
नंदुरबार जिल्ह्यातील राजकारणात एक मोठी घडामोड घडली आहे. शिवसेना शिंदे गटाचे आमदार चंद्रकांत रघुवंशी यांचे अत्यंत निकटवर्तीय मानले जाणारे आणि नंदुरबार तालुक्यातील नेते संतोष पाटील यांनी भारतीय जनता पक्षात (प्रवेश केला आहे. भाजप आमदार डॉ. विजयकुमार गावित आणि माजी खासदार डॉ. हिना गावित यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला. पाटील यांच्या या निर्णयामुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाजपची ताकद वाढणार असून आमदार चंद्रकांत रघुवंशी यांच्या गटाला मोठा धक्का बसल्याचे मानले जात आहे.
संतोष पाटील यांचे वर्चस्व
संतोष पाटील हे गेली 60 वर्षे रघुवंशी कुटुंबासोबत जोडले गेले होते. त्यांचा नंदुरबार तालुक्यातील पूर्व भागात मोठा प्रभाव आहे. ते धुळे-नंदुरबार जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक, तिलाली गावचे सरपंच आणि विकास सोसायटीचे चेअरमन अशा विविध पदांवर कार्यरत आहेत. त्यामुळे त्यांच्या भाजप प्रवेशामुळे भाजपला या भागातील राजकारणात मोठा फायदा होण्याची शक्यता आहे.
(नक्की वाचा - Maratha Reservation: मनोज जरांगेंच्या मोर्चाचा आजचा मार्ग कसा असेल? मुक्काम कुठे असणार?)
पक्ष सोडण्यामागचे कारण काय?
संतोष पाटील यांनी रघुवंशी यांच्यावर नाराजी व्यक्त करत पक्ष सोडण्याचा निर्णय घेतला. पाटील यांच्या मते, रघुवंशी त्यांच्या निकटवर्तीयांना डावलत आहेत आणि त्यांचे खच्चीकरण करत आहेत. कुठल्याही कार्यक्रमांमध्ये त्यांना बोलवले जात नव्हते आणि विश्वासात घेतले जात नव्हते, असे पाटील यांनी सांगितले. या नाराजीमुळेच त्यांनी रघुवंशींची साथ सोडून डॉ. विजयकुमार गावित यांच्यासोबत जाण्याचा निर्णय घेतला.
(नक्की वाचा- Uddhav Raj Fadnavis सकाळी उद्धव, संध्याकाळी फडणवीस; राज यांच्या भेटीने महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ)
भाजपला होणार फायदा
संतोष पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याने येणाऱ्या जिल्हा परिषद आणि इतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाजपला फायदा होण्याची शक्यता आहे. पाटील यांनी सांगितले की, ते डॉ. गावित यांना प्रामाणिकपणे मदत करणार असून, जिल्हा परिषदेवर डॉ. गावित यांची सत्ता आणण्यासाठी प्रयत्न करतील. त्यांच्या या प्रवेशामुळे नंदुरबारच्या राजकारणातील समीकरणे बदलण्याची शक्यता आहे. पाटील यांच्यासोबतच त्यांचे समर्थकही भाजपमध्ये सामील झाल्याने रघुवंशी गटाची ताकद कमी होण्याची चिन्हे आहेत.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world