जाहिरात
This Article is From May 12, 2024

राज्यात पुण्यासह अनेक जिल्ह्यांना अवकाळी पावसाचा तडाखा; हवामान विभागाकडून 2 दिवस इशारा

पुण्यात तासभर बरसलेल्या पावसामुळे रस्ते जलमय झाले होते. नोकरदारवर्गाला याचा त्रास सहन करावा लागला.

राज्यात पुण्यासह अनेक जिल्ह्यांना अवकाळी पावसाचा तडाखा; हवामान विभागाकडून 2 दिवस इशारा
पुणे:

पुण्यातील अनेक भागात अवकाळी पावसाचा तडाखा बसला असून आजही राज्यातील अनेक भागांमध्ये जोरदार पावसाचा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला आहे. राज्यातील बहुतांश भागात आजही पावसाचा अलर्ट देण्यात आला आहे. ठाणे, मुंबई, पालघर, रायगडमध्ये पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. रत्नागिरीमध्ये बुधवारपर्यंत पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. दुसरीकडे मुंबईत पुढील पाच दिवस कमाल तापमान 31-35 अंश सेल्सिअसदरम्यान असेल. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील काही ठिकाणी रविवार, सोमवार, मंगळवार आणि बुधवारी वीज आणि मेघगर्जनेसह वादळी पावसाचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. याशिवाय धुळे, नाशिक, सोलापूर, नागपूर, चंद्रपूर, बीड, गडचिरोली, सांगली, धाराशिवमध्येही पावसाचा इशारा हवामान खात्याने दिला आहे.  

या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट
कोल्हापूर, सांगली, पुणे, सातारा, अमरावती, अकोला, बुलढाणा, वर्धा, नागपूर, लातूर, नांदेड या राज्यांना हवामान विभागाकडून आज (12 मे) ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. याशिवाय 13 मे रोजी नागपूर, अमरावती, वर्धा, यवतमाळ, वाशिम, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. 
 

नक्की वाचा - सुरक्षा दलाचं 11 तासांपेक्षा जास्त ऑपरेशन, 8 नक्षलवादी ठार! आकडा आणखी वाढणार?

बीड जिल्ह्यामध्येही अवकाळी पावसामुळे चांगलाच तडाखा दिला आहे. बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई, केज परिसरात अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. उकाड्यापासून हैराण झालेल्या नागरिकांना काही प्रमाणात दिलासा मिळाला असला तरी अवकाळी पावसामुळे पिकांचं मोठं नुकसान होण्याची भीती वर्तवण्यात येते आहे. पुणे शहरात सलग तिसऱ्या दिवशी संध्याकाळी वादळी वाऱ्यासह जोरदार हजेरी लावलेल्या पावसाने नागरिकांची दाणादाण उडाली. पुण्यात तासभर बरसलेल्या पावसामुळे रस्ते जलमय झाले होते. कामासाठी घराबाहेर पडलेल्या, अन् कामावरून घरी परतणाऱ्या नागरिकांना पावसाचा जोर ओसरेपर्यंत आसरा घेऊन थांबावे लागले. अवघ्या तासाभरात पुण्यात 40.4 मिलीमीटर पावसाची नोंद झाली. पुढील दोन दिवस पावसाची शक्यता वर्तवली जात आहे. मावळात विजेचा कडकडाट आणि मेघगर्जनेसह जोरदार पाऊस झाला आहे.

कोल्हापुरातही शनिवारी रात्री जोरदार पाऊस झाला. कागल, इचलकरंजी, हातकणंगले, शिरोळ परिसरात पावसाने हजेरी लावली. विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता प्रशासनाने वर्तवली होती. मे महिना सुरू झाल्यापासून उन्हाची तीव्रता कायम आहे. सिंधुदुर्गमध्ये शनिवारी सायंकाळी विजांच्या गडगडाटासह मुसळधार अवकाळी पावसानी हजेरी लावली. अवकाळी पावसाने आंबा, काजू बागायतदार हवालदिल झाले असून अवकाळीच्या पहिल्याच दिवशी वीज पुरवठा खंडित झाला होता. बारामतीच्या बाबुर्डीत अवकाळी पावसामुळे नुकसान झालं आहे. घरांचे पत्रे उडालेत तर काही ठिकाणी विजेचे खांबही आडवे झालेत. त्यामुळे काही गावं अंधाराखाली गेली आहेत. अवकाळी पावसामुळे पिकांचं मोठं नुकसान झालं आहे. शनिवारी रात्री 9 वाजता मुसळधार अवकाळी पावसाची सुरुवात झाली होती. अचानक आलेल्या पावसाने शेतकरी तसेच व्यापारी वर्गाची तारांबळ उडाली. सायंकाळी उशिरापर्यंत अवकाळी पावसाची झोड सुरूच होती.

Listen to the latest songs, only on JioSaavn.com