बीड प्रकरणी आरोप होत असलेल्या धनंजय मुंडेंना अजित पवारांनी तूर्तास अभय दिल्याचं दिसतंय. बीड प्रकरणात कुठल्याही दोषींना सोडणार नाही, पण या प्रकरणात एखाद्या निष्पाप व्यक्तीला शिक्षा नको, अशी भूमिका अजित पवारांनी घेतलीय. अंजली दमानिया यांनी धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी केली होती. त्यासाठी दमानियांनी अजित पवारांची भेट घेतली होती, त्याबाबत विचारलं असता, 'दमानियांनी दिलेली कागदपत्रं पाहिली. तसंच या प्रकरणी मुख्यमंत्र्यांशी चर्चा केल्याचंही अजित पवारांनी सांगितलं... मात्र धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याबाबत कुठलाही निर्णय झाला नसल्याचंही त्यांनी स्पष्ट केलंय. ज्याचा संबंध नाही त्याच्यावर कारवाई करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही असं म्हणत त्यांनी मुंडेंच्या राजीनाम्याबाबतच्या प्रश्नाला बगल दिली. दरम्यान जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीसाठी अजित पवार हे ३० जानेवारी रोजी बीड जिल्ह्याच्या दौऱ्यावर असणार आहेत.