जाहिरात

तिकीट वाटपादरम्यान मातोश्रीवर काय घडले ? ठाकरेंच्या शिवसेनेसाठी प्राणाची बाजी लावणाऱ्या उपनेत्याचा राजीनामा

साळवी यांनी लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे की, आनंद दिघे, एकनाथ शिंदे यांनी नेहमी मला विचारात घेऊनच संघटनात्मक पदे व नगरसेवक उमेदवारी जाहीर केली होती, कारण मी संघटनेच्या हिताचाच विचार करेल याची त्यांना खात्री होती.

तिकीट वाटपादरम्यान मातोश्रीवर काय घडले ? ठाकरेंच्या शिवसेनेसाठी प्राणाची बाजी लावणाऱ्या उपनेत्याचा राजीनामा
कल्याण:

अमजद खान

कल्याणमध्ये ठाकरे गटाला जबरदस्त धक्का बसला आहे. शिवसेना फुटीनंतरही ठाकरेंच्यासोबत राहणाऱ्या कडवट शिवसैनिकाने उपनेते पदाचा राजीनामा दिला आहे. विजय उर्फ बंड्या साळवी यांना ठाकरेंसोबत राहिल्याने त्रास देण्यासाठी तडीपारीची नोटीस बजावण्यात आली होती असा आरोप केला जातो.  कठीण काळातही ठाकरेंसोबत उभ्या राहणाऱ्या साळवी यांनी राजीनामा देणं हे विधानसभा निवडणुकीपूर्वी ठाकरेंच्या शिवसेनेला आणि त्यासोबतच महाविकास आघाडीला जड जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. साळवी यांनी उद्धव ठाकरे यांना पत्र लिहित त्यांच्यासोबत काय घडले हे सांगितले आहे. यामध्ये त्यांनी आनंद दिघे आणि एकनाथ शिंदे यांचे अप्रत्यक्षरित्या कौतुकही केले आहे.

साळवी यांनी लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे की, आनंद दिघे, एकनाथ शिंदे यांनी नेहमी मला विचारात घेऊनच संघटनात्मक पदे व नगरसेवक उमेदवारी जाहीर केली होती, कारण मी संघटनेच्या हिताचाच विचार करेल याची त्यांना खात्री होती. परंतु आता तसा विश्वास माझ्यावर राहीला नाही असे वाटते.

साळवी यांनी लिहिलेल्या पत्रात त्यांच्या नाराजीचे मुख्य कारण काय होते ते देखील सांगितले आहे. साळवी यांनी मातोश्रीवर घडलेला प्रसंग काय होता ते उद्धव ठाकरेंना या पत्राद्वारे कळवला आहे. साळवी यांनी हा प्रसंग सांगताना शिवसेना खासदार विनायक राऊत यांनादेखील आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले आहे.

नक्की वाचा :रात्रीची पार्टी जीवावर बेतली, गजानन काळेंचा मृत्यू

साळवी यांनी लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे की, "शिवसेनेत 40 वर्ष मी प्रामाणिक, निस्वार्थ हेतूने कार्य करीत आहे. विद्यार्थी सेनेत काम करताना कधी शिवसैनिक झालो हे कळलेच नाही. त्यानंतर एका झंझावतासारखे बाळासाहेबांच्या विचारांनी प्रेरीत होऊन संघटनेचे कार्य केले. माझे कार्य बघून मी न मागता मला शाखाप्रमुख 10 वर्ष, विभागप्रमुख 15 वर्ष, शहरप्रमुख 7 वर्ष, महानगरप्रमुख 5 वर्ष व जिल्हाप्रमुख 2 वर्ष, उपनेते या पदांवर काम करण्याची संधी दिलीत. आपण मला दिलेली जबाबदारी एका निष्ठेने व निस्वर्थ भावनेने संभाळली. शिवसेनेतील गद्दारी  प्रामाणिक पक्षप्रमुखांच्या सोबत राहण्याचा निर्णय घेतला. कल्याण शहरात पूर्व व पश्चिम मध्ये तन मन धन अर्पून संघटना वाढवण्याचे कार्य आपल्या आशिर्वादाने केले. मी कधीही संघटनेकडे कोणतेही पद किंवा उमेदवारी मागीतलेली नाही. संघटनेचे विचार तळागाळात रुजवण्यासाठी अहोरात्र परिश्रम घेतले. आजपर्यंत सर्वांकडून सहकार्य, मार्गदर्शन व मानसन्मान मिळाले त्याबद्दल मनपुर्वक अभार व्यक्त करतो. संघटना फुटीनंतर सच्चाईची म्हणजेच उध्दव ठाकरेंची साथ सोडली नाही, कोणत्याही मोहाला बळी पडलो नाही, कोणत्याही दबावाला घाबरलो नाही, गद्दारांवर सर्व माध्यमातुन तुटून पडलो, त्यांच्याविरोधात बोलताना कधीच स्वत: च्या आयुष्याचा विचार  केला नाही. असे असताना आज मला पदाचा राजीनामा देण्याचा विचार करावा लागत आहे. 1-2 वर्षांपूर्वी माझे  मोठे ऑपरेशन झाले होते, त्यामुळे मी आपणांस म्हणजे उध्दवसाहेबांना मला कोणतेही मोठे पद देऊ नका असे सांगितले होते. परंतु साहेब आपण मला प्रथम जिल्हाप्रमुख व नंतर उपनेतेपद दिले.

नक्की वाचा :'व्होट जिहाद'च्या आरोपांना उत्तर देताना ओवैसींना आठवले पूर्वज, म्हणाले...

परंतु आता दोन वर्ष झाले मी पुर्ण फीट असताना अचानक मला विचारात न घेता माझे जिल्हाप्रमुख पद काढले व अत्यंत ज्युनियर युवासेनेच्या व्यक्तीला जिल्हाप्रमुख पद दिले. असे केल्यामुळे मला फार वाईट वाटले.

नक्की वाचा : मी संधीसाधू तर शरद पवार कोण? अशोक चव्हाणांचा पलटवार

मी 40 वर्ष ज्या शहरात संघटनेचे कार्य निष्ठेने व प्रामाणिकपणे करत आहे तेथील पदे जाहीर करताना मला विचारात घेतले नाही, या गोष्टीचा मला फार पश्चाताप झाला. आनंद दिघे, एकनाथ शिंदे यांनी नेहमी मला विचारात घेऊनच संघटनात्मक पदे व नगरसेवक उमेदवारी जाहीर केली होती, कारण मी संघटनेच्या हिताचाच विचार करेल याची त्यांना खात्री होती. परंतु आता तसा विश्वास माझ्यावर राहीला नाही असे वाटते.

नक्की वाचा :जनतेचे पैसे घरी घेऊन जायचे नसतात! श्रीकांत शिंदेंची मविआ नेत्यांवर सडकून टीका

उध्दव ठाकरेंनी कल्याण पश्चिम विधानसभेची उमेदवारी मला देण्याबाबत चार वेळा विचारले होते, परंतु मी त्यांना नम्रपणे मी इच्छुक नाही असे सांगितले होते. तसेच मी उमेदवारी साठी कोणाचे नाव सुचवलेले नव्हते व पक्षप्रमुख जो उमेदवार देतील त्याचे काम करेल असे सांगितले होते.

सचिन बासरे यांना एबी फॉर्म देताना विनायक राऊत यांनी खोटं बोलून मला मातोश्रीबाहेर जाण्यास सांगितले व गुपचुप,चोरुन बासरेंना एबी फॉर्म दिला. हे अतिशय अपमानास्पद आहे असे मला वाटते. एखाद्या उपनेत्याच्या विभागातील उमेदवारी देताना त्याला मातोश्री बाहेर काढून उमेदवाराला एबी फॉर्म देणे हे योग्य आहे का ? त्यामुळे सर्व शिवसैनिकांमध्ये गैरसमज पसरला व त्याचा त्रास मला होत आहे.

उमेदवाराने पहिली बैठक गीता हॉल मध्ये घेतली त्या बैठकीला मला बोलावले नाही, त्यानंतर फॉर्म भरण्यासाठी आदल्या दिवशी रात्री आठ वाजेपर्यंत सांगितले नव्हते, जेव्हा सर्वांनी त्याला जाब विचारला तेंव्हा मला त्याने फोन केला. मी फॉर्म भरण्यासाठी रॅलीत गेलो, गद्दारांविरोधात पत्रकारांना मुलाखत दिली. फॉर्म भरताना उमेदवाराबरोबर महेश तपासे , अल्ताफ शेख आणि मी  असे चार जण होतो. आमचे फोटोही काढले. परंतु दुसऱ्या दिवशी बातमी मध्ये माझा फोटोही नाही व नावही नाही आले . याचा अर्थ भी उमेदवाराला नको आहे हाच होतो. असे उमेदवाराने वागणे योग्य आहे का ? हे सर्व होऊन अद्यापपर्यंत उमेदवार येऊन भेटत नाही, फोन करत नाही, दिलगिरी व्यक्त करत नाही. याचा अर्थ त्याला प्रचारासाठी माझी गरज नाही हेच सिध्द होत आहे. या सर्व घाणेरड्या राजकारणामुळे मी माझ्या उपनेते पदाचा राजीनामा देत आहे, आपण तो स्वीकारावा ही नम्र विनंती.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com