
देवा राखुंडे, बारामती: सरपंच संतोष देशमुख यांचे हत्या प्रकरण सध्या चर्चेत आहे. सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याकांडाचे भयंकर फोटो समोर आल्यानंतर राज्यभरात संतापाचा उद्रेक पाहायला मिळाला. त्यानंतर मंत्री धनंजय मुंडे यांना राजीनामा द्यावा लागला. या संपूर्ण प्रकरणावरुन धनंजय मुंडे यांच्यावर चौफेर टीका होत आहे. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनीही बीडमधील वाढत्या गुन्हेगारीवरुन खडेबोल सुनावले आहेत.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
शरद पवार यांचे मोदींना पत्र.. 3 मोठ्या मागण्या
तत्पुर्वी, शरद पवार यांनी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र पाठवून त्यांचे आभार मानले आहेत. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या उद्घाटनाला उपस्थित राहिल्याबद्दल शरद पवार यांनी पंतप्रधानांचे आभार मानले. तसेच तुमचे सखोल आणि अंतर्दृष्टीपूर्ण भाषण लोकांना भावले, असे म्हणत त्यांनी मोदींचे कौतुकही केले.
या पत्रातून शरद पवार यांनी पंतप्रधानांकडे तीन मोठ्या मागण्या केल्या आहेत. दिल्लीतील संमेलनाचे ठिकाण असलेल्या तालकटोरा स्डेडियममध्ये बाजीराव पेशवे, महादजी शिंदे आणि मल्हारराव होळकर यांचे पुतळे बसवण्याचा प्रस्ताव सरहद संस्थेने मांडला आहे. ही जागा नवी दिल्ली महानगरपालिका आणि दिल्ली सरकारच्या अखत्यारित येत असल्याने त्याच्या परवानगीचे निर्देश द्यावेत, अशी मागणी या पत्रामध्ये केली आहे.
ट्रेंडिंग बातमी - Vasai News: होळी दहन करून घरी येत असताना मामा भाच्यावर काळाचा घाला
धनंजय मुंडेंवर निशाणा..
यावेळी माध्यमांशी बोलताना शरद पवार यांनी बीडमध्ये सुरु असलेल्या गुन्हेगारी घटनांवरुन धनंजय मुंडेंवर निशाणा साधला. "बीडची आज जी व्यवस्था आहे ती कधीही नव्हती. शांततेने सगळ्यांना घेऊन जाणारा जिल्हा म्हणजे बीड असा माझा अनुभव आहे. मी स्वतः त्या भागात लक्ष देत होतो. मात्र दुर्दैवाने काही लोकांनी सत्तेचा गैरवापर करण्याची भूमिका घेतली त्याचे दुष्परिणाम आपल्याला पाहायला मिळाले असं शरद पवार म्हणाले. सरकारने यात कोण आहे याचा विचार नक करता जो कायदा हातात घेईल त्याच्यासंबंधी सक्त धोरण आखावे," अशी मागणीही शरद पवार यांनी केली.
धार्मिक तेढ, मल्हार- झटका वादावरुन संताप..
यावेळी बोलताना शरद पवार यांनी राज्यामध्ये सुरु असलेली धार्मिक तेढ आणि मल्हार झटका मटणच्या वादावरुनही संताप व्यक्त केला. "काही ठिकाणी परिस्थिती थोडी बिघडली आहे. त्याचा गैरफायदा घेणारे आहेत. यावर सरकारने सक्त भूमिका घ्यावी. लोकांमध्ये जात- धर्मांतील अंतर कोणी वाढवत असेल तर बघ्याची भूमिका घेऊ नये," असं ते म्हणाले. तसेच हलाल-झटक्याबाबत विचारले असता राज्यासमोर दुसरे प्रश्न आहेत की नाही, हे काही राष्ट्रीय प्रश्न आहेत का? असे म्हणत त्यांनी संताप व्यक्त केला.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world