स्वानंद पाटील, बीड:
महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरु आहे. विधानसभेचा प्रचार रंगात आला असून सभा, बैठका अन् आरोप- प्रत्यारोपाच्या फैरी पाहायला मिळत आहेत. आता निवडणूका म्हटलं की आश्वासनांची खैरात आलीच. आमदारकीच्या रिंगणात उतरलेले अनेक नेते सध्या मतदारांना आकर्षित करण्यासाठी अनेक आश्वासने, वचने देत आहेत. अशातच राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या उमेदवाराने दिलेले एक आश्वासन सध्या राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरत आहे. 'जर मी आमदार झालो तर सगळ्या पोरांचे लग्न करु देतो,' असे अजब आश्वासन परळी विधानसभेचे उमेदवार राजेसाहेब देशमुख यांनी दिले आहे.
शरद पवारांच्या उमेदवाराचे अजब आश्वासन!
समोर आलेल्या माहितीनुसार, बीडच्या परळी मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे उमेदवार राजेसाहेब देशमुख यांनी प्रचारादरम्यान घाटनांदुर येथे अजब आश्वासन दिले आहे. 'जर मी आमदार झालो तर सगळ्या पोरांचे लग्न करु,' असे राजेसाहेब देशमुख म्हणाले. विधानसभेच्या प्रचारासाठी आयोजित एका सभेत ते बोलत होते. यावेळी मंचावर बीडचे खासदार बजरंग सोनवणेही उपस्थित होते. राजेसाहेब देशमुख यांच्या या आश्वासनाची सध्या राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा रंगली आहे.
'आमदार झालो की सगळ्या पोरांची लग्न...'
"परळी परिसरात तरुण पोराला नातेवाईक म्हणून येत असतांना विचारतात नोकरी आहे का? काही कामधंदा आहे का? पालकमंत्र्यांनाच येथे काही उद्योगधंदा नाही, तुम्हाला कुठून येणार? एकही उद्योगधंदा उभा केला नाही, त्यामुळे मुलांचे लग्न होणे मुश्कील झाले आहे. पण सर्व पोरांना मी या ठिकाणी आश्वासन देतो जर उद्याच्या काळात मी आमदार झालो सगळ्या पोराचे लग्न करु, सगळ्या पोरांना कामधंदा देऊ, अतिशय जोरदार पद्धतीने या ठिकाणी तरुण बाबुराव तुमचं लग्न करायचंय त्यामुळे आगे बढो म्हणल्याशिवाय पर्याय नाही," असे राजेसाहेब देशमुख म्हणाले. देशमुख यांच्या या आश्वासनाची सध्या राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा होत आहे.
परळीमध्ये घड्याळ विरुद्ध तुतारीचा सामना!
दरम्यान, बीडच्या परळी विधानसभा मतदार संघात राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते, कृषीमंत्री धनंजय मुंडे यांच्याविरोधात राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडून राजेसाहेब देशमुख यांना उमेदवारी देण्यात आली आहे. लोकसभेत पंकजा मुंडेंना धक्का दिल्यानंतर आता विधानसभेतही शरद पवार यांनी मराठा कार्ड खेळले आहे. त्यामुळे परळीमध्ये विजयाचा गुलाल कोण उधळणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world