
रायगड जिल्ह्यातील राजकारण सध्या केंद्र स्थानी आहे. एकीकडे रायगडच्या पालकमंत्रिपदाचा वाद मिटलेला नाही. महायुतीच्या नेत्यांना त्यावर तोडगा काढता आलेला नाही. असं असताना दुसरीकडे महायुतीतच एकमेकांना शहकाटशह देण्याचे प्रकार महायुतीत होताना दिसत आहेत. रायगडमध्ये शिवसेना शिंदे गट विरुद्ध सुनिल तटकरे असा उभा वाद आहे. त्यामुळे जिल्ह्यात आपलेच वर्चस्व रहावे यासाठी दोन्ही गट कार्यरत असतात. त्यात आता शिवसेना शिंदे गटाने तटकरेंना चेकमेट करण्यासाठी त्यांच्याच मतदार संघातील एक मोहरा आपल्याकडे खेचण्यात यश मिळवले आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख असलेले अनिल नवगने यांनी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादी शरद पवार गटात प्रवेश केला होता. त्यानंतर त्यांनी अदिती तटकरे यांच्या विरोधात निवडणूक लढवली होती. तेच अनिल नवगने हे आता शरद पवारांच्या राष्ट्रवादीची साथ सोडणार आहेत. त्यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. हा पक्ष प्रवेश 15 एप्रिलला होणार आहे. अनिल नवगने हे तटकरेंचे कट्टर विरोधक समजले जातात. शिवाय त्यांनी श्रीवर्धनमध्ये तटकरें विरोधात चांगले संघटन ही बांधले आहे. त्यामुळे त्याचा फायद थेट शिंदेंच्या शिवसेनेला होणार आहे.
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका डोळ्या समोर ठेवून नवगने यांचा पक्षप्रवेश होत आहे. त्यांच्या पक्षप्रवेशाने तटकरें समोरील अडचणी वाढणार आहेत. अनिल नवगणे हे शिंदे गटात प्रवेश करणार असल्याचे मंत्री भरत गोगावले यांनी पत्रकार परिषद घेऊन जाहीर केले आहे. म्हसळा येथे रविप्रभा संस्थे मार्फत गुणगौरव सोहळा आयोजित करण्यात आला होता. यावेळी मंत्री भरत गोगावले आणि अनिल नवगने हे निवडणुकीनंतर प्रथमच एका व्यासपिठावर आले होते. त्याच वेळी नवगने हे पवारांची साथ सोडणार हे स्पष्ट झाले होते. त्यांच्या शिवसेना प्रवेशाने मतदार संघातील राजकीय गणित बदलण्याची शक्यता आहे.
या पक्ष प्रवेशाला राजकीय हिशोबाचीही किनार आहे. काही दिवसापूर्वी महाड मतदार संघातील भरत गोगावले यांचे कट्टर विरोधक असलेल्या स्नेहल जगताप यांना राष्ट्रवादी काँग्रेसने पक्षात प्रवेश दिला होता. जगताप या गोगावले यांच्या कट्टर विरोधक मानल्या जातात त्यांना प्रवेश देत राष्ट्रवादीने एक प्रकारे गोगावले यांना शह देण्याचा प्रयत्न केला होता. त्याची परतफेड आता गोगावले यांनी केल्याचे बोलले जात आहे. तटकरेंच्या बालेकिल्ल्यातील बडा नेता त्यांच्या गळाला लागला आहे. त्यामुळे तटकरेंना त्यांच्याच होमग्राऊंडवर झगडावे लागणार आहे. त्यामुळे तटकरेंना चेकमेट करण्याची खेळी शिवसेना शिंदे गटाने केली आहे.
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका पाहाता रायगड जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस विरुद्ध शिवसेना शिंदे गट अशाच लढती अनेक ठिकाणी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आपला पक्ष मजबूत करण्यासाठी दोन्ही गटांनी कंबर कसली आहे. जिल्ह्यात आपल्याच पक्षाचे वर्चस्व राहावे यासाठी दोन्ही पक्ष प्रयत्न करत आहेत. त्यामुळे अजूनही जिल्ह्याच्या पालकमंत्रिपदाचा निर्णय झालेला नाही. चार महिन्यापूर्वी नियुक्तीला स्थगिती देण्यात आली होती. मात्र त्यानंतरही कुठलाही तोडगा निघू शकलेला नाही.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world