सागर कुलकर्णी, मुंबई: विधानसभा निवडणुकीत घवघवीत यश मिळाल्यानंतर महायुतीमध्ये आता मुख्यमंत्रीपदासाठी रस्सीखेच सुरु झाली आहे. एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदावरील दावा सोडल्यानंतर भाजपकडून देवेंद्र फडणवीस यांचे नाव निश्चित मानले जात आहे. अशातच माजी मंत्री रविंद्र चव्हाण यांचे नाव मुख्यमंत्रीपदासाठी समोर आल्याने राजकीय वर्तुळात चर्चा रंगल्या आहेत. याबाबत आता स्वतः रविंद्र चव्हाण यांनी महत्वाचा खुलासा करत चर्चांना पुर्णविराम दिला आहे.
राज्याच्या नव्या सरकारच्या शपथविधीची तारीख झाली असली तरी मुख्यमंत्री कोण?याबाबतचा सस्पेन्स अद्याप कायम आहे. त्यामुळे नवे मुख्यमंत्री म्हणून कोणाची वर्णी लागणार याबाबत सर्वांना उत्सुकता लागली आहे. यामध्ये नवनवी नावे समोर येत आहेत. दोन दिवसांपूर्वी केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांचे नाव पुढे आले होते. ज्यानंतर स्वतः मोहोळ यांनी ट्वीट करत या चर्चा तथ्यहीन असल्याचे स्पष्ट केले होते. मुरलीधर मोहोळ यांच्यानंतर आता आणखी एक नवे नाव मुख्यमंत्रीपदासाठी समोर आले आहे.
नक्की वाचा: एकदाचं ठरलं! 5 तारखेला 5 वाजता आझाद मैदानात महायुतीचा शपथविधी
भाजप नेते आणि माजी बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांच्या नावाची मुख्यमंत्रीपदासाठी चर्चा सुरु असल्याचे सांगण्यात येत आहे. इतकेच नव्हे तर रविंद्र चव्हाण यांची दिल्लीमध्ये भाजप हायकमांडशी चर्चा झाली असल्याचीही बातमी समोर आली होती. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, विनोद तावडे यांनी त्यांच्याशी चर्चा केल्याचे बोलले जात होते. याबाबत आता स्वतः रविंद्र चव्हाण यांनी स्पष्टीकरण दिले आहे.
'गेल्या २-३ दिवसांपासून मी माझ्या डोंबिवली मतदारसंघातच आहे. सद्यस्थितीत डोंबिवलीकरांच्या भेटीगाठी घेत त्यांच्याशी संवाद साधत आहे. या दोन दिवसात किंवा काल मध्यरात्री कुठल्याही वरिष्ठ नेत्यांच्या भेटीसाठी दिल्ली अथवा अन्य ठिकाणी गेलेलो नाहीये. त्यामुळे कृपया प्रसार माध्यमांनी कोणत्याही प्रकरणाची शहानिशा करून बातम्या चालवाव्यात, ही नम्र विनंती', असा खुलासा त्यांनी केला आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world