
Manikrao Kokate News: राज्याचे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे सध्या वादाच्या भोवऱ्यात अडकले आहेत. कोकाटे यांचे शेतकऱ्यां संदर्भातील केलेलं विधान, विधान परिषदेत रम्मी खेळतानाचा व्हिडिओ, या सगळ्यामुळे विरोधक आक्रमक झाले आहेत. माणिकराव कोकाटे यांच्या राजीनामेची मागणी जोर ठरत असतानाच त्यांचं खातं बदली केलं जाण्याची चर्चा सुरू झाली आहे. माणिकराव कोकाटे यांना जेव्हापासून कृषी मंत्रीपद दिले आहे तेव्हापासूनच ते सतत वादात राहिले आहेत. शेतकऱ्यांविरोधात केलेलं वक्तव्य, पंचनाम्या संदर्भात केलेलं वक्तव्य, रम्मी खेळतानाचा व्हिडिओ या सगळ्यामुळे माणिकराव कोकाटे यांचं मंत्रीपद अवघ्या एका वर्षातच धोक्यात आलं आहे.
कोकाटेंवर शिवसेनेची टीका
माणिकराव कोकाटे (Manikrao Kokate) यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यासाठी सर्व विरोधक आक्रमक झाले आहेत. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून राज्यपालांना देखील एक पत्र देण्यात आला आहे. अशा मंत्र्यांचा राजीनामा घेतला गेला पाहिजे अशी पत्रातून मागणी करण्यात आली आहे. मात्र माणिकराव कोकाटे यांचा राजीनामा न घेता त्यांचं मंत्रीपद बदलले जाण्याची शक्यता जास्त आहे. या आठवड्यात झालेल्या राज्य मंत्रिमंडळ बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सगळ्यां वादग्रस्त मंत्र्यांचे कान टोचले आहेत. ही शेवटची संधी आहे असं ही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आहे. असं असलं तरी विरोधक कायम दबाव टाकत आहेत. त्यामुळे माणिकराव कोकाटे याचं कृषी खातं काढून घेतलं जाण्याची शक्यता आहे. कृषी खातं दत्ता भरणे यांना देण्यात येण्याची चर्चा ही आहे.
(नक्की वाचा: Malegaon Bomb Blast : 'काँग्रेसनं हिंदू समाजाची माफी मागावी', मालेगावच्या निकालानंतर मुख्यमंत्र्यांची मागणी)
रम्मीला जागतीक दर्जा
यावरून विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी कोकाटे (Manikrao Kokate) यांना पुन्हा लक्ष्य केलं आहे. "जर माणिकराव कोकाटे क्रीडामंत्री झाले तर रमी हा खेळ जागतिक दर्जावर खेळला जाईल. शिवाय त्याला जागतिक दर्जा दिला जाईल" असा टोला त्यांनी कोकाटे यांना लगावला आहे. माणिकराव कोकाटे यांची हकालपट्टी मंत्रिमंडळातून होईल असं वाटत असतानाच त्यांच्याकडचं खातं हे काढून घेण्याची तयारी सुरू आहे. दुसरं खातं त्यांना दिलं जाईल अशी चर्चा दबक्या आवाजात सध्या सुरू आहे. क्रीडा खातं त्यांना देण्याची शक्यता असून येत्या काही काळात लवकरच याची अधिकृत घोषणा देखील होण्याची शक्यता आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world