शिवसेनेचे पक्ष आणि चिन्ह काढून घेणे लोकांना आवडले नाही! राज ठाकरे 200 हून अधिक जागा लढणार

राज ठाकरे यांनी आपल्या भाषणात म्हटले की, 'शिवसेनेतून 40 आमदार फुटले तिथपर्यंत ठीक होते, पण धनुष्यबाण चिन्ह आणि शिवसेना हे पक्षाचे नाव काढून घेतले ते लोकाना पटले नाही.'

Advertisement
Read Time: 3 mins
मुंबई:

मनसेच्या  (MNS) पदाधिकाऱ्यांचा वांद्रे येथील रंगशारदा सभागृहामध्ये मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्याला मनसेचे अध्यक्ष राज ठाकरेही (Raj Thackeray) उपस्थित होते. यावेळी राज ठाकरे यांनी केलेल्या भाषणात  शिवसेनेत पडलेली फूट आणि पक्ष तसेच चिन्ह हे एकनाथ शिंदे यांना देणं यावर आपले मत व्यक्त केले.  

मनसेचं ठरलं! वरळीत आदित्य ठाकरेंविरोधात तरुण नेत्याला तयारीला लागण्याचे आदेश

राज ठाकरे यांनी आपल्या भाषणात म्हटले की, 'शिवसेनेतून 40 आमदार फुटले तिथपर्यंत ठीक होते, पण धनुष्यबाण चिन्ह आणि शिवसेना हे पक्षाचे नाव काढून घेतले ते लोकाना पटले नाही.' लोकसभा निवडणुकीतील निकालाबाबतही त्यांनी आपले मत पदाधिकाऱ्यांना संबोधित करण्यासाठी केलेल्या भाषणात व्यक्त केले. महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीला आणि खासकरून उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला चांगले यश मिळाले आहे. पक्षफुटीनंतर शिवसेनेच्या कामगिरीकडे सगळ्यांचे लक्ष लागले होते. शिवसेना (उबाठा)च्या कामगिरीने एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेलाही आश्चर्यचकीत केले आहे.

( नक्की वाचा : आगामी विधानसभेसाठी मनसेचा काय आहे प्लान? या उमेदवारांना राज ठाकरेंकडून ग्रीन सिग्नल )

महाराष्ट्रामध्ये उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला अल्पसंख्यांकांनी मोठ्या प्रमाणावर मतदान केले आहे. राज ठाकरे यांनी हा मुद्दा आपल्या भाषणात उचलून धरत म्हटले की, मराठी माणसाने उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला अपेक्षेप्रमाणे मतदान केले नाही मात्र मुस्लिमांनी त्यांना मतदान केले. राज ठाकरे यांनी लोकसभा निवडणुकीच्या निकालाचं त्यांच्या पद्धतीने विश्लेषण करताना म्हटले की महाविकास आघाडीला राज्यात झालेले मतदान हे महाविकास आघाडीवरील प्रेमामुळे झाले नसून मोदी यांना असलेल्या विरोधातून झाले.

बाळासाहेबांना राजकारणात आणू नका

राज ठाकरे यांनी काही दिवसांपूर्वी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची दिल्लीत जाऊन भेट घेतली होती. या भेटीनंतर मनसेने महायुतीला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला होता. राज ठाकरे यांनी आज पदाधिकाऱ्यांना उद्देशून केलेल्या भाषणात म्हटले की या भेटीच्या वेळी आपण अमित शाह यांना  सांगितली की तुम्हाला 'उद्भव ठाकरेंच्या बाबतीत तुमचे जे काही राजकारण करायचे ते करा, पण या राजकारणात बाळासाहेबांना आणू नका. बाळासाहेबांना मानणारा आजही महाराष्ट्रात मोठा वर्ग आहे. '

Advertisement

मनसे 200 हून अधिक जागा लढणार

मनसे आगामी विधानसभा निवडणूक लढणार का ? महायुतीसोबत मिळून लढणार का ? मनसे किती जागांवर उमेदवार उभे करणार असे प्रश्न खुद्द मनसेच्या कार्यकर्त्यांनाही पडले होते. या प्रश्नांची उत्तरे राज ठाकरे यांनी आपल्या भाषणात दिली. त्यांनी सांगितले की काही जणांनी पुड्या सोडल्या आहेत की मनसेने महायुतीकडे 20 जागा मागितल्या आहेत. मनसे 20 जागा का मागणार? त्या आपल्याला कोण देणार ? असे सवाल करत राज ठाकरेंनी मनसे राज्यात 200 ते 225 जागा लढणार असल्याचे सांगितले. 

वरळी, माहीम, शिवडीचे उमेदवार ठरले

मनसेने वरळीचे आमदार असलेल्या शिवसेना उबाठाच्या आदित्य ठाकरेंविरोधात संदीप देशपांडे यांना उमेदवारी देण्याचे निश्चित केले आहे. माहीममधून मनसे नितीन सरदेसाई यांना उमेदवारी देण्यात येणार आहे तर शिवडीमधून बाळा नांदगांवकर यांना उमेदवारी देण्यात येणार आहे. या नावांची मनसेचे अधिकृत घोषणा केली नसली तर या तिघांना आपापल्या मतदारसंघात प्रचाराला लागण्यास सांगितले असल्याचे वृत्त आहे. 
 

Advertisement
Topics mentioned in this article