राज्याच्या विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा सुपडा साफ झाला. पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या अमित ठाकरे यांचा तर पराभव झालाच पण मनसेला या निवडणुकीत भोपळाही फोडता आला नाही. या दारुण पराभवानंतर राज ठाकरे यांच्या मनसेवर आता पक्षाचे अधिकृत चिन्हही गमावण्याची वेळ येऊ शकते. एकदा माझ्या हातात सत्ता द्या म्हणत यावेळी मनसेच्या पाठिंब्यावर मुख्यमंत्री होईल असा दावा करणाऱ्या राज ठाकरेंच्या मनसेचे काय चुकलं? वाचा सविस्तर....
1. धरसोड भूमिका...
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या स्थापनेपासून राज ठाकरे यांची भूमिका नेहमीच गोंधळाची राहिली आहे. 2014 च्या निवडणुकीत राज ठाकरे यांनी नरेंद्र मोदी यांना पाठिंबा दिला होता. त्यानंतर २०१९ च्या निवडणुकीत त्यांनी पंतप्रधान मोदी, अमित शहांविरोधात भूमिका घेत राष्ट्रवादी,काँग्रेससाठी प्रचार केला.
2. सातत्य, जनसंपर्काचा अभाव
राज ठाकरे यांचा मनसे पक्ष मुंबई, पुणे नाशिक अशा शहरांपुरताच मर्यादित आहे, असं म्हणतात. याचे कारण म्हणजे मनसेला ग्रामीण भागामध्ये आपली ओळख निर्माण करण्यात आली नाही. स्वतः मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचेही ग्रामीण भागात दौरे वाढत नाहीत, त्याचाही या निवडणुकीत त्यांना फटका बसला.
नक्की वाचा: 'मुख्यमंत्रिपदासाठी कोणताही फॉर्म्युला नाही', अजित पवारांनी केलं स्पष्ट
3. प्रचाराचा अजेंडा...
या विधानसभा निवडणुकीत राज ठाकरे यांच्या पक्षाने सर्वाधिक उमेदवार दिले होते. जवळपास 127 जागा मनसेने लढवल्या मात्र एकाही जागेवर त्यांना यश मिळाले नाही. याचे आणखी एक महत्वाचे कारण म्हणजे प्रचारात पिछेहाट. राज ठाकरे यांच्या सभांना नेहमीप्रमाणे प्रचंड गर्दी झाली परंतु त्याचे मतात रुपांतर झाले नाही. याचे कारण म्हणजे प्रचाराचे मुद्दे. एकीकडे फोडाफोडीच्या राजकारणावरुन टीका करत असताना त्यांनी भाजपलाच पाठिंबा दिल्याचे दाखवले, त्यामुळे त्यांच्या भूमिकेबद्दल मतदारांमध्ये संभ्रम निर्माण झाला.
4. दुसऱ्या फळीतील नेत्यांचा अभाव...
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्ये राज ठाकरे वगळता दुसऱ्या फळीतील एकही नेता स्टार प्रचारक किंवा आक्रमक भूमिका मांडताना दिसत नाही. त्यांचे अनेक नेते दुसऱ्या पक्षांमध्ये गेले. बाळासाहेब नांदगावकर यांच्यानंतर एकही बडा नेता मनसेमध्ये जास्त काळ टिकला नाही, त्याचाही मनसेला मोठा फटका बसला असे जाणकरांचे म्हणणे आहे.
महत्वाची बातमी: "भाजपशी जवळीक चूक ठरली", मनसेच्या बैठकीत पराभूत उमेदवारांचा सूर
5. उद्धव ठाकरेंवर टीका...
राज ठाकरे यांनी शिवसेनेच्या फुटीपासून एकनाथ शिंदेंशी जवळीक तर बंधु उद्धव ठाकरे यांच्यावर वारंवार निशाणा साधला. भारतीय जनता पक्षासह, एकनाथ शिंदेंची त्यांनी पाठराखण केली. लोकसभा निवडणुकीतही त्यांनी भाजपला बिनशर्त पाठिंबा देताना उद्धव ठाकरेंवर टीकेची झोड उठवली होती. विधानसभा निवडणुकांच्या प्रचारातही त्यांचा रोख फक्त उद्धव ठाकरे यांच्याकडेच राहिला. राज ठाकरेंची ही भूमिकाही मतदारांना पटली नसल्याचे दिसत आहे.