मंगेश जोशी, जळगाव
Jalgaon News: शिवसेना ठाकरे गटाचे नेते माजी खासदार उन्मेष पाटील यांच्यासह चार जणांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे. देवगिरी नागरी सहकारी बँकेची 5.33 कोटींची फसवणूक केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. उमंग व्हाईट गोल्ड प्रा. लि. कंपनीच्या कर्जावरून हा गुन्हा दाखल झाला आहे. काही दिवसांपूर्वीच मंत्री गिरीश महाजन यांनी उन्मेष पाटील यांच्यावर बँकांना गंडवल्याचा आरोप केला होता.
छत्रपती संभाजीनगर येथील देवगिरी नागरी सहकारी बँक लिमिटेडच्या चाळीसगाव शाखेची तब्बल 5 कोटी 33 लाख 85 हजार 356 रुपयांची फसवणूक केल्याच्या आरोप होत आहे. यावरून शिवसेना ठाकरे गटाचे नेते माजी खासदार उन्मेष भैय्यासाहेब पाटील यांच्यासह चार जणांविरुद्ध चाळीसगाव ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर राजकीय वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली आहे.
(नक्की वाचा- Kalyan News: शिंदे सेनेनं फक्त 6 तासात व्याजासह भाजपचा हिशोब केला चुकता, दिला मोठा धक्का)
उमंग व्हाईट गोल्ड प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीच्या नावाने घेतलेले औद्योगिक कर्ज न भरल्याने ते एनपीए झाले होते. बँकेकडून संधी देऊनही परतफेड न केल्याने बँकेने कार्यवाही सुरू केली. मात्र, या दरम्यान बँकेकडे गहाण ठेवलेली मशिनरी कंपनीच्या संचालकांनी संगनमताने विकल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्यानुसार बँकेच्या चाळीसगाव शाखेचे व्यवस्थापक जीवन राजूरकर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून उन्मेष पाटील, संजय धनकवडे, प्रशांत वाघ आणि प्रमोद जाधव यांच्या विरोधात फसवणुकीसह विविध कलमान्वये चाळीसगाव ग्रामीण पोलिसात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
(नक्की वाचा- Pakistan on Delhi Blast: दिल्लीतील स्फोटाची पाकिस्तानात चर्चा; प्रमुख वृत्तपत्रांनी काय बातमी दिली?)
दरम्यान, मंत्री गिरीश महाजन आणि उन्मेष पाटील यांच्यात अलीकडेच भूखंड प्रकरणावरून आरोप-प्रत्यारोप रंगले होते. त्यावेळी मंत्री गिरीश महाजन यांनी उन्मेष पाटील यांनी स्टेट बँकेसह अन्य एका बँकेला गंडवल्याचा आरोप केला होता. या आरोपाच्या अवघ्या तीन दिवसांनंतरच हा गुन्हा दाखल झाल्याने राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगली आहे. नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरे गटासाठी ही मोठी अडचण मानली जात आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world