जाहिरात
This Article is From Apr 05, 2024

कोकणात निवडणुकी आधीच राजकीय शिमगा, महायुतीत वाद पेटणार?

कोकणात निवडणुकी आधीच राजकीय शिमगा, महायुतीत वाद पेटणार?
रत्नागिरी:

लोकसभा निवडणुकीच्या तयारीला सर्वच पक्ष लागले आहेत. महायुती आणि महाविकास आघाडीचे नेते कामालाही लागले आहेत. पण महायुतीत सर्वच काही आलबेल आहे अशी स्थिती नाही. कोकणात भाजपचे नेते शिवसेना नेते रामदास कदम यांना थेट भिडले आहेत. शिवाय त्यांनी रामदास कदम यांना जशाच तसे उत्तर देण्याची तयारीही दाखवली आहे. त्यामुळे निवडणुकीच्या तोंडावर महायुतीत वाद पेटण्याची दाट शक्यता आहे.

 
महायुतीत वाद उफाळणार? 

माजी मंत्री आणि शिवसेना नेते रामदास कदम यांच्या विरोधात रत्नागिरीतील स्थानिक भाजप पदाधिकारी भलतेच आक्रमक झाले आहेत. त्यांनी रामदास कदम यांच्या विरोधातील आपला राग सोशल मीडियावर व्यक्त केला आहे. भाजपचे जिल्हाध्यक्ष  केदार साठे यांनी सोशल मीडियावर लिहिताना चहापेक्षा किटली गरम, रामदासभाई कदम, हा गरमपणा स्वाभिमानाचा आहे, हुजरेगिरीचा नाही. लवकरच उत्तर देणार. अशी पोस्ट करत आपला राग व्यक्त केला आहे. शिवाय कदम यांनी भाजपवर केलेल्या आरोपांना लवकरच उत्तर देणार असल्याचंही म्हटलं आहे. तर श्रीराम ईदाते यांनी चाय पेक्षा किटली गरम... काढुन टाका मनातील भ्रम... पुत्र प्रेमापाई भरकटले पुन्हा एकदा रामदासभाई कदम... अशी पोस्ट करत त्यांनी रामदास कदामांवर हल्लाबोल केला आहे.  

काय म्हणाले होते रामदास कदम 

रामदास कदम म्हणजे शिवसेनेचे फायरब्रॅंड नेते. रोखठोक बोलणं हा त्यांचा स्वभाव. पण त्यांच्या याच स्वभावामुळे भाजप दुखावली आहे. गेले काही रामदास कदम भाजपला लक्ष करताना पाहायला मिळत आहेत. विधानसभेच्या २०१९च्या निवडणुकीत युती धर्म असताना दापोलीतील भाजप पदाधिकाऱ्यांनी राष्ट्रवादीला मतदान करीत, माझ्या मुलाला पाडण्याचा प्रयत्न केला, असा आरोप रामदास कदम यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत केला. तसेच कदम यांनी याआधी भाजप नेते व बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण आणि गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांना लक्ष केलं होतं.  दापोलीत झालेल्या सभेत कदम यांनी पुन्हा कोण तो रवींद्र चव्हाण?, असा एकेरी उल्लेख केला होता. त्यानंतर दापोलीत वातावरण तापलं होतं. त्यात आता पुन्हा एकदा रामदास कदम यांनी दापोलीतील भाजप पदाधिकाऱ्यांना टार्गेट केल्याने दापोलीतील भाजप पदाधिकारी चांगलेच संतापलेले आहेत.

कदम विरूद्ध भाजप वाद पेटणार? 

राज्यात एकीकडे शिवसेना-भाजप-राष्ट्रवादी काँग्रेस अशी महायुती आहे. मात्र असं असलं तर रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेड-दापोली मतदारसंघात मात्र शिवसेना- भाजपमध्ये दुरावा निर्माण झाला आहे.  गेले काही दिवस शिवसेना नेते, माजी मंत्री रामदास कदम हे भाजपाच्या विरोधात आक्रमक झाले आहेत.  ते भाजपवर शाब्दिक आसूड ओढताना पाहायला मिळत आहेत. काही आरोपही त्यांनी केले आहेत. यावरून भाजपचे स्थानिक नेते, पदाधिकारीही आक्रमक झाले असून, सोशल मीडियावरून त्यांनी रामदास कदम यांना प्रत्युत्तर दिलं आहे. रामदासभाई कदमांच्या मुलाची आमदारकी म्हणजे नाही कायमस्वरूपी वतनदारी, युतीच्या पाठीत खंजीर खुपसण्याची तुमची जाणार नाही सवय प्यारी, असं सोशल मीडियावरून आपला राग व्यक्त केला आहे. हा वाद आणखी वाढण्याची शक्यता आहे. ऐन निवडणुकीच्या तोंडावर होणाऱ्या यावादाचा फटका कोणाला बसणार याची चर्चा सुरू झाली आहे. 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com