जाहिरात

Maharashtra Politics: 'आम्हाला PM मोदींच्या प्रकृतीची चिंता...', 'सामना'चा लक्षवेधी अग्रलेख!

त्या भगिनी उजाडलेले कपाळ घेऊन न्याय आणि बदला मागत आहेत. सिंदूरचे राजकारण करणाऱ्यांना हे कळेल काय? असेही सामना अग्रलेखामध्ये म्हटले आहे. 

Maharashtra Politics: 'आम्हाला PM मोदींच्या प्रकृतीची चिंता...', 'सामना'चा लक्षवेधी अग्रलेख!

पहलगाममध्ये झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय लष्कराने ऑपरेशन सिंदूरची मोहिम राबवत पाकिस्तानला धडा शिकवला. भारतीय लष्कराने पाकव्याप्त काश्मीरमध्ये हवाईहल्ले करत दहशतवाद्यांचा खात्मा केला. 'ऑपरेशन सिंदूर'च्या कारवाईनंतर भारतीय जनता पक्षाकडून देशभरात तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. यावरुनच आता राजकारण रंगले असून शिवसेना ठाकरे गटाचे मुखपत्र असलेल्या सामनामधून यावर जोरदार टीका करण्यात आली आहे.

'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

काय आहे सामना अग्रलेख?

पहलगाम हल्ला आणि 'ऑपरेशन सिंदूर'चे राजकारण करू नये, अशी भूमिका पंतप्रधान मोदी यांनी सुरुवातीला घेतली होती. आता स्वतः मोदी यांनीच या भूमिकेला तिलांजली देऊन सिंदूरचे राजकारण सुरू केले. हा प्रकार अमानुष आहे. पहलगामची लढाई ही दहशतवादाविरुद्धची निर्णायक लढाई होती व त्यात सर्व मतभेद विसरून विरोधी पक्ष सरकारच्या मागे एकवटला याबद्दल मोदी व त्यांच्या सरकारने किमान कृतज्ञता भाव व्यक्त करायला हवा होता, पण विरोधकांना श्रेय देतील ते मोदी कसले? असा खोचक टोला सामना अग्रलेखातून लगावला आहे. 

कश्मीर खोऱ्यात 26 माय-भगिनींच्या कपाळावरील कुंकू अतिरेक्यांच्या हल्ल्यात पुसले व त्याचा बदला घेण्यासाठी भारतीय सेनेने 'सिंदूर' ऑपरेशन राबवले, हे अभिमानास्पद आहे. सैन्य कारवाईवर कोणी राजकारण करू नये, हा राष्ट्रीय सुरक्षेचा मुद्दा असल्याचे सरकारतर्फे सांगण्यात आले. विरोधकांनी हे पथ्य पाळले असले तरी भाजप व त्यांचे लोक 'सिंदूर' प्रकरणाचे राजकारण करून या प्रकरणात ते किती असंवेदनशील आहेत याचे प्रदर्शन रोज घडवीत आहेत. भाजप ठिकठिकाणी 'सिंदूर' यात्रा काढून राजकीय प्रचाराचा शंखनाद करीत आहे. सीमेवर जणू भाजपचे कार्यकर्तेच लढायला उतरले व त्यांच्यामुळेच पहलगामचा बदला पूर्ण झाल्याच्या थाटात हे लोक सिंदूर यात्रा काढू लागले आहेत. सिंदूर यात्रा काढावी असे कोणते शौर्य भाजपवाल्यांनी गाजवले आहे? जो काही पराक्रम केला तो भारतीय सैन्याने केला, अशी टीका सामनामधून करण्यात आली आहे. 

(नक्की वाचा: Mumbai Rain Red Alert: मुंबईत कोसळधार, पाणी साचल्याने रस्ते-रेल्वे वाहतुकीवर परिणाम PHOTOS)


चाळीस जवानांच्या प्रेतांच्या टाळूवरचे लोणी खाण्याचा प्रकार 2019 च्या लोकसभा निवडणुकीत झाला. तोच प्रयोग 'सिंदूर' पुसल्या गेलेल्या 26 जणींच्या बाबतीत होईल.  भारताने पाकिस्तानविरोधात घेतलेली भूमिका ही दहशतवाद संपविण्याची आहे. ही भूमिका जगाला समजावी म्हणून सरकारने सर्वपक्षीय शिष्टमंडळे जगभरात पाठवली, पण येथे भारतात पाकिस्तानच्या निमित्ताने मोदी व त्यांचे लोक विरोधी पक्षाशी लढत आहेत. दहशतवाद्यांचा इतका मोठा हल्ला होऊनही सरकारचे शेपूट वाकडे आहे व ते खोटे बोलून विषय रेटून नेण्यातच धन्यता मानत आहेत. 

राजकीय प्रचाराच्या भाषणात मोदी यांनी सांगितले की, "माझ्या नसांत आता रक्त नसून गरमागरम सिंदूर उसळत आहे." मोदी हे हिंदुत्ववादी असतील तर त्यांनी सिंदुराचे महत्त्व समजून बोलायला हवे. सिंदूर भांगेतच शोभते. ते शरीरात गेले की त्याचे विष होते. आम्हाला मोदींच्या प्रकृतीची चिंता वाटते. शंकराने हलाहल पचवले. मोदी सिंदूरचे विष प्राशन करायला निघाले. 26 जणींच्या भांगेतले सिंदूर दहशतवाद्यांनी पुसले. त्या भगिनी उजाडलेले कपाळ घेऊन न्याय आणि बदला मागत आहेत. सिंदूरचे राजकारण करणाऱ्यांना हे कळेल काय? असेही सामना अग्रलेखामध्ये म्हटले आहे. 

Listen to the latest songs, only on JioSaavn.com