जाहिरात

मनसेचं ठरलं! वरळीत आदित्य ठाकरेंविरोधात तरुण नेत्याला तयारीला लागण्याचे आदेश

2019 च्या विधानसभा निवडणुकीत आदित्य ठाकरे यांच्याविरोधात मनसेने दिलेला आपला उमेदवार मागे घेण्याचा निर्णय घेतला होता.

मनसेचं ठरलं! वरळीत आदित्य ठाकरेंविरोधात तरुण नेत्याला तयारीला लागण्याचे आदेश
मुंबई:

देवेंद्र कोल्हटकर

आगामी विधानसभा निवडणुकीसाठी (Assembly Election 2024)  मनसेने (MNS) तयारीला सुरुवात केली आहे. लोकसभा निवडणुकीसाठी महायुतीला राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी बिनशर्त पाठिंबा दिला होता. त्यानंतर भूमिका स्पष्ट करताना त्यांनी मनसे पदाधिकाऱ्यांना आपली सगळी ताकद विधानसभेच्या तयारीसाठी लावण्यास सांगितले होते. राज ठाकरे यांनी त्यांच्या काही निवडक पदाधिकाऱ्यांना निवडणुकीच्या तयारी लागण्याचे आदेश दिले आहेत. वरळी, माहीम, शिवडी, ठाणे, कल्याण ग्रामीणमध्ये त्यांनी उमेदवार हेरले असून त्यांनी या उमेदवारांना तयारीला लागण्यास सांगितले आहे. युवासेनाप्रमुख आणि शिवसेना(उबाठा) नेते आदित्य ठाकरे हे वरळीमधून आमदार असून त्यांच्याविरोधातही उमेदवार देण्याचे तूर्तास मनसेने ठरवले आहे. 2019 च्या विधानसभा निवडणुकीत आदित्य ठाकरे यांच्याविरोधात मनसेने उमेदवार न देण्याचा निर्णय घेतला होता. मनसेने या मतदारसंघातून तूर्तास आपल्या उमेदवाराला कामाला लागण्याचे आदेश दिलेत, मात्र भविष्यात काय होईल हे सांगणं अवघड आहे.

'आम्ही मनसे का सोडली?' राज ठाकरेंच्या जुन्या सहकाऱ्यांनी सांगितली'मन की बात'

कोणते नेते लढणार?

वरळी विधानसभा मतदारसंघातून मनसेने संदीप देशपांडे यांना हिरवा कंदील दिला आहे. माहीम विधानसभा मतदारसंघातून मनसेने नितीन सरदेसाई यांना तयारी करण्यास सांगितले आहे.  शिवडीतून बाळा नांदगावकर यांना तयारी करण्यास सांगण्यात आले आहे. ठाणे शहर मतदारसंघातून मनसेने अविनाश जाधव यांना तयारीला लागण्याचे आदेश दिले आहेत. राजू पाटील हे मनसेचे एकमेव आमदार असून त्यांनाही पुन्हा उमेदवारी दिली जाणार आहे. मनसेने त्यांनाही कामाला लागण्याचे आदेश दिलेत. 

'पक्ष फोडला, जेलमध्ये टाकले, अन्याय, अवहेलना केली त्यांचा प्रचार करायचा का?'

2019 च्या विधानसभा निवडणुकीत मनसेने एकूण 288 पैकी 101 जागा लढल्या होत्या. त्यात फक्त एका जागेवर मनसेला यश मिळालं होतं. कल्याण ग्रामीणमनधून राजू पाटील हे मनसेचे एकमेव आमदार विधानसभेवर निवडून गेले होते. शिवसेनेने एकूण 288 पैकी 126 जागा लढल्या होत्या त्यात 56 जागांवर त्यांना यश मिळालं होतं.  भाजपने एकूण 288 पैकी 164 जागा लढल्या होत्या त्यातील 105 उमेदवारांना यश मिळालं होतं. काँग्रेसने एकूण 288 पैकी 147 जागा लढल्या होत्या आणि त्यांना 44 जागांवर यश मिळालं होतं. राष्ट्रवादी काँग्रेसने एकूण 288 पैकी 121 जागा लढल्या होत्या आणि त्यांना 54 जागांवर यश मिळालं होतं. 

2019 ची परिस्थिती काय होती?

2019 सालच्या विधानसभा निवडणुकीमध्ये संदीप देशपांडे यांनी माहीम विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. त्यांनी शिवसेनेच्या सदा सरवणकरांना कडवी लढत दिली होती. सदा सरवणकरांना 61337 मते मिळाली होती तर संदीप देशपांडे यांना 42690 मते मिळाली.  ठाणे शहर मतदारसंघातून अविनाश जाधव यांनी 2019 साली निवडणूक लढली होती. त्यांनीही दुसऱ्या क्रमांकाची मते देत भाजपच्या संजय केळकर यांना कडवी झुंज दिली होती. केळकर यांना 92298 मते मिळाली होती तर जाधव यांना 72874 मते मिळाली होती. 
 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com