
अविनाश पवार
सध्या उन्हाच्या झळा सर्वांनाच लागत आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी पाणी टंचाईचा सामना आतापासूनच करावा लागत आहे. मार्च महिना संपत आला आहे.त्यानंतर संपूर्ण एप्रिल आणि मे महिना जायचा आहे. अशातच पाणी टंचाईमुळे अनेक गावं ही चिंतेत आहेत. पश्चिम महाराष्ट्रात तसं बऱ्या पैकी पाणी आहे. असं असतानाही पुण्यातील खेड तालुक्यातील एक असं गाव आहे तिथं भयंकर पाणी टंचाई आहे. इथं एका कुटुंबासाठी केवळ दोन हंडे पाणी दिलं जातं. एवढचं नाही तर अतिरिक्त पाण्यासाठी इथं 100 रुपयांचा दंड ही भरावा लागतो.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
पाणी टंचाईच्या झळा आता राज्यात जाणवू लागल्या आहेत. पुणे जिल्ह्याच्या आदिवासी भागातील खेड तालुक्यात असणाऱ्या परसूल गावात त्याची भीषणता आतापासूनच दिसून येत आहे. यागावात दर वर्षी उन्हाळ्यात पाणी टंचाई ही जाणवते. त्यामुळे गेल्या काही वर्षांपासून ह्या गावाजवळ असणाऱ्या विहिरीतून एका कुटुंबाला फक्त दोन हंडे पाणी नेण्याची मुभा आहे. यावर जर कोणी तिसरा हंडा नेण्याचा प्रयत्न केला, तर त्याला 100 रुपये दंड आकारला जातो. एवढेच नाही तर कोणी चोरून पाणी नेऊ नये यासाठी रात्रीची गस्त घातली जाते.
सध्या राज्यातल्या आदिवासी भागातील बहुतांश गावांमध्ये पाणी टंचाई भासत आहे. पुणे जिल्ह्याच्या आदिवासी भागात देखील हीच परिस्थिती आहे.खेड,आंबेगाव,जुन्नर या तालुक्यातील आदिवासी भागात शिवकालीन टाक्यांचे मागील काही काळात शासनाकडून पुनर्जीवन करण्यात आले. मात्र या टाक्यांमधील साफसफाई अथवा गाळ काढण्याचे काम न केल्याने यातील पाणी पिण्यायोग्य रहात नाही. परिणामी या टाक्यांमध्ये असणाऱ्या पाण्याचा वापर करता येत नाही. ह्या आदिवासी भागातील जनतेची पाण्यासाठी होणारी भविष्यातील वणवण थांबविण्यासाठी सरकारने याकडे गांभिर्याने पाहण्याची गरज आहे, असं गावकरी सांगत आहेत.
दोन हंड्यात संपूर्ण कुटुंबाचे कसे चालणार असा प्रश्न इथल्या महिला उपस्थित करत आहेत. शिवाय गावा पासून विहीर ही लांब आहे. ऐवढी पायपीट करून, घाम गाळून केवळ दोन हंडेच पाणी पदरात पडतं. तिसरा हंडा घेतला तर शंभर रुपये दंड हा अन्याय असल्याचं ही काहींनी वाटतं. पण पीण्यासाठी पाणीचं नसल्यानं असं करावं लागत असल्याचं ही काहींचं म्हणणं आहे. सध्या मार्च महिना सुरू आहे. पुढे पाणी टंचाई आणखी तिव्र होणार आहे. त्यावेळी काय करायचं असा प्रश्न या गावकऱ्यांना पडला आहे. ही समस्या आजचीच नाही, तर दर वर्षीची आहे. पण उन्हाळा आला की याची आठवण होते.
पुणे जिल्ह्यात तसं मुबलक पाणी आहे. तरीही काही गावं ही पाण्यापासून वंचित असल्याचं परसूल गावावरून वाटतं. पाण्यासाठी सरकारच्या अनेक योजना आहेत. तरीही त्या यागावात काही पोहचल्या नाहीत अशी स्थिती आहे. त्यामुळे खेड तालुक्यातील परसूल गावातील भीषण पाणी टंचाईचे वास्तव समोर आल्यानंतर का होईना सरकारला जाग येणार आहे का असा प्रश्न गावकरी करत आहेत. शिवाय ठिकठिकाणच्या पाणी टंचाईचा आढावा घेऊन, वेळीच योग्य त्या उपायोजना केल्या तरच अशा प्रकारची विचित्र अवस्था गावकऱ्यांची आणि गावाची होणार नाही असं त्याचं म्हणणं आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world