राज्याच्या विधानसभा निवडणुकीत अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला घवघवीत यश मिळाले. विधानसभेत अजित पवार यांचे तब्बल 41 आमदार निवडून आले. निवडणुकीआधी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीने निवडलेले गुलाबी तंत्र कमालीचे यशस्वी झाले. मात्र आता याच गुलाबी वादळावरुन राष्ट्रवादीमध्ये जोरदार वाद रंगला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आमदार आणि प्रवक्ते अमोल मिटकरी यांनी एका फोटोवरुन डिझायन बॉक्स कंपनीचे प्रमुख नरेश अरोरा यांच्यावर जोरदार टीका केली होती. नरेश अरोरा यांनी अजित पवार यांच्या खांद्यावर हात कसा ठेऊ शकतात, असा सवाल करत त्यांनी तुम्ही फक्त पगारी शिपाई.. असे विधान केले होते. यावरुनच अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांनी अमोल मिटकरी यांना खडेबोल सुनावले आहेत.
नक्की वाचा: महायुतीचा फॉर्म्युला ठरला! बोलता बोलता अजित पवारांनी सांगून टाकला
काय म्हणाले होते अमोल मिटकरी?
डिझायन बॉक्स नावाची एजन्सी काही फुकट काम करायला आली नव्हती. अशा प्रकारच्या तीन एजन्सी एकनाथ शिंदेंसोबत होत्या, त्या कुठे दिसल्या का? तो दादांच्या बाजूला येतो, बुके देतो आणि खांद्यावर हात ठेवतो. आपले दुकान सुरु ठेवण्यासाठी या पीआर एजन्सीने स्वतःला लाँच करुन घेतले, अशी टीका अमोल मिटकरी यांनी केली होती. तसेच विधानसभा निवडणुकीतील यश हे राष्ट्रवादीचेच डिझायन आहे, असा टोला त्यांनी लगावला. यावरुन आता पार्थ पवार यांनी अमोल मिटकरींना खडेबोल सुनावले आहेत.
पार्थ पवारांनी घेतला समाचार!
'अमोल मिटकरी यांनी पक्षाचे विधानपरिषदेचे सदस्य असूनही डिझायन बॉक्स आणि श्री. नरेश अरोरा यांच्या संदर्भात पक्षविरोधी भूमिका घेतली आहे हे अत्यंत दुर्दैवी आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि माझे वडील, पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री अजित पवार मिटकरी यांच्या वक्तव्यांशी कोणत्याही प्रकारे सहमत नाहीत. त्यांना अशा टिप्पण्या किंवा माध्यमांमध्ये विधानं करण्यापासून दूर राहण्याचे आवाहन करतो,' असे पार्थ पवार यांनी म्हटले आहे.
महत्वाची बातमी: महायुती सरकारचा 100 दिवसांचा कार्यक्रम ठरणार; शासन दरबारी हालचालींना वेग
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world