सुजित आंबेकर, प्रतिनिधी
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीस प्रारंभ होऊन निवडणुकीचा आखाडा चांगलाच पेटला आहे. त्यातच वाई मतदारसंघाची जोरदार चर्चा सुरू आहे. वाई खंडाळा विधानसभा मतदारसंघात महायुतीतील राष्ट्रवादी अजित पवार गटाचे उमेदवार मकरंद पाटील, महाविकास आघाडी पुरस्कृत राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या उमेदवार अरुणादेवी पिसाळ, अपक्ष उमेदवार पुरुषोत्तम जाधव अशा तीन मातब्बर उमेदवारांमध्ये वाईचा गड जिंकण्यासाठी तिरंगी लढतीचा चुरशीचा सामना रंगलेला आहे. त्यामुळे वाई मतदारसंघात कोण बाजी मारणार याची उत्सुकता कमालीची ताणलेली आहे. ही लढत तिरंगी होत असली तरी राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या अरुणादेवी पिसाळ या मात्र प्रचाराच्या रणांगणात उतरल्याचं दिसत नाहीत. दुसरीकडे अजितदादा गटाचे उमेदवार मकरंद पाटील व अपक्ष उमेदवार पुरुषोत्तम जाधव यांनी आपल्या जनसंपर्काच्या माध्यमातून प्रत्येक गाव अन् गाव पिंजून काढलेले आहे. त्यामुळे मतदारसंघात राजकीय इच्छाशक्ती टोकाला गेल्याने वाई खंडाळा महाबळेश्वरमधील राजकीय वातावरण चांगलेच तापलेले आहे. पुरुषोत्तम जाधव पायाला भिंगरी लावून गावोगावी भेटी देत आहेत. त्यामुळे मकरंद पाटलांसमोर आमदारकी टिकवण्याचं मोठं आव्हान निर्माण झाले आहे.
नक्की वाचा : मुख्यमंत्र्यांच्या सभेला गर्दी जमविण्यासाठी पैसे वाटले? सोशल मीडियावर Video Viral
लोकसभेला वाई खंडाळा मतदारसंघातून राष्ट्रवादी शरद पवार गटाला आघाडी मिळाली होती. त्यामुळे महाविकास आघाडीच्या जागा वाटपात अटीतटीचा बनलेला वाई खंडाळा विधानसभा मतदारसंघ राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या वाट्याला गेला. शेवटच्या क्षणी शरद पवारांनी एक नवखा चेहरा समोर आणून माजी मंत्री मदनराव पिसाळ यांच्या सूनबाई अरुणादेवी पिसाळ यांना उमेदवारी घोषित केली. मात्र अरुणादेवी पिसाळ व त्यांचे पती शशिकांत पिसाळ हे पूर्वीपासून मकरंद पाटील व अजित पवारांचे अत्यंत जवळचे समजले जातात. यामुळे उमेदवारी घोषित झाल्यानंतर मतदारसंघातूनही त्यांच्या उमेदवारीबाबत नाराजी तयार झाल्याची चिन्हे निर्माण झाली होती.
( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
तरीही सुरुवातीला मकरंद पाटील विरुद्ध अरुणादेवी पिसाळ यांच्यात समोरासमोर जोरदार फाईट होईल असे देखील काहीसे चित्र होते. अरुणदेवी पिसाळ या मकरंद पाटलांना आव्हान देतील असे वातावरण देखील या मतदारसंघात होते. मात्र अलीकडच्या घडामोडी पाहता अरुणादेवी पिसाळ या प्रचारात पिछाडीवर गेल्याचे चित्र निर्माण झाले आहे. त्याहीपुढे जाऊन सांगायचं म्हटलं तर अरुणादेवी पिसाळ यांचा गट हा जाणीवपूर्वक रणांगणात उतरत नसल्याची ही मतदारसंघात चर्चा आहे. वाईमधील या बदलत्या समीकरणाचा मात्र महाविकास आघाडीला जोरदार फटका बसणार आहे. महाविकास आघाडीचे वरिष्ठ नेते वाईमधील या बदलत्या समीकरणाकडे कसं पाहतात हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
नक्की वाचा - VIDEO : नागपुरात 'मोहब्बत की दुकान', काँग्रेस उमेदवार प्रचारादरम्यान थेट भाजप कार्यालयात
महाविकास आघाडीच्या जागावाटपात अटीतटीचा बनलेल्या वाई विधानसभा मतदारसंघात अनेक निष्ठावंतांना डावलून अरुणादेवी पिसाळ यांना तिकीट दिले गेले. यावेळी राष्ट्रवादीकडून डॉ. नितीन सावंत, काँग्रेसचे विराज शिंदे, शिवसेनेचे पुरुषोत्तम जाधव यांनी शेवटच्या क्षणापर्यंत उमेदवारीसाठी जोरदार रस्सीखेच केली होती. मात्र जागा वाटपात हा मतदारसंघ तुतारीला सोडून येथून अरुणादेवी पिसाळ यांना निवडणूक रिंगणात उतरवण्यात आले.
गत लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी शरद पवार गटाचे उमेदवार शशिकांत शिंदे यांना वाई मतदारसंघातून जोरदार ताकद मिळाली होती. शिंदे यांना येथून 7000 चे मताधिक्य मिळाले होते. मात्र तीच तूतारी आज वाईच्या स्थानिक राजकारणामुळे तिसऱ्या क्रमांकावर फेकली गेल्याची चर्चा आहे. हे सगळं ठरवून केलं जातंय का असा देखील मतदारांकडून सवाल उपस्थित केला जात आहे. वाई खंडाळा मतदारसंघात महाविकास आघाडीच्या गोटात चलबिचल सुरू आहे. समोर अजितदादा गटाचा उमेदवार असताना दुसऱ्या बाजूला महाविकास आघाडीकडून अजितदादांच्याच निष्ठावंताला कशी काय संधी दिली जाते, असा देखील प्रश्न निर्माण झाला आहे.
( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
तिसरी गोष्ट अपक्ष उमेदवार पुरुषोत्तम जाधव यांनी संपूर्ण मतदारसंघ पिंजून काढला आहे. जाधव हे कडवट शिवसैनिक आहेत. काँग्रेस व राष्ट्रवादीचा बालेकिल्ला असलेल्या सातारा जिल्ह्यात गेल्या अनेक वर्षांपासून जाधव यांनी शिवसेनेचा भगवा फडकवत ठेवला आहे. एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानंतर जाधव यांनी खंबीरपणे त्यांना साथ दिली होती. गेल्या अडीच वर्षात जिल्हाप्रमुख म्हणून त्यांनी संपूर्ण जिल्हा पिंजून काढला. वाडीवस्तीवर जाऊन संघटना बांधली. लोकसभा निवडणुकीत ते साताऱ्यातून इच्छुक होते. मात्र, हा मतदारसंघ भाजपला गेल्यानं त्यांना माघार घ्यावी लागली. मात्र विधानसभेसाठी त्यांनी जय्यत तयारी केली. वाई मतदारसंघातून त्यांनी खूप आधीपासूनच तयारी केली. मात्र, महायुतीच्या जागावाटपात हा मतदारसंघ अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला गेला आहे. त्यामुळं जाधव यांनी अपक्ष शड्डू ठोकला आहे.
नक्की वाचा - उरण-पनवेल विधानसभा : ठाकरे गट आणि शेकापमधील वाद चिघळला, निवडणूक आयोगाकडे पोहोचलं प्रकरण
पुढची गोष्ट अजित पवार गटाकडून मकरंद पाटील यांचे बंधू जिल्हा बँकेचे अध्यक्ष नितीन पाटील यांना राज्यसभेचे खासदार म्हणून संधी मिळाली. भुईंज कारखान्यातही आमदार अध्यक्ष व बंधू संचालक आहेत, त्यामुळे या गटाची ताकद आणखी वाढली आहे. ही जमेची बाजू असली तरी एकाच घरात इतकी पदे असल्याबाबतचा अपप्रचारही सुरु आहे. दरम्यान वाईतील बदलती समीकरणे अन स्थानिक राजकारण यामुळे तुतारी तिसऱ्या क्रमांकावर फेकली गेली आहे. त्यामुळे ही लढत बहुरंगी होत असली तरी प्रामुख्याने पाटील व जाधव घराण्यात काटे की टक्कर होणार आहे. त्यामुळे मकरंद पाटलांना आपली आमदारकी टिकवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करावे लागणार आहेत. त्यांच्यासाठी ही निवडणूक कसोटीच ठरण्याची चिन्हे आहेत. दुसऱ्या बाजूला मकरंद पाटलांनी तूतारी बॅकफुटवर जाईल अशी समीकरणे तयार करून महाविकास आघाडीला मोठा धक्का दिल्याची चर्चा मतदारसंघात रंगू लागली आहे.
शेवटची गोष्ट मकरंद पाटलांसाठी ही निवडणूक सोपी नसून सर्वसामान्य शेतकऱ्याच्या कुटुंबातील मुलाने या निवडणुकीत चांगलीच रंगत आणली आहे. त्यामुळे अपक्ष उमेदवार पुरुषोत्तम जाधव बाजीगर ठरणार की मकरंद पाटील विजयाचा चौकार मारणार हे निकालातून स्पष्ट होणार आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world