
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभा निवडणुकीनंतर मनसे प्रमुख राज ठाकरे यांची भेट घेतली. राज यांच्या शिवतिर्थ या निवासस्थानी ही भेट झाली. या वेळी त्यांच्या बरोबर खासदार श्रीकांत शिंदे, उद्योग मंत्री उदय सामंत उपस्थित होते. आगामी मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही भेट महत्वाची मानली जाते. शिवाय विधानसभा निवडणुकी वेळी निर्माण झालेली कटूता दुर करण्यासाठी ही शिंदे यांनी पुढाकार घेतल्याचं बोललं जात आहे. तर ही अनौपचारीक भेट असल्याचे मनसे नेत्यांनी स्पष्ट केले आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
विधानसभा निवडणुकीत काही जागांवर तडजोड व्हावी अशी मनसेची इच्छा होती. त्या दृष्टीने पडद्यामागे हालचालीही झाल्या. माहिम मतदार संघात तर अमित ठाकरे हे मैदानात असतानाही एकनाथ शिंदे यांनी सदा सरवणकर यांना उमेदवारी दिली. कल्याण ग्रामीणमध्ये ही विद्यमान आमदार असलेल्या राजू पाटील यांच्या विरोधात उमेदवारी दिला. असे अनेक ठिकाणी घडले. लोकसभेला राज यांनी शिंदेंना मदत केली होती. पण विधानसभेत तसे झाले नाही. त्यामुळे शिंदे आणि राज ठाकरे यांचे संबंध ताणले गेले होते.
त्याच वेळी भाजपने मात्र राज यांच्याशी जवळीक वाढवली होती. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील किंवा मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार असतील हे नियमित राज यांच्या संपर्कात होते. राज ही भाजपच्या जवळ जात असल्याचं चित्र होतं. अशा स्थिती मुंबई महापालिका निवडणुका कधी ही जाहीर होवू शकतात. या पार्श्वभूमीवर शिंदे यांनीही राज यांना आपलसं करण्यासाठी आता पुढाकार घेतला आहे. त्याचाच एक भाग म्हणून त्यांनी राज ठाकरेंची भेटी घेतल्याची चर्चा राजकीय वर्तूळात आहे.
मुंबईत उद्धव ठाकरे यांना मानणारा मोठा वर्ग आहे. अशा वेळी मुंबई महापालिकेत उद्धव यांना टक्कर द्यायची असेल तर शिंदे यांना राज यांच्या मदतीची गरज लागू शकते. राज यांनाही मुंबईत मोठा जनाधार आहे. त्याचा फायदा शिंदे यांना होवू शकतो असं राजकीय विश्लेषकांना वाटते. त्यामुळेच ही भेट असल्याचं ही बोललं जात आहे. शिवाय राज ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत एकत्र काम केले आहे. अशा वेळी भाजप पेक्षा राज यांनी आपल्याला साथ द्यावी अशी त्यांची रणनिती आहे.
ट्रेंडिंग बातमी - Election news: 21 जागांसाठी 600 उमेदवार रिंगणार, 'ही' निवडणूक गाजणार?
मात्र मोठी राजकीय घडामोड होणार आहे असं म्हणणं घाईचं होईल अशी प्रतिक्रीया भाजप नेते प्रविण दरेकर यांनी दिली आहे. राजकीय चर्चा या भेटीत होवू शकते. दोघे ही नेते एकाच विचारधारेचे आहे. त्यामुळे जुने नेते एकत्र येत असतील तर त्यात आश्चर्य वाटण्या सारखे काही नाही असंही दरेकर यावेळी म्हणाले. कदाचीत मुंबईच्या काही प्रश्नावर चर्चा ही या दोघांमध्ये होवू शकते असंही ते म्हणाले. दरम्यान ही राजकीय भेट नसावी. युती किंवा आघाडीचा यात कुठलाही विषय नाही. या भेटीबाबत आताच निष्कर्ष काढणे चुकीचे ठरेल असं मनसे नेते अविनाश अभ्यंकर यांनी सांगितलं.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world