'मेरा पानी उतरा देखकर मेरे किनारे घर मत बसा लेना, मैं समंदर हूं लौटकर वापस जरूर आऊंगा...' देवेंद्र फडणवीस यांनी 2019 साली केलेल्या भाषणात हे वक्तव्य केलं होतं. ते त्यांनी खरं करुन दाखवलं आहे. लोकसभा निवडणुकीतील पक्षाचा पराभव, विरोधी पक्षाचे टोमणे आणि सत्तेपाून दूर राहिल्यानंतरही त्यांचा आत्मविश्वास कायम होता. ते फक्त परत आले नाहीत तर राज्याच्या राजकारणातील प्रभावशाली नेते म्हणून त्यांचा उदय झाला आहे. फडणवीसांचा हा प्रवास फक्त राजकीय यश नाही तर कठोर मेहनत, दूरदृष्टी आणि अढळ विश्वासाची गोष्ट आहे. तरुण नगरसेवक ते तिसऱ्यांदा मुख्यमंत्री असा त्यांचा प्रवास आहे. आज देशातील प्रभावशाली राजकीय नेत्यांमध्ये त्यांचा समावेश झाला आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
सुरुवात आणि कौटुंबीक पार्श्वभूमी
देवेंद्र फडणवीस यांचा जन्म 22 जुलै 1970 रोजी नागपूरमधील मध्यमवर्गीय कुटुंबात झाला. त्यांचे वडील गंगाधरराव जनसंघाचे कार्यकर्ते आणि विधानपरिषदेचे आमदार होते. त्यांना वडिलांपासूनच राजकारणाचं बाळकडू मिळालं. आई सरिता फडणवीस यांनी त्यांच्यामध्ये शिक्षण आणि मुल्य संस्काराचं महत्त्व बिंबवलं.
देवेंद्र फडणवीस यांनी कायद्याची पदवी घेतली आहे. त्यानंतर त्यांनी जर्मनीतील डालहम स्कुल ऑफ एज्युकेशनमधून बिझनेस मॅनेजमेंट आणि प्रोजेक्ट मॅनेजमेंटमधून डिप्लोमा केलाय. फडणवीस विद्यार्थीदशेपासूनच राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (आरएसएस) आणि अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेशी (अभाविप) संबंधित आहे. या माध्यमातूनच त्यांची सामाजिक आणि राजकीय कारकिर्द सुरु झाली.
देवेंद्र फडणवीस यांचं 2006 साली अमृता फडणवीसांशी लग्न झालं. त्या बँकर आणि सामाजिक कार्यकर्त्या आहेत. त्यांना एक मुलगी असून तिचं नाव दिवीजा आहे. राजकीय कोलाहालातही एक जबाबदार बाप, मुलगा आणि नवरा ही जबाबदारी देखील त्यांनी सांभाळली आहे. राजकारणासह त्यांना वाचन, लेखन आणि क्रिकेट पाहण्याची आवड आहे. स्वत:च्या व्यस्त कार्यक्रमातही ते या गोष्टींसाठी वेळ काढतात.
( नक्की वाचा : भाजपाकडून देवेंद्र फडणवीस यांचीच मुख्यमंत्रिपदी निवड का झाली? 5 महत्त्वाची कारणं )
राजकीय कारकिर्दीला सुरुवात
फडणवीसांची धडाडी आणि प्रशासकीय क्षमता लक्षात घेऊन भाजपानं त्यांना वेळोवेळी मोठी संधी दिली. फडणवीस राजकीय कारकिर्दीमध्ये दूरवर वाटचाल करणार हे त्यांच्या महापौरपदाच्या कारकिर्दीमध्येच स्पष्ट झालं होतं. देवेंद्र फडणवीस 1999 साली पहिल्यांदा आमदार झाले. त्या विधानसभा निवडणुकीत शिवसेना-भाजपा युतीला राज्यातील सत्ता गमवावी लागली. त्यानंतरही त्यांनी हार मानली नाही. 2004, 2009, 2014, 2019 आणि आता 2024 अशा सलग पाचवेळा ते नागपूर दक्षिण-पश्चिम विधानसभा मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून आले आहेत.
देवेंद्र फडणवीस 2010 साली महाराष्ट्र भाजपाचे सरचिटणीस बनले. तर 2013 मध्ये त्यांच्यावर महाराष्ट्र भाजपाचे अध्यक्ष म्हणून जबाबदारी देण्यात आली. त्यावेळी महाराष्ट्र भाजपात नितीन गडकरी आणि गोपीनाथ मुंडे या दिग्गज नेत्यांचा बोलबाला होता. या मोठ्या नेत्यांच्या सावलीतही फडणवीस यांनी स्वत:ची वेगळी ओळख बनवली. 2014 साली झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपाला मोठा विजय मिळवून देण्यात त्यांचा मोठा वाटा होता.
( नक्की वाचा : अजित पवारांच्या राष्ट्रवादीची मुख्यमंत्रीपदासाठी फडणवीसांना पसंती का आहे? 3 कारणं )
मुख्यमंत्री फडणवीस
2014 मधील विधानसभा निवडणुकीत भाजपाला 122 जागा मिळाल्या होत्या. शिवसेनेशी रस्सीखेच सुरु असल्यानं सरकार बनवणं सोपं नव्हतं. पण, फडणवीसांच्या कुशल रणनीती आणि नेतृत्त्व क्षमतेवर विश्वास ठेवून त्यांना मुख्यमंत्री करण्यात आले. वयाच्या 44 व्या वर्षी ते महाराष्ट्राचे दुसरे तरुण मुख्यमंत्री बनले. फडणवीस यांनी फक्त सत्ता सांभळली नाही. तर वसंतराव नाईक यांच्यानंतर मुख्यमंत्रिपदाचा कालावधी पूर्ण करणारे ते दुसरे मुख्यमंत्री ठरले.
फडणवीसांनी 2014 ते 19 काळात अनेक योजना सुरु केल्या. राज्याला दुष्काळमुक्त करण्यासाठी जलयुक्त शिवार अभियान सुरु केलं. या माध्यमातून 22 हजार गावांमध्ये 6 लाखांपेक्षा जास्त जलसंधारणाची कामं करण्यात आली. राज्य सरकारच्या 393 सेवा ऑनलाईन करत लाखो नागरिकांपर्यंत त्यांच्यापर्यंत पोहोचवलं.
( नक्की वाचा : यशवंतराव ते देवाभाऊ... महाराष्ट्राचे आजवर किती मुख्यमंत्री झाले? कुणाचा कालावधी होता सर्वात जास्त? )
आव्हान आणि पुनरागमन
2019 मधील विधानसभा निवडणुकीत भाजपा-शिवसेना युतीला स्पष्ट बहुमत मिळालं होतं. पण, त्यानंतरही शिवसेनेनं मुख्यमंत्रिपदाच्या मुद्यावर युती तोडली. त्यावेळी फडणवीस यांनी अजित पवारांना सोबत घेऊन सरकार बनवण्याचा प्रयत्न केला. पण, ते सरकार फक्त 80 तास टिकलं. त्याचवेळी त्यांनी केलेल्या भाषणात मेरा पानी उतरा देखकर मेरे किनारे घर मत बसा लेना, मैं समंदर हूं लौटकर वापस जरूर आऊंगा" ही घोषणा केली होती. फडणवीसांनी 2022 साली ते खरं करुन दाखवलं. शिवसेनाेतील दिग्गज नेते एकनाथ शिंदे यांच्या मदतीनं राज्यात सरकार स्थापन केलं. शिंदे मुख्यमंत्री तर फडणवीस उपमुख्यमंत्री झाले.
फडणवीसांनी हिंदुत्त्वाच्या मुद्यांना नेहमीच प्राथमिकता दिली आहे. त्यांनी विधानसभा निवडणुकीत राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि हिंदू संघटनांशी समन्वय साधला. मतदारांना एकजूट करण्यात ही रणनीती यशस्वी ठरली. त्यांनी ग्रामीण भागात महिला केंद्रीत योजनांना प्राधान्य दिलंय. त्यामधून 'देवाभाऊ' ही त्यांची प्रतिमा तयार झाली आहे. देवेंद्र फडणवीस यांचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी जवळचं नातं आहे. त्यामुळे 2014 मधील विधानसभा निवडणुकीनंतर ते राष्ट्रीय नेतृत्त्वाची पहिली पसंती बनले. मोदी-शाह जोडीनं महाराष्ट्रात फडणवीसांवर विश्वास दाखवला. हा विश्वास फडणवीसांच्या राजकीय कारकिर्दीमधील मोठी ठेव आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world