशेष म्हणजे सना मलिक यांना राष्ट्रवादीच्या प्रवक्तेपदाची जबाबदारी देण्यात आली आहे.

अजित पवार म्हणाले, सना मलिक वडिलकीच्या नात्याने माझ्याकडे येत असते. ती तिच्या विधानसभा क्षेत्रातील लोकांची काम घेऊन येत असते. आज मी जाहीर करतो की, सना मलिक ही पक्षाची प्रवक्ता असेल. एक मोठी जबाबदारी आपण तिला देत आहोत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नव्यांना संधी मिळत असते. सनाचं हिंदी, इ्ग्रजी चांगलं आहे, आता मराठीही चांगलं होईल, तू घाबरु नको, असंही अजित पवार म्हणाले. यावर बोलताना सना मलिक म्हणाल्या, "वडील जेलमध्ये असताना कट, कारस्थान झाले पण अजितदादा सोबत होते" .

नक्की वाचा - मुंबई महापालिकेमध्ये बंपर भरती! अ‍ॅप्लिकेशन, पात्रता आणि किती मिळणार पगार? जाणून घ्या एका क्लिकवर

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी नवाब मलिकांच्या राष्ट्रवादीतील प्रवेशाला कडाडून विरोध केला होता. मात्र तरीही अजित पवारांनी फडणवीसांचा विरोध डावलून नवाब मलिकांना जवळ केलं. शिंदे-फडणवीसांचं सरकार आल्यानंतर गंभीर आरोपांखाली नवाब मलिकांना जेलवारी करावी लागली. भाजपनं नवाब मलिकांचे थेट दाऊदशी संबंध असल्याचे आरोप केले. दरम्यान आता अजित पवारांना सोबत घेतल्यानंतर भाजपची नाचक्की झाली आहे, नवाब मलिक तुरुंगाबाहेर आले खरे पण महायुतीचाच भाग बनले. फडणवीसांनी अजितदादांना पत्र लिहित मलिकांबाबत उघड विरोध व्यक्त केला होता. पण आता अजित पवारांनी त्यांच्या विरोधाकडे दुर्लक्ष करत थेट नवाब मलिकांना पक्षीय सभांमध्येच उतरवलं.