सौरभ वाघमारे, सोलापुर:
Solapur Accident: सोलापूरमधून एक भीषण अपघाताची बातमी समोर आली आहे. लातूर महामार्गावरील जांभळबेट पुलाजवळ झालेल्या एका थरारक अपघातात पाच जणांचा जागीच मृत्यू झाला आहे, तर दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. शुक्रवारी रात्री उशिरा मालट्रक आणि कार यांच्यात झालेल्या भीषण धडकेत हा अपघात घडला. अपघातात मृत्युमुखी पडलेले सर्वजण सोलापूर जिल्ह्यातील कुर्डुवाडी गावचे रहिवासी होते.
सोलापुरात भीषण अपघात!
मिळालेल्या माहितीनुसार, कुर्डुवाडी येथील सात लोक एका कारमधून देवदर्शनासाठी जात होते. बार्शी तालुक्यात जांभळबेट पुलाजवळ त्यांची कार भरधाव वेगात येणाऱ्या मालट्रकवर आदळली. हा अपघात इतका भीषण होता की, यामध्ये कारचा पूर्णपणे चुराडा झाला. कारमधील सातपैकी पाच प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला. मृतांमध्ये दोन महिला आणि तीन पुरुषांचा समावेश असल्याची प्राथमिक माहिती आहे.
Pune News: दहशत, भीती अन् धाकधूक! मुलींनी पुण्यात घराबाहेर पडायचं की नाही? ही एक घटना काय सांगते?
अपघाताच्या वेळी कारमध्ये एक नवविवाहित दांपत्यही होते. या भीषण अपघातात कार पूर्णपणे उद्ध्वस्त झाली असतानाही, या दांपत्याचा मात्र सुदैवाने जीव वाचला आहे. त्यांना गंभीर दुखापत झाली असून त्यांच्यावर तातडीने बार्शी येथील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या अपघाताचे गांभीर्य लक्षात घेऊन, बार्शीचे माजी आमदार राजेंद्र राऊत यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि जखमींना भेटण्यासाठी रुग्णालयात भेट दिली.
गावावर शोककळा...
त्यांनी जखमींच्या प्रकृतीची चौकशी केली व त्यांना सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले. या अपघातानंतर महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी झाली होती. अपघाताची माहिती मिळताच पांगरी पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला आणि वाहतूक सुरळीत केली. याप्रकरणी पांगरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सध्या सुरू आहे. घटनेमुळे कुर्डुवाडी परिसरावर शोककळा पसरली आहे.
नक्की वाचा - Navneet Rana: नवनीत राणांचे पुरूषांबाबत वादग्रस्त वक्तव्य! म्हणाल्या ते रात्री उशिरा...
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world